Tue, Jul 14, 2020 03:52होमपेज › Kolhapur › कोल्‍हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा; डर्टट्रॅक शर्यतीत सुहानीचे यश 

कोल्‍हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा; डर्टट्रॅक शर्यतीत सुहानीचे यश 

Last Updated: Oct 22 2019 1:25PM
कोल्‍हापूर : प्रतिनिधी 

कोल्हापूर म्हटलं की भरभक्कम फेटा आणि रांगडं व्यक्तिमत्व नेहमी डोळ्यांसमोर येतं. विविध क्षेत्रांमध्ये आपली वेगळी ओळख जपणारे आणि आपला ठसा उमटवणारे कोल्हापूरकर नवीन नाहीत. अशा क्षेत्रांमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये झपाट्याने प्रगती झालेली असून, क्रीडाक्षेत्रातील मोटारसायकलच्या शर्यतींमध्येही अनेक तरूण आपली चमकदार कामगिरी दाखवत आहेत.

 गेल्या काही वर्षांमध्ये कोल्हापूरच्या अनेक स्पर्धकांनी वेगवेगळ्या शर्यतींमध्ये कोल्हापूरचं नाव देशपातळीवर गाजवलं आहे. यामध्ये मुलांपेक्षा मुली कोठेही कमी नाहीत, हे दाखवलं आहे, अवघ्या १६ वर्षांच्या सुहानी पाटीलने. सुहानी ही रॉयल रायडर्स क्लबकडून अनेक शर्यती जिंकून देणारे गौरव पाटील यांची कन्या आहे. गेल्या आठवड्यात गोवा येथे पार पडलेल्या टीव्हीएस मोटो सोल या कार्यक्रमात झालेल्या महिलांच्या डर्टट्रॅक शर्यतींमध्ये प्रथम क्रमांक पटकावून सुहानीने या क्षेत्रात नवा इतिहास रचला आहे. कोल्हापूरला असे राष्ट्रीय पदक मिळवून देणारी सुहानी ही पहिलीच खेळाडू ठरली आहे. गेल्या काही वर्षांपासून आपल्या वडिलांच्या आणि रॉयल रायडर्सच्या रेसिंग टीमच्या मार्गदर्शनाखाली सुहानी सराव करत होती. या शर्यतींसाठी अत्यंत महत्वाची तांत्रिक जबाबदारी संजीव घोरपडे आणि अवधूत भोसले यांनी पार पाडली. या सर्वांच्या प्रयत्नांची पोचपावती या अभूतपूर्व यशामुळे मिळाली आहे.

आगामी काळात गोवा येथील रॉयल एन्फिल्ड रायडर मेनिया २०१९ मध्ये सुहानी रॉयल रायडर्सचे प्रतिनिधित्व करणार आहे. डर्ट ट्रॅक प्रकारात चालवण्यास अत्यंत अवघड समजल्या जाणाऱ्या बुलेट गाडीच्या या शर्यती अत्यंत आव्हानात्मक असतात. या स्पर्धेसाठी ती गौरव पाटील, सचिन घोरपडे, महेश चौगुले आणि रॉयल रायडर्स रेसिंग टीमच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे. तिला येत्या काळातील यशासाठी आणि कोल्हापूरच्या मानात तिने अशीच भर घालत राहावी यासाठी हार्दिक शुभेच्छा.