Mon, Sep 16, 2019 05:31होमपेज › Kolhapur › नव्या रिंगरोडच्या कामास गती

नव्या रिंगरोडच्या कामास गती

Published On: Apr 09 2018 1:32AM | Last Updated: Apr 08 2018 10:57PMकोल्हापूर : सुनील सकटे

कोल्हापूर शहरातील वाहतुकीचा प्रश्‍न लक्षात घेऊन अवजड वाहनांसह अन्य वाहतूक शहराऐवजी परस्पर शहराबाहेरून वळविण्यासाठी प्रस्तावित केलेल्या रिंगरोडच्या कामास गती आली आहे. या भूसंपादनासह काही ठिकाणी रस्त्यांची कामे वेगाने सुरू झाली आहेत. 

नवा रिंगरोड 88 कि.मी.चा असून 357 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षीत आहे.  61 हेक्टर जमीन संपादन करण्यात येणार आहे.  केर्ली ते टोप हा नवीन राष्ट्रीय महामार्गही या रिंगरोडमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. त्यामुळे 397 कोटींपैकी 100 कोटी रुपयांचा खर्च कमी होणार आहे. नव्या रिंगरोडच्या भूसंपादन आणि रस्ते कामासाठी  सुमारे 240 कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे. यापैकी भूसंपादनासाठी 20 कोटी तर रस्ते करण्यासाठी 19 कोटी 54 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या वीस कोटी रुपयांतून कणेरी, गोकुळ शिरगाव, महे, खुपिरे, वरणगे या गावांतून जाणार्‍या लांबीसाठी बाह्य वळणमार्ग तयार करण्याचे काम प्रगतीत आहे. 19 कोटी 54 लाख रुपयांच्या निधीतून रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत. सुमारे साडेएकोणीस कोटींच्या निविदा निश्‍चित झाल्या आहेत. यापैकी गिरगाव, नंदवाळ, वाशी, कोगे या गावांतील रस्त्यांची कामे सुरू झाली आहेत. रिंगरोडमध्ये 137 ठिकाणी मोर्‍या बांधण्यात येणार आहेत, तर नऊ ठिकाणी लहान पूल बांधण्याचे नियोजन आहे. 

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवरील पेट्रोल पंप, कणेरीवाडी, कणेरी, गिरगाव, कात्यायणी, नंदवाळ, वाशी, पाडळी, कोगे, कुडित्रे फॅक्टरी, वाकरे फाटा, खुपीरे, यवलूज, वरणगे, पाडळी, केर्ली, निगवे, भुये, शिये, टोप, नागाव, मौजे वडगाव, रुकडी फाटा, रुकडी बंधारा, चिंचवाड, वसगडे सांगवडे, हलसवडे, विकासवाडी आणि जाजल पेट्रोल पंप असा नव्या रिंगरोडचा आराखडा तयार केला आहे. एकूण 88.176 किलोमीटर लांबीच्या या  रोडपैकी 67 किलोमीटर लांबीच्या सध्या वापरातील रस्त्यांचा विकास करून  रिंगरोड बनविला जाणार आहे.  

अस्तित्वातील रस्ते गावातून जात असल्याने पुन्हा तेथे वाहतूक वर्दळीचा धोका होऊ नये याची खबरदारी घेऊन 21 कि.मी. लांबीचा नवा रस्ता त्या त्या गावाबाहेरून बायपास करून रिंगरोड जोडला जाणार आहे. रिंगरोडची एकूण रुंदी दहा मीटर राहणार असून त्यापैकी तब्बल सात मीटर डांबरी रस्ता बनविला जाणार आहे. रिंगरोडमध्ये पंचगंगा नदीचे पात्र तीन ठिकाणी आडवे येत असल्याने कोगे, रुकडी आणि केर्ली या तीन ठिकाणी मोठे पूल बांधण्यात येणार आहेत.