Sun, Aug 18, 2019 06:25होमपेज › Kolhapur › कोल्‍हापुरात कावळा नाक्‍यावर पाण्यासाठी एल्गार

कोल्‍हापुरात कावळा नाक्‍यावर पाण्यासाठी एल्गार

Published On: Feb 12 2019 10:49AM | Last Updated: Feb 12 2019 10:49AM
कोल्‍हापूर : पुढारी ऑनलाईन

कोल्हापूर दक्षिण मधील राजीव गांधी वसाहत, लोणार वसाहत, तारा मिल वसाहत येथील नागरिकांनी पिण्याच्या पाण्यासाठी कावळा नाका येथे आंदोलन केले आहे. या परिसरातील लोकांना गेल्या दीड वर्षांपासून रात्री अपरात्री पाणी भरण्यासाठी उठावे लागत आहे. शिवाय या भागासाठी पाणी पुरवठा करणारी पाईपलाइन केवळ ४ ईंचाची असल्याने लोकसंख्येच्या प्रमाणात पाण्याचा पुरवठा होत नाही. त्‍यामुळे येथील नागरिकांना पाण्याची कमतरता भासत आहे. त्‍यामुळे हे आंदोलन करण्यात आल्‍याचे काही नागरिकांनी सांगितले. 

या संदर्भात वेळोवेळी मनपा प्रशासनाला प्रस्ताव आणि निवेदने देण्यात आली होती. परंतु, पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी याकडे कानाडोळा केल्याने या भागातील लोकांनी आज कावळा नाका येथे हातात पाण्याच्या घगरी घेवून रास्‍तारोको आंदोलन केले. 

रास्तारोको आंदोलनाची माहिती मिळताच शाहूपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी बी. एस देशमुख आणि बालाजी भांगे यांच्यासह पोलिस फौज फाटा घटनास्थळी दाखल झाला. यावेळी लोकांच्या भावनांचा विचार करत पोलिस अधिकारी देशमुख यांनी जल अभियंता कुलकर्णी यांना बोलावून घेऊन सर्व माहिती जाणून घेतली व या भागातील पाण्याचा प्रश्न सोडविण्याचे लेखी आश्वासन देण्यास सांगितले. त्‍यानुसार जल अभियंता कुलकर्णी यांनी या भागातील लोकांच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्याचे लेखी आश्वासन दिले. त्‍यांच्या अश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. 

दरम्‍यान, पुढील ८ दिवसांत पाण्याचा प्रश्न सुटला नाही तर पुन्हा रस्त्यावर उतरू असा नागरिकांनी अधिकाऱ्यांना इशारा दिला आहे.