Tue, Sep 17, 2019 04:38होमपेज › Kolhapur › युती-आघाडीचा अद्यापही सवतासुभा

युती-आघाडीचा अद्यापही सवतासुभा

Published On: Apr 11 2019 2:03AM | Last Updated: Apr 11 2019 1:56AM
कोल्हापूर : सुनील सकटे

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना जिल्ह्यातील प्रचार यंत्रणेत मात्र फारसा वेग दिसून येत नाही. भाजप-सेना युती असो अथवा काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी... या दोघांमध्येही वैयक्‍तिक पक्षांतर्फे प्रचार सुरू आहे. त्यामुळे युती-आघाडीने ‘एकला चलो रे’ची हाक दिल्याने अद्यापही युती-आघाडीचा सवतासुभा दिसून येत आहे. रिपब्लिकन पक्षातील विविध गटांसह छोट्या पक्षांना प्रचार शुभारंभापुरते स्थान दिल्याचे चित्र आहे.

शिवसेना, भारतीय जनता पक्ष आणि रिपाइं यांची युती असून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, रिपब्लिकन पार्टी गवई आणि कवाडे गट, दलित महासंघ यांची आघाडी आहे. युतीतर्फे प्रा. संजय मंडलिक, तर आघाडीतर्फे राष्ट्रवादीचे खा. धनंजय महाडिक निवडणूक रिंगणात आहेत. युती झाली असली, तरी अनेक गट एकमेकांशी फारसे संपर्कात नसल्याचे दिसून येते. तर जिल्ह्यातील भाजप-शिवसेना नेत्यांतील पूर्वीचा अंतर्गत संघर्ष पूर्णपणे संपलेला नाही. त्यामुळे शिवसेना आणि भाजप यांचे कार्यकर्ते आणि नेते स्वतंत्र पक्षीय पातळीवर प्रचार यंत्रणा राबविली जात आहे. भारतीय जनता पक्ष समाजातील विविध घटकांचे स्वतंत्र मेळावे घेऊन आपले कर्तव्य पार पाडत आहे. तर शिवसेना विभागनिहाय सभा दौरे घेऊन प्रचार यंत्रणा अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न करीत आहे. प्रा. संजय मंडलिक यांनीही मंडलिक गट म्हणून काही कार्यकर्ते सक्रिय ठेवले आहेत. 

एकीकडे युतीत हे चित्र असताना दुसरीकडे आघाडीतही फारसा फरक नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी आपापल्या पक्षीय पातळीवर सभा बैठका, मेळावे यांचे  नियोजन केले आहे; मात्र आघाडी म्हणून दोन्ही काँग्रेसने एकत्र प्रचार सभा दिसून येत नाहीत. तर उमेदवार खा. धनंजय महाडिक यांनीही महाडिक गट आणि महाडिक युवा शक्‍ती आणि भगीरथी महिला संघटनेतर्फे प्रचाराचा धडाका सुरू ठेवला आहे. या संपूर्ण वातावरणातून जिल्ह्यात  निवडणूक लोकसभेची असली तरी  वातावरण मात्र विधानसभेचे दिसून येत आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात आपले प्राबल्य दाखविण्याचा प्रयत्न नेत्यांनी या निमित्ताने केल्याचे दिसून येत आहे.

युती आणि आघाडी दोघांनीही आपल्या प्रचाराचा शुभारंभ कोल्हापुरात केला. या प्रचार शुभारंभास मात्र सर्वपक्षीय स्वरूप देण्यात आले. त्यानंतर एकही सभा अथवा मेळावा संयुक्‍त झाल्याचे दिसून येत नाही. एकीकडे प्रमुख पक्षच एकत्र नसल्याने घटक पक्षांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना काय स्थान असेल, याची कल्पना येते. रिपब्लिकन पक्षाचे विविध गट, दलित महासंघ, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्या कार्यकर्त्यांना अपवाद वगळता कुठेही स्थान दिले जात नसल्याची तक्रार या पक्षांतील कार्यकर्ते खासगीत बोलताना करू लागले आहेत. 

WhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/DmOJLDvGACrHCXh0bqURex