Wed, Jun 19, 2019 08:09होमपेज › Kolhapur › भारनियमन बंद करा; अन्यथा टाळे ठोकू

भारनियमन बंद करा; अन्यथा टाळे ठोकू

Published On: Oct 12 2018 1:03AM | Last Updated: Oct 12 2018 1:03AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

वीज बिल वसुलीत राज्यात कोल्हापूर जिल्हा आघाडीवर असून वीजगळतीही अत्यंत कमी आहे, असे असताना भारनियमनाची झळ येथील शेतकर्‍यांना का ? असा संतप्त सवाल करीत भारनियमन बंद करा, अन्यथा महावितरण कार्यालयास टाळे ठोकू, असा इशारा महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनच्या शिष्टमंडळाने दिला. महावितरणचे मुख्य अभियंता अनिल भोसले आणि अधीक्षक अभियंता शैलेश राठोर यांना घेराव घातला, तर विविध प्रश्‍नांची सरबती करून  अधीक्षक अभियंता राठोर यांना चांगलेच धारेवर धरले. 

आ. सतेज पाटील आणि आ. चंद्रदीप नरके यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने भोसले आणि राठोर यांची भेट घेऊन भारनियमनाबाबत सविस्तर चर्चा केली. महावितरणचे कनिष्ठ अधिकारी, कर्मचारी शेतकरी आणि  सर्वसामान्य ग्राहकांशी उद्धट बोलतात, देखभाल दुरुस्तीची जबाबदारी महावितरणची असताना साहित्य आणण्यासाठी ग्राहकांना सक्ती केली जाते. एखादा ट्रान्स्फॉर्मर बिघडल्यास तो बदलण्याची ग्राहकांकडून वाहनांची मागणी केली जाते. हा सर्व प्रकार म्हणजे शेतकर्‍यांची पिळवणूक आहे. असे प्रकार तातडीने थांबवा, अन्यथा कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करून कोल्हापुरी आंदोलनांचा हिसका दाखविण्यात येईल, असा इशारा दिला. कृषिपंपांना लागू करण्यात आलेले भारनियमन तातडीने बंद करावे त्यासाठी आम्ही चार दिवसांची मुदत देतो. वरिष्ठ कार्यालयास आमच्या भावना कळवा, येथील महसूल वसुली आणि वीज गळतीबाबत वरिष्ठ कार्यालयास माहिती देऊन भारनियमन बंद करण्यासाठी प्रयत्न करावे चार ते पाच दिवसांत यासंदर्भात निर्णय न झाल्यास कार्यालयास टाळे ठोकण्यात येईल तसेच वीज बिल न भरण्याचा निर्णय घेऊन बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.  भारनियमनाच्या तासाची वीज जादा तास देऊन भरपाई करावी, अशी मागणीही करण्यात आली. 

मुख्य अभियंता भोसले यांनी भारनियमन हा विषय मुख्यालयाशी संबंधित आहे. आपल्या भावना मुख्यालयास काळविण्यात येतील, तसेच देखभाल दुरुस्ती, कर्मचार्‍यांचे वर्तन, साहित्य-ट्रान्स्फॉर्मर आदींबाबत तातडीने बैठक घेऊन विषय मार्गी लावण्याचे आश्‍वासन दिले.  या शिष्टमंडळात इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष  विक्रांत पाटील, बाबासाहेब पाटील-भुयेकर,  कार्याध्यक्ष चंद्रकांत पाटील-पाडळीकर, आर. के. पाटील, सखाराम पाटील, आनंदराव नलवडे, रणजित जाधव, संजय चौगुले, शिवाजीराव माने, संजय पाटील, सागर पाटील, वाय. के. चौगले, आनंदा कदम, मारुती पाटील, महादेव सुतार आदींसह कार्यकर्त्यांचा समावेश होता.