Fri, Sep 20, 2019 22:29होमपेज › Kolhapur › सेना ‘थर्ड अंपायर’चा अहवाल ‘मातोश्री’वर

सेना ‘थर्ड अंपायर’चा अहवाल ‘मातोश्री’वर

Published On: Apr 29 2019 1:53AM | Last Updated: Apr 28 2019 11:19PM
कोल्हापूर : प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीत शिवसेनेतील संघटनात्मक कामकाज आणि एकूण जनमानसाचा अंदाज घेणारा अहवाल स्वतंत्र खासगी यंत्रणेने तयार केला आहे. 

या अहवालामध्ये आमदार, पदाधिकारी तसेच सामान्य शिवसैनिकांच्या भूमिका याबाबत सविस्तर माहिती नोंदवण्यात आली आहे. यासह मित्रपक्ष भाजपची भूमिकाही या अहवालात मांडण्यात आली आहे. हा अहवाल मातोश्रीवर पोहोचला असल्याने शिवसेनेच्या गोटात याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे.

शिवसेनेचे कोल्हापूर जिल्ह्यात एकूण दहा विधानसभा मतदारसंघांपैकी सहा आमदार आहेत.  नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना पक्षश्रेष्ठींनी राज्यातील शिवसेनेची ताकद असणार्‍या जिल्ह्यांमध्ये खासगी एजन्सीची टीम पाठवली होती. या टीमकडून आमदार, नगरसेवक व पदाधिकारी यांच्या कामकाजाचा दररोज अहवाल तयार करत होती. तसेच शिवसेनेचा प्रभाव असणारा समूह तसेच दलित, मुस्लिम, जैन आदींसह महिला वर्गांत शिवसेनेबद्दलचे मत काय आहे याचेही विश्‍लेषण करत होती. शिवसेनेच्या कोणत्या गटाने विरोधी भूमिका घेतली आहे का? याचीही सूक्ष्म माहिती या टीमने जमा केली असल्याचे सांगण्यात आले. या टीमकडून याबाबतची माहिती रोज दिली जात होती, पण आता याचा अंतिम अहवाल व त्याचे निष्कर्ष मातोश्रीवर पोहोचले असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. 

हा अहवाल म्हणजे ‘थर्ड अंपायर’ असून या अंपायरने कोणता फैसला नोंदवला आहे याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. या अहवालामुळे शिवसेनेची नेमकी ताकद कुठे आणि कशी आहे याची माहिती पक्षश्रेष्ठींना मिळणार आहे. तसेच विधानसभा निवडणुकीसाठी या अहवालाचा तिकीट वाटपात उपयोग होऊ शकतो, असेही शिवसेनेच्या गोटातून बोलले जात आहे. 

दरम्यान 15 मार्च 2019 च्या दै. ‘पुढारी’च्या अंकात शिवसेनेच्या विशेष समितीची निवडणुकीवर करडी नजर असे वृत्त छापून आले होते. आता या समितीने मातोश्रीवर अहवाल पाठवला आहे.. 

 राज्यात कोल्हापूर हा आमदारांची संख्या पाहता शिवसेनेचा बालेकिल्‍ला मानला जातो. साखर कारखाना, सूतगिरणी, बँका किंवा शिक्षण संस्था ताब्यात नसतानाही कोल्हापूरसारख्या सहकाराच्या पंढरीत शिवसेनेची ताकद आहे.