Tue, Sep 17, 2019 03:37होमपेज › Kolhapur › लाखभर युवकांनी उभारले ‘मुद्रा’तून उद्योग-व्यवसाय

लाखभर युवकांनी उभारले ‘मुद्रा’तून उद्योग-व्यवसाय

Published On: Dec 08 2017 1:37AM | Last Updated: Dec 08 2017 12:40AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : विजय पाटील

जामीन नाही...तारण नाही... दहा हजारांपासून दहा लाखांपर्यंत योग्य प्रस्ताव देणार्‍यांना विनाअट कर्ज...अशा सुलभतेमुळे केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुद्रा योजनेतून  जिल्ह्यात जवळपास लाखभर बेरोजगारांना वर्षभरात 560 कोटी रुपयांचे कर्जवाटप झाले. याचाच अर्थ ‘मुद्रा’च्या माध्यमातून  जिल्ह्याच्या नव्या उद्योग-व्यवसायांत वर्षभरात कोट्यवधींची गुंतवणूक झाल्याचे सकारात्मक चित्र आहे. दुसरीकडे मात्र या योजनेमुळे नेमके किती स्वयंरोजगार निर्माण झाले आणि यातून किती रोजगार निर्मिती झाली, याबाबत  ठोस आकडेवारी नसल्याने संभ्रमावस्था दिसून येते.

विनातारण कर्ज योजना हा मुद्रा योजनेचा महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळेच लहान-मोठ्या व्यवसायांसाठी तसेच जुन्या व्यवसायांच्या विस्तारासाठी अनेकांनी या माध्यमातून कर्ज घेतले. बँकांना कर्ज देणे बंधनकारक असल्याने कर्जवाटपही मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसून येते. प्रस्तावांची पडताळणी करून कर्ज वाटप आणि त्यानंतर वसुली इतपतच बँकांची भूमिका मर्यादित असेल, हे स्पष्ट आहे; पण ज्यांना कर्जवाटप केले. त्यांचे व्यवसाय कसे सुरू आहेत आणि त्यातून पुन्हा नवी रोजगारनिर्मिती किती झाली, याबाबत कुठल्याच टप्प्यावर आकडेवारी जमा केली जात नाही. त्यामुळे या योजनेचा काही जणांकडून गैरफायदासुद्धा घेतला जात असल्याची शक्यता आहे. कारण, लाखभर बेरोजगारांना कर्ज वाटप होत असेल तर या योजनेचा अंतिम रिझल्ट स्पष्ट असायला हवा. कारण, यामुळे एकूणच स्वयंरोजगार आणि नवीन रोजगार निर्मिती या अत्यंत ज्वलंत असणार्‍या समस्यांचा लेखाजोखा तयार होईल.  यामुळे जिल्ह्याच्या एका टप्प्यातील प्रगतीचा आलेखही दिसून येईल; पण नेमकी याबाबतची माहितीची स्पष्ट नोंद नसल्याचे दिसून येते. 

ग्रामीण भागांतील अनेकांनी या योेजनेचा लाभ घेत नवीन व्यवसाय सुरू केले असल्याचे चित्र आहे. तर दुसर्‍या बाजूला अनेकांनी कर्ज घेतले; पण त्यांचा व्यवसाय कुणीकडे आहे, याबाबत ठोस माहिती यंत्रणेला नाही. कारण, कर्ज मंजुरीपूर्वी फिल्ड व्हिजिट झाली; मात्र नंतर कोणी संबंधितांकडे फिरकण्याची व्यवस्थाच यात नसल्याचे दिसते. मुद्रा योजनेचा पाठपुरावा ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट असल्याने याकडे आता प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

कर्ज नाकारण्याचे प्रमाण वाढले
कर्जवाटपाचे प्रमाण चांगले असले तरी अनेकांना कर्ज नाकारले गेल्याच्या तक्रारीही आहेत. इचलकरंजी परिसरात कर्ज नाकारल्याच्या तक्रारींचे प्रमाण जास्त आहे. पाच ते दहा लाखांपर्यंत तरुण योजनेंतर्गत दिले जाणारे कर्ज हे जुन्या व्यावसायिकांच्या  व्यवसाय विस्तारासाठी दिले जात असल्याच्याही तक्रारी आहेत. 

97,887 जणांना कर्ज वाटप
‘मुद्रा’च्या शिशू योजनेंतर्गत 90 हजार 389 तरुणांना 227 कोटी 67 लाख रुपये, किशोर योजनेंर्गत 5 हजार 216 जणांना 116 कोटी 49 लाख रुपये, तर तरुण योजनेंतर्गत 2 हजार 282 तरुणांना 216 कोटी 55 लाख रुपये यंदा वितरित करण्यात आले आहेत.

 होतकरू तरुणांनी उद्योजक बनावे या हेतूने मुद्रा बँक योजना केंद्र सरकारने सुरू केली आहे; परंतु काही बँका या योजनेचे प्रस्ताव नाकारत असल्याचे समोर आले आहे. काही वित्तीय संस्थांकडून अव्वाच्या सव्वा दराने कर्ज दिले जात आहे. चुकीच्या गोष्टी तत्काळ बंद व्हायला हव्यात.      
- आ. सुरेश हाळवणकर
 

WhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/DmOJLDvGACrHCXh0bqURex