Tue, Sep 17, 2019 03:36होमपेज › Kolhapur › गुढीपाडव्यापर्यंत ऑनलाईन सात-बारा

गुढीपाडव्यापर्यंत ऑनलाईन सात-बारा

Published On: Jan 28 2018 1:34AM | Last Updated: Jan 27 2018 9:57PMकोल्हापूर : प्रतिनिधी

राज्यातील 43 हजार गावांतील 1 कोटी 27 लाख शेतकरी खातेदारांना येत्या गुढीपाडव्यापर्यंत ऑनलाईन सात-बारा देण्याची घोषणा राज्याचे महसूलमंत्री व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी केली. 69 व्या प्रजासत्ताकदिनी पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. छत्रपती शाहू स्टेडियम येथे ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ झाला. 

पाटील म्हणाले, राज्यातील 30 हजार गावांचे ऑनलाईन सात-बाराचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित 13 हजार गावांचे काम येत्या गुढीपाडव्यापर्यंत पूर्ण करण्याचा मानस आहे. राज्यात 5 हजार तलाठी सज्जे आणि 500 सर्कल वाढविण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला असून, 500 सज्जांच्या कार्यालयांचे बांधकाम सुरू केले आहे. याबरोबरच ग्रामीण आणि शहरी भागातील सर्वसामान्य माणसाला दिलासा देण्याच्या द‍ृष्टीने 500 चौरस फूट शासकीय जागांवरील अतिक्रमण अधिकृत करण्याचा निर्णय घेतला आहे. गावांचे गावठाण 200 मीटरने वाढविण्याचा निर्णयही शासनाने घेतला आहे. 

राज्यात गेल्या तीन वर्षांत रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यास शासनाने प्राधान्य दिले असून, येत्या तीन वर्षांत राज्यातील 38 हजार किलोमीटरचे रस्ते 3 पदरी, 4 पदरी आणि 6 पदरी करण्यात येणार असल्याचे सांगत ते म्हणाले, राष्ट्रीय महामार्गावर गेल्या तीन वर्षांत 22 हजार किलोमीटरचे रस्ते हाती घेतले असून, येत्या 2 वर्षात या रस्त्यांचे 4 पदरीकरण पूर्ण केले जाईल. गुणवत्तापूर्ण व राष्ट्रीय दर्जाचे रस्ते उभारण्यासाठी हायब्रीड न्यूईटी मॉडेल तयार करण्यात आले असून, याद्वारे 10 हजार किलोमीटर रस्त्यांचे 3 पदरीकरणाचे काम केले जाईल. 6 हजार 500 किलोमीटरचे 6 पदरी रस्ते करण्यात येणार आहेत. कुठलाही रस्ता यापुढे 10 वर्षे खराब होणार नाही याची दक्षता घेतली जात आहे. राज्याचे ज्येष्ठ नागरिक धोरण तयार करण्यात येत असून, ते लवकरच जाहीर केले जाईल, यामध्ये ज्येष्ठ नागरिकांची वयाची अट 65 वरून 60 करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

देशाच्या इतिहासातील सर्वात मोठी कर्जमुक्‍ती राज्य शासनाने दिली असल्याचे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, या कर्जमुक्‍तीअंतर्गत कर्जमाफी व नियमित कर्जफेड केलेल्या 89 लाख शेतकर्‍यांना अनुदान घोषित केले आहे. आतापर्यंत 57 लाख शेतकर्‍यांच्या बँक खात्यांमध्ये 22 हजार कोटी रुपये कर्जमाफीची रक्‍कम जमा करण्यात येत असून, आतापर्यंत तर 32 लाख शेतकर्‍यांच्या बँक खात्यांवर 18 हजार कोटींची कर्जमाफीची रक्‍कम जमा केली आहे. या कर्जमाफीतून योग्य आणि पात्र शेतकर्‍यांनाच लाभ मिळेल याची दक्षता घेण्यात आली आहे. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील 1 लाख 3 हजार 923 शेतकर्‍यांना 215 कोटी रुपये कर्जमाफीपोटी देण्यात आले आहे. देशाच्या इतिहासातील सर्वात मोठी कर्जमाफी असल्याचेही त्यांनी सांगितले. लोकशाही संवर्धन, संरक्षण आणि बळकटीकरणासाठी निवडणूक आयोगामार्फत लोकशाही,निवडणूक व सुशासन या विषयावर 26 जानेवारी ते 10 फेब्रुवारी या कालावधीत लोकशाही पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. या महत्वाच्या कार्यक्रमात जिल्हयातील जनतेने सक्रीयपणे सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

उत्साहपूर्ण वातावरणात ध्वजारोहण संपन्न
ध्वजवंदनाच्या मुख्य शासकीय समारंभात पाटील यांच्याहस्ते ध्वजारोहण झाले. त्यानंतर त्यांनी संचलनाची पाहणी करुन मानवंदना स्वीकारली. पोलीस दल, गृहरक्षक दल, अग्निशमन दल, एन. सी. सी., आर. एस. पी. विद्यार्थी, नेव्ही एन.सी.सी., आर.एस.पी., तारा कमांडो फोर्स, स्काऊट गाईड पथक,  व्हाईट आर्मी, फायर इंजिनिअरिंग पथक, पोलीस बँड, श्वान पथक, सह्याद्री कॅडेट फोर्स, दंगल नियंत्रण, वज्र वाहन पथक यांनी शानदार संचलन करुन पाहुण्यांना मानवंदना दिली. शहर व जिल्ह्यातील विविध शालेय विद्यार्थी-विद्यार्थींनीच्या विविध पथकांकडूनही पाहुण्यांनी मानवंदना स्वीकारली. यावेळी विविध विभागांनी आकर्षक व लक्षवेधी चित्ररथ सादर करुन उपस्थितांची मने जिंकली.  निर्भया पथक, तंटामुक्त अभियान, वनीकरण, शिक्षण, आरोग्य, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, सर्व शिक्षा अभियान, आपत्ती व धोके व्यवस्थापन, स्वच्छ भारत अभियान, बेटी बचाओ बेटी पढाओ, 108 रुग्णवाहिका, व्हाईट आर्मी, विविध शाळांच्या लक्षवेधी चित्ररथांचा यामध्ये समावेश होता. यानंतर जिल्ह्यातील शालेय विद्यार्थी, विद्यार्थींनी पोवाडा, समुह नृत्य, समुह गीत असे विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. पाटील यांनी उपस्थित स्वातंत्र सैनिकांची भेट घेवून त्यांना गुलाब पुष्प देवून प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या तसेच मान्यवर आणि विद्यार्थी, विद्यार्थींनीचीही भेट घेवून त्यांनाही प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.  

या सोहळ्याला  महापौर स्वाती यवलुजे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक, ज्येष्ठ नेते डॉ. एन.डी.पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अविनाश सुभेदार, जिल्हा पोलीस अधीक्षक संजय मोहिते, महापालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार, अतिरिक्त पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सदाशिव साळुंखे आदी मान्यवर आणि ज्येष्ठ स्वातंत्र सैनिक उपस्थित होते.
 


 


WhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/DmOJLDvGACrHCXh0bqURex