होमपेज › Kolhapur › दोघांची भेट झाली असती... तर काय घडले असते?

दोघांची भेट झाली असती... तर काय घडले असते?

Published On: Sep 15 2018 1:46AM | Last Updated: Sep 15 2018 1:23AMकोल्हापूर ः सतीश सरीकर

कोल्हापूर जिल्ह्यात सध्याच्या राजकारणात आमदार सतेज पाटील व माजी आमदार महादेवराव महाडिक हे एकमेकांचे अक्षरशः हाडवैरी बनले आहेत. महाडिक यांनी तर आमच्यापैकी कोणतरी एक संपल्यावरच आमची दुश्मनी संपेल, असे जाहीरपणे सांगितले आहे. त्यावरून त्यांच्यातील वैरत्वाचा अंदाज येतो. एवढे वितुष्ट असतानाही महाडिक हे थेट पाटील यांच्या बंगल्यात गेले. कट्टर विरोधक असलेले दोघे एकमेकांसमोर आले असते तर... त्यांनी संयम राखत शांतपणे चर्चा केली असती? की आणखी काय घडले असते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

कोल्हापूर जिल्हा दूध संघाची 21 सप्टेंबरला सभा आहे. त्यानंतर अवघ्या आठवड्यातच राजाराम साखर कारखान्याची सर्वसाधारण सभा आहे. सतेज पाटील समर्थक विश्‍वास नेजदार यांना झालेल्या धक्‍काबुक्‍कीचा या दोन्ही सभांत तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे. त्यातच नेजदार यांचे पुतणे नगरसेवक संदीप नेजदार यांनी महाडिक यांना  कसबा बावड्यात फिरू न देण्याचा इशारा दिल्याने वातावरण तणावपूर्ण बनले होते. त्या पार्श्‍वभूमीवर महाडिक हे पाटील यांच्या घरी गेल्याने तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

पाटील व महाडिक एकेकाळी राजकारणात एकत्रच होते. परंतु, राजकारणातूनच त्यांच्यात बिनसल्याने दोघेही एकमेकांना पाण्यात पाहू लागले. दोघेही एकमेकांवर एकदम खालच्या पातळीवर आरोप-प्रत्यारोप करू लागले. सकाळी सकाळी व्यापारी पेठेतील माझ्या गाडीचा दरवाजा उघडायला सतेज पाटील उभा राहत होते, त्यांनी मला शिकवू नये, असा आरोप महाडिक करू लागले. मंत्री असताना पदाचा गैरवापर करून अनेकांना विनाकारण वेठीस धरल्याचा आरोप महाडिक यांनी पाटील यांच्यावर केला. पाटील यांनीही महाडिक यांच्यावर मटका घेणारे, डिझेल भेसळ करणारे असे आरोप केले. दोघांचेही एकमेकांवरील आरोप अत्यंत विकोपाला गेले. आता तर ‘गोकुळ’च्या दुधावरून दोघांत चांगलीच जुंपली आहे. आरोप-प्रत्यारोपावरून दोघांचेही कार्यकर्ते आता हातघाईवर आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून पुन्हा दोघांत परस्परांना जिव्हारी लागेल, अशी टीका सुरू आहे. जशास तसे उत्तर देण्याच्या ईर्ष्येतून एकमेकांची उणीदुणी बाहेर काढली जात आहेत. एकमेकांवर शाब्दिक हल्ला चढविण्याची एकही संधी दोघेही सोडत नाहीत.

पाटील व महाडिक यांच्यात आता टोकाचे राजकारण सुरू आहे. एकमेकांना राजकारणातून संपविण्याची भाषाही केली जात आहे. त्यातूनच काही दिवसांपूर्वी सतेज पाटील यांनी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडे घ्या, या ठिकाणी काँग्रेसचा उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी घेतो, असे वक्‍तव्य करून महादेवराव महाडिक यांचे पुतणे व राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक यांना थेट आव्हान दिले होते. त्यावरून पुन्हा पाटील-महाडिक यांच्यात राजकीय कलगीतुरा रंगला होता. मनोरुग्ण, एकाशी लग्‍न-दुसर्‍याशी संसार, असे खालच्या पातळीवर आरोप-प्रत्यारोप करण्यात आले होते.

दिलगिरी अन् आव्हान...

महाडिक हे सतेज पाटील यांच्या घरी गेल्याची माहिती अवघ्या काही मिनिटांत सोशल मीडियावर व्हायरल झाली. पाटील समर्थकांकडून महाडिक यांनी अखेर बावड्यात येऊन दिलगिरी व्यक्‍त केल्याचे मेसेज टाकले जात होते, तर महाडिक समर्थकांकडूनही थेट बावड्यातच जाऊन महाडिक यांनी दिले आव्हान, असेही मेसेज टाकले जात होते. एकूणच अशाप्रकारे पाटील व महाडिक समर्थकांत सोशल मीडियावरील युद्ध दिवसभर सुरू होते.