Wed, Jun 03, 2020 08:40होमपेज › Kolhapur › ढगफुटीसारखा पाऊस

ढगफुटीसारखा पाऊस

Last Updated: Oct 20 2019 1:12AM
कोल्हापूर : प्रतिनिधी

शहर आणि परिसरात शनिवारी सायंकाळी धुवाँधार पाऊस झाला. काही ठिकाणी तर ढगफुटीसारखा पाऊस कोसळला. शहरात अवघ्या 45 मिनिटांत 11 मि.मी. पावसाची नोंद झाली. जिल्ह्यातही बहुतांशी भागात पावसाने हजेरी लावली. रविवारीही जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

सकाळपासून ढगाळ वातावरण होते. दुपारी काही काळ कडकडीत ऊन पडले होते. मात्र, दुपारी तीननंतर जिल्ह्याच्या काही भागात वातावरण ढगाळ झाले आणि पावसाला प्रारंभ झाला. शहर आणि परिसरात दुपारी चारच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. पावसाचा जोर गेल्या काही दिवसांच्या तुलनेत आज अधिक होता. सायंकाळनंतर तो अधिक वाढला. काही वेळ तर पावसाचा जोर इतका होता, की काही अंतरावरीलही दिसत नव्हते. शहरात सायंकाळी पावणेचार ते साडेपाच या अवघ्या पाऊण तासात 11 मि.मी.पावसाची नोंद झाली. यानंतरही पावसाचा जोर उशिरापर्यंत कायम होता.

शहरासह जिल्ह्याच्या काही भागात काही मिनिटे ढगफुटीसारखा पाऊस कोसळला. यामुळे रस्त्यावर पाणीच पाणी झाले. शहरातील अनेक रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले. काही ठिकाणी अर्धा फुटापेक्षा अधिक पाणी साचले होते. या पाण्यातून मार्ग काढताना पादचार्‍यांसह वाहनधारकांनाही मोठी कसरत करावी लागली. शहरातील जयंती नाला दुथडी भरून वाहत होता. सायंकाळनंतर या नाल्यावरील बंधाराही बुडाला.

ताराराणी चौक ते शिवाजी विद्यापीठ या मार्गावर अनेक ठिकाणी दुभाजकामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. ताराराणी चौक, दाभोळकर कॉर्नर, परीख पूल, साईक्स एक्स्टेन्शन, राजारामपुरी, व्हीनस कॉर्नर, कोंडा ओळ, लक्ष्मीपुरी बाजारपेठ, कोषागार कार्यालय, सीपीआर चौक, जयंती नाला पूल, महावीर उद्यान ते स्टेशन रोड आदी अनेक ठिकाणी पाणी साचले होते. गंगावेश, स्टेशन रोड, राजारामपुरी मुख्य मार्ग आदी अनेक रस्त्यांवरून पाण्याचे लोट वाहत होते.

पावसाने जनजीवनावर परिणाम झाला. व्यापारी पेठा, भाजी मंडईसह विविध बाजारपेठांतील खरेदीच्या उत्साहावर पावसाने पाणी फिरवले. विधानसभा निवडणुकीच्या जाहीर प्रचाराची शनिवारी सांगता होती, अखेरपर्यंत प्रचार करण्याचे उमेदवारांचे नियोजन होते ते पावसाने कोलमडले. घराबाहेर पडणार्‍यांचे चांगलेच हाल झाले. प्रवासी, पर्यटक, भाविकांची त्रेधातीरपीट उडाली. खाद्य पदार्थांच्या हातगाडीवरील गर्दी तुलनेने कमी झाली. पावसाचा जोर रात्री आठ वाजेपर्यंत कायम होता. यानंतर पावसाने उसंत घेतली. पावसानंतर हवेतील गारठ्यात वाढ झाली होती.

दरम्यान, शनिवारी सकाळी आठ वाजेपर्यंत गेल्या 24 तासांत जिल्ह्यात सरासरी 24.41 मि.मी.पावसाची नोंद झाली. सर्वाधिक पाऊस गडहिंग्लजमध्ये 44.43 मि.मी.इतका झाला. हातकणंगलेत 18, शिरोळमध्ये 8, पन्हाळ्यात 26, शाहूवाडीत 22, राधानगरीत 28, गगनबावड्यात 27, करवीरमध्ये 13, कागलमध्ये 26, भुदरगडमध्ये 25, आजर्‍यात 35 तर चंदगडमध्ये 16 मि.मी.पावसाची नोंद झाली. कोल्हापूर शहरात 17 मि.मी.पाऊस झाला. जिल्ह्यातील सर्वच धरण क्षेत्रातही गेल्या 24 तासांत दमदार पाऊस झाला. चिकोत्रा परिसरात 60, तुळशीत 53, राधानगरीत 37, दूधगंगेत 45, जंगमहट्टीत 40, कोदेत 31 मि.मी.पावसाची नोंद झाली. तुळशी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून, सध्या 507 क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे.