Wed, Jul 17, 2019 15:52होमपेज › Kolhapur › होमपेज › संपादकीय › महालक्ष्मीच विद्महे... 

महालक्ष्मीच विद्महे...

Published On: Nov 07 2018 11:34AM | Last Updated: Nov 07 2018 11:33AMसु. ल. हिंगणे

भारतीय संस्कृतीत ऐश्‍वर्य आणि भौतिक सुखाचं प्रतीक म्हणून लक्ष्मीदेवीची पूजा केली जाते. वैदिक साहित्यापासून पौराणिक साहित्यातही सौभाग्याची देवी म्हणजे श्री लक्ष्मी मानली गेली आहे. तिचे स्वरूप, तिचे अलंकार, तिचे गुणधर्म यासंदर्भात अनेक विवेचने उपलब्ध आहेत. भारतीय मनीषेची समृद्धी, कल्याण, आनंद यांच्याशी आस्था जोडणारी ही एक विशिष्ट शैली आहे. प्राचीन कालखंडात भारतीय जिथे जिथे गेले तिथे त्यांनी आपल्यासोबत आस्था, विश्‍वास, सचेतन असणार्‍या भारतीय परंपरा नेल्या. या परंपरा काळाच्या ओघात बहरल्या. या दिवशी बळीच्या बंदिवासातून सुटका झालेल्या लक्ष्मीचे वास्तव्य आपल्या घरी कायम राहावे म्हणून मोठ्या भक्‍तिभावाने लक्ष्मीची पूजा करण्याची प्रथा आहे. 

दिवाळीत आश्‍विन कृष्ण अमावस्येला लक्ष्मीपूजन केले जाते. दारिद्य्राचा अंधकार दूर करून समृद्धीचा दीप चेतवावा, हा दिवाळीचा संदेश सर्वार्थाने प्रकट होतो तो लक्ष्मीपूजनाच्या दिवशी. आश्‍विन अमावस्येला लक्ष्मी सर्वत्र संचार करीत असते. म्हणून या दिवशी आपल्याकडे संध्याकाळी घराचे सर्व दरवाजे उघडे ठेवण्याची पद्धत आहे. या दिवशी लक्ष्मी घरात प्रवेश करते, अशी त्या मागची भावना आहे. ज्या घरामध्ये चारित्र्यवान, कर्तव्यदक्ष, संयमी, धर्मनिष्ठ, देवभक्‍त, क्षमाशील पुरुष आहे आणि गुणवती, शीलवती स्त्रिया वास्तव्य करताहेत, त्याच घरात लक्ष्मी स्थिरावते. 


अलक्ष्मी म्हणजे दारिद्य्र, अवदसा. ही अवदसा दूर करण्यासाठी लक्ष्मीची पूजा करावी, असे धर्मग्रंथात सांगितले आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी संध्याकाळी घरोघरी दुकानांतून, सोन्या-चांदीच्या पेढ्यांतून, कार्यालयांमधून लक्ष्मीपूजन केले जाते. घरातील सर्व मंडळी नवी वस्त्रे परिधान करून लक्ष्मीची म्हणजेच घरातील सोनं-नाणं, रोकड यांची पूजा करतात. या धनलक्ष्मीच्या पूजनासोबत आरोग्यलक्ष्मीची म्हणजेच केरसुणीचीही पूजा केली जाते. 

या दिवशी अलक्ष्मीला दूर करून लक्ष्मीला घरात आणण्याचा विधी केला जातो. लक्ष्मीपूजन हे नेहमी प्रदोष काळात करावे, असे धर्मशास्त्र सांगते. त्यामुळे लक्ष्मीपूजन हे सायंकाळी केले जाते. लक्ष्मीपूजनाच्या आधी अलक्ष्मी निःसारण केले जाते. अलक्ष्मी म्हणजे दारिद्य्र. ज्या घरात भांडणे, कलह चालू असतात, मद्यपान, अभक्ष्य भक्षण असते, तसेच अधार्मिक गोष्टी घडतात, तेथे अलक्ष्मी निवास करते. म्हणून लक्ष्मीपूजनाच्या आधी घराची साफसफाई केली जाते. मनातील हेवेदावे विसरून शुद्ध अंत:करणाने अलक्ष्मीचे प्रतीक म्हणून केरसुणीची पूजा करावी आणि त्यानंतर लक्ष्मीची पूजा करावी, असा कृतिविधी शास्त्रांमध्ये सांगितला आहे. 

लक्ष्मी म्हणजे श्री विष्णूंची पत्नी. ती धनलक्ष्मी होय. म्हणून या दिवशी लक्ष्मी-नारायणाची पूजा करावी. लक्ष्मीची पूजा करताना एका चौरंगावर तांदूळ पसरवावेत. त्यावर हळद-कुंकवाने अष्टदळ काढावे. त्यावर लक्ष्मीची मूर्ती ठेवावी. मूर्ती नसल्यास सोने-चांदी नवीन नोटा, भरपूर नाणी ठेवावीत; पण ही सर्व संपत्ती आपण स्वत:च्या कष्टाने, प्रामाणिकपणे कमविलेली असावी. चोरी, दुसर्‍याचा अपहार करून आणलेले द्रव्य येथे ठेवू नये. यासोबत आपल्या घरातील धनपेटी, दुकानातील तिजोरी, बँकेच्या व्यवहारांची कागदपत्रे या सर्वांचीही पूजा केली जाते. अमावस्या ज्या दिवशी संध्याकाळी आहे, त्या दिवशी सकाळी सर्वांनी लवकर उठून मंगलस्नान करावे. देवपूजा करावी. पंचपक्‍वान्‍नांचा नैवैद्य आपल्या घरातील कुलदेवतेला दाखवावा.

सर्वांनी दुपारी आनंदाने भोजन करावे आणि दुपारनंतर लक्ष्मीपूजनासाठी घर सजवावे. सूर्यास्ताच्या वेळी विधियुक्‍त लक्ष्मीची पूजा करावी आणि तिचे कृपाशीर्वाद घ्यावेत.  मनातील सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी, अप्राप्त लक्ष्मी प्राप्त होण्यासाठी, प्राप्त लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी लक्ष्मीची प्रार्थना करावी. लक्ष्मीपूजनासाठी गायीच्या दुधाचा खवा, साखर, लवंग, वेलची एकत्र केलेला प्रसाद, धने, गूळ, साळीच्या लाह्या, बत्तासे इत्यादी पदार्थ ठेवावेत, अशी परंपरा आहे. या दिवशी क्षुधापीडितांना अन्‍नदान करावे, असे शास्त्रांत सांगितले आहे. लक्ष्मीपूजनापूर्वी ज्याप्रमाणे स्वच्छता करून अलक्ष्मी निःसारण केले जाते, तसेच रात्री जागरण करून मध्यरात्रीनंतर सुपे आणि दिमडी वाजवून अलक्ष्मीला हाकलून द्यावे, असेही धर्मशास्त्रात सांगितले आहे. 

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कुबेराचीही पूजा केली जाते. कुबेर हा परमेश्‍वराच्या संपत्तीचा रक्षणकर्ता मानला जातो. विश्‍वाच्या अगणित दौलतीचा हा व्यवस्थापक असून, त्याला संपत्तीचा मोह नाही. म्हणून निर्लोभी, स्थितप्रज्ञ, संयमी, कुबेराचे पूजन या तिथीला केले जाते. यासाठी ‘धनदाय नमस्तुभ्यंनिधीपद्माधिपा। भवन्तु त्वत्प्रसादेन धनधान्यादी सम्पद:।’ अशी प्रार्थना केली जाते. याचा अर्थ निधी व पद्म यांचा अधिपती असलेल्या कुबेरा तुला माझा नमस्कार असो. तुझ्या कृपेने मला धन-धान्यादी प्राप्त होवो व रक्षितही होवो,अशी स्तुती केली जाते. कुबेर हा यक्षांचा राजा होता. धनाचा रक्षणकर्ता होता. 

स्त्री प्रधान कुटुंबात स्त्रियांनी लक्ष्मीपूजन करण्याची प्रथा आहे. जशी सौभाग्यवती स्त्री असावी, तशीच सर्व प्रकारच्या संपत्तीचे प्रतीक म्हणून लक्ष्मीपूजन करावे. संतान लक्ष्मी, विद्यालक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धनलक्ष्मी, ऐश्‍वर्यलक्ष्मी, गजलक्ष्मी अशी अनेक रूपे लक्ष्मीची आहेत.  लक्ष्मीपूजन हा प्रामुख्याने व्यापारी लोकांचा सण. त्यामुळेच या दिवशी व्यापारी पेठा खूप सजलेल्या असतात. सर्व दुकानांमध्ये लक्ष्मीपूजनाची तयारी सुरू असते. व्यापारी लोक आपल्या हिशेबाच्या वह्यांची, लेखन साहित्याची पूजा करून व्यापार वृद्धिंगत व्हावा, यासाठी प्रार्थना करतात. धनामुळे समाजाचा आणि राष्ट्राचा उत्कर्ष होतो, असा महाभारतात उल्लेख सापडतो.