Sun, Oct 20, 2019 06:50होमपेज › Kolhapur › हवेत गोळीबार करणारा सरपंच फरार 

हवेत गोळीबार करणारा सरपंच फरार 

Published On: Nov 09 2018 8:11PM | Last Updated: Nov 09 2018 8:11PM 

कोल्हापूर (शिये) : वार्ताहर

 

पुलाची शिरोली (ता. हातकणंगले) येथे लक्ष्मी पूजनानंतर बारा बोअरची बंदूक व पिस्तुलातून हवेत गोळीबार केल्याप्रकरणी शिरोलीचे सरपंच शशिकांत खवरे याच्या विरोधात शिरोली पोलिस ठाण्यात गुरुवारी पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला. संबंधीत शस्त्रे पोलिसांनी जप्त केली आहेत. गोळीबारानंतर खवरे हा अटक होण्याच्या शक्यतेने पसार झाला असून गावचा प्रथम नागरिक असणार्‍या सरपंचानेच हवेत गोळीबार केल्याने खळबळ उडाली आहे.

शिरोली पंचक्रोशीतील शिरोली हे गाव आर्थिकदृष्ट्या सक्षम म्हणून ओळखले जाते. शिरोली गावाच्या मुख्य रस्त्यावर बाजारपेठेत बुधवारी रात्री लक्ष्मी पूजनानंतर सरपंच शशिकांत खवरे याने आत्मसंरक्षणासाठी असलेल्या बारा बोअर बंदुकीने दोन व पिस्तुलाने तीन फैरी हवेत झाडल्या. भर चौकात अत्यंत गजबजलेल्या ठिकाणी हा प्रकार घडला. हवेत गोळीबार करत असल्याचा व्हिडीओही बनवण्यात आला आणि काही वेळातच व्हाटस् अ‍ॅपवर तो व्हायरल झाला. या व गोपनीय माहितीच्या आधारावर सरपंच खवरे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शस्त्रांचा परवाना देताना घालून दिलेल्या अटी व नियम धाब्यावर बसवत खवरेने व्हिडीओ क्लिपसाठी पोझ देत फैरी झाडल्या आणि ‘लई दणका देतय जोरात’ अशी पुष्टीही गोळीबारानंतर जोडली. 

गोळीबार आणि फैरी झाडतानाची मोठ्या उत्साहात व्हिडीओ क्लिप केली आणि त्याच्याही दुप्पट उत्साहाने शशिकांत खवरे युवा मंच या ग्रुपवर ती टाकली गेली. पण, कोणीतरी याचे गांभीर्य लक्षात आणून देताच त्याचे धाबे दणाणले. टाकलेली पोस्ट डिलीट करून ही पोस्ट कोणी पुढे अन्य ग्रुपवर टाकू नका, असे केविलवाणे आवाहन करण्यापूर्वी ही पोस्ट अनेक ठिकाणी पोहोचली होती. 

रिकाम्या पुंगळ्यांसह अन्य साहित्य जप्त

पोलिसांना घटनास्थळावरून लाल रंगाच्या रिकाम्या दोन पुंगळ्या, लाल रंगाचे प्लास्टिकचे आवरण आदी साहित्य मिळाले. खवरेवर भारतीय शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 30 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारतर्फे महादेव आकाराम पाटील यांनी फिर्याद दाखल केली आहे. या प्रकरणाचा तपास करवीर विभागीय पोलिस अधिकारी सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली शिरोली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक परशुराम कांबळे करीत आहेत.