होमपेज › Kolhapur › कोल्हापुरात पाण्याची गळती तब्बल ६९ टक्के

कोल्हापुरात पाण्याची गळती तब्बल ६९ टक्के

Published On: Nov 15 2017 2:06AM | Last Updated: Nov 15 2017 1:26AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : सतीश सरीकर

कोल्हापूर शहराला होणार्‍या पाणीपुरवठ्यातील गळती सुमारे 15 टक्के, 20 टक्के किंवा जास्तीत जास्त 25 टक्के असल्याचे अधिकारी सांगतात. परंतु, ही आकडेवारी साफ चुकीची असून, पाण्याची गळती तब्बल 69.73 टक्के असून, फक्त 29.38 टक्के पाण्याचेच बिलिंग होते. तर 0.89 टक्के पाणी अनधिकृतरीत्या वापरले जाते.

पुण्यातील कंपनीकडून वॉटर ऑडिट करून घेतल्यानंतर पाणीपुरवठ्यामधील गळतीची पहिल्यांदाच ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला त्यासंदर्भातील अहवाल नुकताच देण्यात आला आहे.

शहराची लोकसंख्या सुमारे 5 लाख 94 हजार आहे. त्यासाठी रोज 198.21 एमएलडी  पाण्याचा उपसा होतो. पंचगंगा नदीतून 112.15, भोगावती नदीतून 77.22, कळंबा तलावातून 8.83 एमएलडी उपसा केला जातो. पंचगंगा नदीतील पाण्याचा उपसा शिंगणापूर केंद्रातून, तर भोगावती नदीमधील उपसा बालिंगा आणि नागदेववाडी उपसा केंद्रातून केला जातो.

एक एमएलडी म्हणजे (मिलियन लिटर्स पर डे) दहा लाख लिटर्स. 198.23 एमएलडी म्हणजे महापालिका प्रशासन रोज 19 कोटी 80 लाख लिटर्स पाण्याचा उपसा करते. त्यापैकी फक्त 5 कोटी 88 लाख 21 हजार लिटर्स पाण्याचे बिलिंग होते. सुमारे 1 कोटी 76 लाख लिटर्स पाण्याचा अनधिकृतपणे वापर केला जातो. सुमारे 13 कोटी 92 लाख लिटर्स पाणी गळतीतून वाया जाते. नदीतील उपसा केंद्रापासून फिल्टर हाऊसपर्यंत जाणार्‍या जलवाहिन्यांतून सुमारे 12 कोटी 35 लाख लिटर्स पाण्याची गळती होते. फिल्टर हाऊसमधील बॅकवॉशमधून साधारण 14 कोटी 35 लाख लिटर्सहून जास्त पाणी वाया जाते. फिल्टर हाऊसमधून प्रक्रिया केलेले तब्बल 4 कोटी 46 लाख लिटर्सवर शुद्ध पाण्याची गळती व्हॉल्व्ह व इतर खराब यंत्रसामग्रीमुळे होते. फिल्टर हाऊसपासून पाण्याच्या टाक्यांपर्यंत सोडण्यात येणार्‍या जलवाहिन्यांतून सुमारे सहा कोटी लिटर्स पाणी गळतीद्वारे जाते. तसेच पाण्याच्या टाक्या ओव्हरफ्लो झाल्याने सुमारे साडेसहा कोटी लिटर्स पाणी वाया जात असल्याचेही अहवालात म्हटले आहे. 
महापालिका पाणीपुरवठा विभागाकडे सुमारे 1 लाख 5 हजार इतके नळ कनेक्शनधारक आहेत. शहरासाठी उपसा होणार्‍या नदीतील पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी कसबा बावडा, पुईखडी, बालिंगा व कळंबा फिल्टर हाऊस आहेत. तेथून शहरातील 32 टाक्यांत पाणी सोडण्यात येते. शहरांतर्गत पसरलेल्या सुमारे पाचशेहून अधिक किलोमीटर लांबीच्या जलवाहिन्यांतून नागरिकांना पाणी पुरविण्यात येते. दोन महिन्यांतून एकदा बिलिंग होते. महिन्याला सुमारे सहा ते साडेसहा कोटी अशाप्रकारे पाण्यातून सुमारे 36 ते 40 कोटी जमा होतात. 

दरम्यान, जलअभियंता सुरेश कुलकर्णी यांनी सांगितले की, वॉटर ऑडिटसाठी नेमण्यात आलेल्या स्टुडिओ गाल्ली इन्जेग्नेरिया या कंपनीने नुकताच अहवाल दिला आहे. कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करणार्‍या अनेक जलवाहिन्या खूप वर्षांपूर्वीच्या आहेत. बालिंगा फिल्टर हाऊसही जुने आहे. त्याबरोबरच इतरही अनेक कारणांनी पाणी गळती सुरू आहे. अमृत योजनेंतर्गत जुन्या एसी, पीव्हीसी, जीआय व एमएस या पाईपलाईन बदलण्याचे प्रस्तावित आहे. तसेच एअर व्हॉल्व्ह लिकेज काढण्याचे काम टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहेत.