Wed, Feb 26, 2020 18:13होमपेज › Kolhapur › कोल्हापूर जिल्ह्यासाठी ५८१ कोटींच्या प्रस्तावास मंजूरी

कोल्हापूर जिल्ह्यासाठी ५८१ कोटींच्या प्रस्तावास मंजूरी

Last Updated: Jan 24 2020 7:42PM
कोल्हापूर  : पुढारी ऑनलाईन

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्यादाच कोल्हापूर जिल्ह्यात नियोजन समितीची बैठक घेण्यात आली. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील यांनी २२१ कोटींच्या अतिरिक्त मागणीसह ५८१ कोटींच्या प्रस्तावाच्या ठरावास आज (ता.२४) मंजुरी दिली. २१ मार्च रोजी माणगाव परिषदेला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. या कार्यक्रमासाठी ५० लाखांचा निधी तसेच सर्व विभागांनी दिलेला निधी १०० टक्के खर्च करावा त्यानुसारच पुढील वर्षाचा निधी दिला जाईल, असे निर्देश पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीवेळी दिले.

अधिक वाचा  : ‘गोकुळ’चे नाराज संचालक व मंत्री यांची होणार चर्चा

याचबरोबर पोलिसांच्या निवास व्यवस्थेबाबत लवकरच बैठक घेणार आहे, त्यावेळी त्याबाबत सविस्तर आढावा घेतला जाईल. आरोग्य विभागाचा सविस्तर आढावा घेवून कार्डीयाक रूग्णवाहिका जिल्ह्याला उपलब्ध करून दिली जाईल. इचलकरंजी येथील आयजीएम रूग्णालयाच्या बाबतीतही सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्र्याच्या समवेत बैठक घेवून प्रश्न मार्गी लावू, असेही पालकमंत्री म्हणाले. ग्रामीण रूग्णालये, आरोग्य उपकेंद्र याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पंधरा दिवसात बैठक घेवून अहवाल द्यावा, अशी सूचना त्यांनी यावेळी केली. 

अधिक वाचा  : लोकशाही निर्देशांकात भारताची घसरण

यावेळी कर्ज मुक्तीबाबत माहिती देताना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी, जे प्रामाणिकपणे कर्ज भरतात उपसमितीमार्फत त्यांचीही माहिती घेणे सुरू आहे. त्यांनाही १ लाखापर्यंतची माफी मिळण्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. यावर जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी यावेळी माहिती दिली. महापुरामुळे ७८ हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. बाधित पिकांचे चालू कर्ज माफ तसेच ज्यांनी कर्ज घेतल नाही त्यांना तिप्पट मर्यादा, पुरबाधित शेतकऱ्यांना अशा दोन्ही योजनांचा लाभ मिळणार आहे. १२१ कोटी प्राप्त अनुदानापैकी ३६ कोटींचे वाटप पूर्ण झाले आहे. १५ दिवसात उर्वरित वाटप पूर्ण होईल. 

जिल्ह्याच्या महापुराचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनी राज्याला पाठविला होता, असे सांगून पालकमंत्री पुढे म्हणाले, 956 कोटी राज्याला आलेले आहेत. मुख्य सचिवांशी माझी नुकतीच चर्चा झाली असून हा निधी कशासाठी आला आहे त्याबाबत लवकरच  खुलासा होईल. जिल्ह्यामध्ये पूरग्रस्तांना 300 कोटींचे वाटप झाल्याचेही ते म्हणाले. 

जिल्हा नियोजन समितीच्या या बैठकीस उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. योगेश जाधव, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, जि प अध्यक्ष बजरंग पाटील, खासदार प्रा. संजय मंडलिक, धैर्यशील माने, चंद्रकांत जाधव, ऋतुराज पाटील, राजेश पाटील, राजू आवळे, प्रकाश आवाडे, प्रकाश आबिटकर, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पोलिस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल आदी उपस्थित होते.