Tue, May 26, 2020 18:25होमपेज › Kolhapur › मला बावडा बंद करणारे हे कोण? : महाडिक

मला बावडा बंद करणारे हे कोण? : महाडिक

Published On: Sep 15 2018 1:46AM | Last Updated: Sep 15 2018 1:46AMकोल्हापूर ः प्रतिनिधी

ज्या जिल्ह्यात मी 30 वर्षे सांगलीतून येऊन राज्य केले, त्या जिल्ह्यातील कसबा बावड्यात मला बंदी घालायचा अधिकार त्यांना कोणी दिला, असा सवाल शुक्रवारी माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी आ. सतेज पाटील यांचे नाव न घेता उपस्थित केला. कार्यकर्त्यांना पुढे करून इशारा देण्यापेक्षा तुम्ही मैदानात या, असे आव्हानही महाडिक यांनी यावेळी दिले.

शिवाजी चौक तरुण मंडळाच्या 21 फुटी गणेशमूर्तीचे उद्घाटन महाडिक यांच्या हस्ते झाले. हा कार्यक्रम राजकीय जुगलबंदीचा, असे समीकरणच ठरलेले आहे. आज या कार्यक्रमात फक्‍त महाडिक यांचेच भाषण झाले. त्यांनी पंधरा मिनिटांच्या भाषणात जोरदार टोलेबाजी केली. कार्यक्रमाला खा. धनंजय महाडिक, आ. राजेश क्षीरसागर, आ. चंद्रदीप नरके, पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव आदी उपस्थित होते.

महाडिक म्हणाले, बावड्यातील 90 टक्के लोक माझ्यावर प्रेम करणारे आहेत, मीही त्यांच्यावर प्रेम करतो. पन्‍नास टक्क्यांपेक्षा जास्त मतदान या लोकसभेला महाडिक घेऊन दाखवणार आहेत. येत्या लोकसभेचा बिगुल वाजू लागला आहे. धनंजय महाडिक या नावाचा अश्‍वमेध मी चार ते साडेचार महिन्यांनी सोडणार आहे. या अश्‍वमेधाचा लगाम धरायची हिंमत असेल तर त्यांनी धरून दाखवावा.

महाडिकाला आता मोठे होण्यात रस नाही. ज्या माणसांनी महाडिकाला मोठे केले, त्यांना मी मोठे करणार आहे. कारण, उपकाराची जाण ठेवणारी महाडिक फॅमिली आहे. सोलापूरपासून सांगली व कोल्हापूर अशा तीन जिल्ह्यांत महाडिकांचे राज्य चालते. कारण, प्रत्येकवेळी तिथला माणूस महान समजूनच आम्ही काम करत आलो, असेही ते म्हणाले.

मला कसबा बावडा बंद असल्याचे सकाळी पावणे आठला समजले. गाडी घेतली आणि ज्याने बावडा बंद करायला सांगितले, त्याच्या घरी गेलो. मला बावडा बंद केल्याचे दुःख नाही; पण काय कारण हे विचारण्यासाठीच मी त्यांच्या घरी गेलो होतो. लढायचे असेल तर माझ्याबरोबर लढा, कार्यकर्त्यांना मध्यस्थी घालून लढू नका, असे आव्हान देऊन महाडिक म्हणाले, राजारामचे माजी चेअरमन विश्‍वास नेजदार या माणसाबद्दल आपुलकी व प्रेम आहे. त्यांच्यासोबत मी दहा वर्षे काम केले आहे. म्हणून मी भेटायला गेलो. एकत्र दहा वर्षे काम केल्यामुळे विरोधक असला तरी भेटल्याने काही फरक पडत नाही, म्हणूनच मी गेलो. डॉ. नेजदार यांना विचारायला गेलो, तुम्हाला हे पत्रक काढायला कोणी सांगितले? तिथे गेल्यानंतर त्याला वेगळे वळण लागले. मलाही नेजदार यांना झालेली धक्‍काबुक्‍की आवडली नाही. म्हणून विश्‍वास पाटील यांनाही दिलगिरी व्यक्‍त करायला सांगितले.

ते म्हणाले, महाडिकांसोबत रडीचा डाव खेळण्यापेक्षा ज्या कोल्हापूरच्या जनतेला शंभर पंप बसवून पाण्याची चित्रे दाखवली. गंगेतून  कावडीने पाणी आणून एकनाथ महाराजांनी गाढवांना पाणी पाजले. कोल्हापूरची जनता पाणी पाणी करते, ते पाणी तरी लोकांना द्या. 

लोकसभेची निवडणूक सहा महिन्यांवर आहे. काय पद्धतीने जायचे, हे महाडिक कुटुंबीय एकत्र बसून ठरवतात. आमच्या आई-वडिलांनी काही मर्यादा आखून दिल्या आहेत, त्याचे उल्लंघन आम्ही कधी करत नाही, असे सांगून महाडिक म्हणाले, कोल्हापूरच्या जनतेचे पाय धुऊन पाणी प्याले, तरी त्याची परतफेड होणार नाही, एवढे उपकार या जिल्ह्याचे महाडिक कुटुंबीयांवर आहेत.

स्वागत नितीन पाटील यांनी केले. प्रास्ताविक प्रसाद वळंजू यांनी केले. यावेळी माजी महापौर नंदकुमार वळंजू यांचेही भाषण झाले. यावर्षीची मूर्ती दिलेले शामराव पुकळे, राजेश खताळ यांचा, राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आर. के. पोवार यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला उद्योजक शंकर पाटील, स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे उपस्थित होते. सूत्रसंचालन जयवंत वळंजू यांनी केले.

होय, भाजपला मदत केली

भाजपला मदत केली, मोठे केले, हे सत्य आहे. ही बुद्धी या गणपतीनेच दिली. जी बुद्धी देतो, ते सर्व कडेला नेतो, अडचणीत सोडत नाही. या गणपतीचा हात कोणी धरू शकत नाही, असेही महाडिक म्हणाले.

महाडिक वेगळं रसायन  

महाडिक म्हणाले, महाडिकांच्या हातावर रेषा आहेत. विचित्र रेषा आहेत. एक रेषा दक्षिण-उत्तर, एक पूर्व-पश्‍चिम दिसते; पण त्या महाडिकांच्या मुठीत आहेत. त्या पाहून कोणीही महाडिकांचे भविष्य सांगणार नाही. महाडिक एक आगळे-वेगळे रसायन आहे. कुठल्याही शास्त्रज्ञाने हे रसायन कसे बनले, हे शोधून काढण्याचा प्रयत्न करू नये. हे फार विचित्र आणि न सोसणारे रसायन आहे. आम्ही कोणाला त्रास देत नाही. ज्यांनी ज्यांनी मदत केली, त्या छोट्यातील छोट्या माणसाला मदत करतो. 

पुढील वर्षापासून उद्घाटनात येणार रंगत

महाडिक यांच्या हस्ते दरवर्षी गणेशमूर्तीचे उद्घाटन होते. परंतु, पुढील पाच वर्षे आ. सतेज पाटील हे गणेशमूर्तीचे देणगीदार आहेत. देणगीदारांचा सत्कार करण्याची मंडळाची परंपरा आहे. त्यामुळे उद्घाटनाच्या कार्यक्रमात रंगत येणार आहे. 2019, 2020, 2022, 2023 व 2024 सालातही पाटील यांच्या वतीनेच मूर्ती दिली जाणार आहे. 

झोपलेल्या वाघावर गोळी घालत नाही

सगळ्यांनी मला वॉर्निंग दिली होती. शेपूट राहिली आहे. शेपूट महत्त्वाचे, ज्याच्या हातात शेपूट तोच मालक असतो. महाडिकांना वाघ उठवून शिकार करायची सवय आहे, झोपलेल्या वाघांवर महाडिकांनी कधी गोळी घातली नाही, असेही महाडिक म्हणाले.

शिराळ्यामधून सम्राट महाडिक 

याच कार्यक्रमाला महाडिक यांचे पुतणे सम्राट महाडिक उपस्थित होते. त्यांना व्यासपीठावर बोलवण्यात आले. शिराळा विधानसभा मतदार संघात सम्राट हे आमचे उमेदवार असतील, अशी घोषणा महाडिक यांनी केली.