Fri, Sep 20, 2019 22:31होमपेज › Kolhapur › नवस फेडला, पण काळाने डाव साधला

नवस फेडला, पण काळाने डाव साधला

Published On: Jan 28 2018 1:34AM | Last Updated: Jan 28 2018 1:06AMपुणे : प्रतिनिधी

मुलगा झाला... त्याचे नाव ठेवले... गणपतीवरील नितांत श्रद्धेपोटी मुलासाठी नवस बोलला होता... त्याचा गणपतीला बोललेला नवस फेडण्यासाठी प्रजासत्ताक दिनाची सुट्टी साधून कुटुंबीय गणपतीपुळे येथे गेले. मात्र, नवस फेडल्यानंतर अख्ख्या कुटुंबावरच काळाने घाला घातला. अन् पुण्यातील केदारी, वरखडे व नांगरे या नातेवाईक कुटुंबातील बारा जणांसह चालकाचा मृत्यू झाल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना शुक्रवारी रात्री कोल्हापूर येथे घडली. शोकाकुल वातावरणात शनिवारी सायंकाळी तीनही कुटुंबातील बारा जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

केदारी कुटुंबीय पुण्यातील बालेवाडी परिसरात राहतात. या कुटुंबातील भरत केदारी व मंदा केदारी यांची मुले सचिन केदारी व दिलीप केदारी, मनीषा वरखडे आणि छाया नांगरे टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय करत होता. त्याची वाहने वेगवेगळ्या कंपन्यांना सेवा देतात, तर मनीषा वरखडे व त्यांचे कुटुंब पिरंगुट येथे राहतात.

छाया नांगरे या बालेवाडीतच केदारी कुटुंबीयांसोबत राहण्यास आहेत. सचिन याच्या मुलाच्या जन्माचा नवस फेडण्यासाठी सचिन केदारी, त्याची पत्नी, मुले, त्याची आई, दोन बहिणी आणि त्यांची मुले अशा सोळा जणांनी गणपतीपुळे येथे जाण्याचे नियोजन केले. सचिनकडे लहान वाहने असल्याने त्यात एवढी माणसे बसणार नाहीत म्हणून त्यांनी डोणजे येथील साई टूर्सची टेम्पो ट्रॅव्हलर भाड्याने नेली. 
गुरुवारी रात्री ते पुण्याहून गणपतीपुळे येथे जाण्यासाठी निघाले होते. दरम्यान, शुक्रवारी गणपतीपुळे येथे दर्शन घेऊन कुटुंबीय कोल्हापुरात आले. मात्र, कोल्हापूर येथील पंचगंगेवरील शिवाजी पुलाच्या कठड्याला धडकून टेम्पो ट्रॅव्हलर रात्री नदीत कोसळली. 

भाऊ...भावड्या कुठे आहे, मला दाखवा
पहाटे पाचच्या सुमारास भरत केदारी सीपीआरमध्ये आले. प्रथम त्यांनी जखमी असलेल्या पत्नीची भेट घेतली. यावेळी पत्नीने आपल्या मुलांची विचारपूस केली. भावड्या (सचिन) कुठे आहे, माझ्या पोरी, सगळे कुठे आहेत, अशी विचारणा केली. त्यावर केदारी यांनी सर्व जण सुखरूप असल्याचे सांगितले. मात्र, त्यांच्या चेहर्‍यावरचे भाव पाहून, पत्नी मंदाने आता माझा जगून काय उपयोग आहे, मला मरण का येत नाही, असा सवाल करताच उपस्थितांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या. 

दिवसभर शिवाजी पुलावर बघ्यांची गर्दी
शिवाजी पुलावरून ट्रॅव्हलर कोसळल्याची बातमी वार्‍यासारखी जिल्ह्यात पसरतील. शहरातील व परिसरातील गावातील नागरिकांनी शनिवारी शिवाजी पुलावर अपघात ठिकाण पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती. ट्रॅव्हलरच्या धडकेत कोसळलेल्या कठड्याचे काम त्वरित सुरू केले आहे. येथे पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात ठेवण्यात आला आहे. पुलावरील अवजड वाहतूक पूर्णत: बंद करून अन्य पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू ठेवली आहे.

पुलावरील पथदिवे बंदच
गेल्या अनेक दिवसांपासून शिवाजी पुलावरील पथदिवे बंद अवस्थेतच आहेत. काही खांब सडलेल्या अवस्थेत असून पथदिवे बंद आहेत. ट्रॅव्हलर कोसळल्यानंतर पथदिवे बंद असल्याने मदतकार्यास अडथळा निर्माण झाला. मोबाईलच्या उजेडात मदतकार्य सुरू होते.

शहरवासीयांकडून मायेची ऊब
या अपघातानंतर मोठ्या संख्येने नागरिक शिवाजी पूल आणि सीपीआर रुग्णालय येथे जमले होते. अपघातातील जखमींना धीर देण्याचे काम काही तरुण करत होते. त्याचबरोबर नातेवाईकांशी संपर्क करत, त्यांना माहिती देत होते. नातेवाईक सीपीआरमध्ये आल्यानंतरही शहरातील तरुण, सामाजिक कार्यकर्ते आदी त्यांना धीर देत होते.

पुण्यासाठी घातवार
प्रजासत्ताक दिनाला जोडून आलेली सुट्टी पुण्यासाठी मात्र घातवार ठरली.पुणे परिसरात अपघात झाले नसतानाही राज्याच्या इतर भागात झालेल्या अपघातातील प्राणहानीमुळे पुणेकरांची सुट्टी शोकसागरात बुडून गेली.