होमपेज › Kolhapur › गौराईच्या शिदोरीचा बाज बदलला; तांदळाची भाकरी अन् अळूची वडी गायब

गौराईच्या शिदोरीचा बाज बदलला

Published On: Sep 13 2018 9:00PM | Last Updated: Sep 13 2018 9:00PMराजेंद्र दा. पाटील, कौलव (जि. कोल्हापूर) 

गौरी गणपतीचा सण म्हटले की माहेरवाशीणींना दिली जाणारी तांदळाची भाकरी आणी अळूच्या वडीची शिदोरी ही हमखास असते. मात्र बदलत्या युगात शिदोरीत गोडघोड पदार्थाची रेलचेल झाली आहे. त्यामुळे गौराईची शिदोरीही हायटेक बनली आहे.

गौरी गणपती ग्रामीण भागातील माहेरवाशीणीच्या दृष्टीने जिव्हाळ्याचा आणि आपुलकीचा सण असतो. गणेशोत्सव पंधरावड्यावर आला की माहेरवाशीणीना गावाकडील शिदोंरीचे वेध लागतात. गावाकडून येणाऱ्या मुराळ्याची ती वाट पहात असते. पूर्वी शिदोरी साठी तांदळाची पांढरी शुभ्र भाकरी आणि अळूच्या पानाची थापीव वडी अथवा वरण्याचे उसळ असा बेत असायचा. कदाचित एखादेवेळी पुरणपोळी अथवा चपातीही असायची. मुराळी दुरडीतून शिदोरी घेऊन आला की माहेरवाशीण माहेराहून घरोघरी शिदोरी वाटत होत्या. सर्वानाच या शिदोरीची अविट गोडी होती. मात्र काळाच्या ओघात या शिदोरीची गोडीच हरवली आहे.

गणेशोत्सवाला लोकोत्सवाचे स्वरूप आले. तसे गौराईची शिदोरीही हायटेक बनली आहे. शिदोरीतील तांदळाची भाकरी, चपाती, अळूची वडी व वरण्याचे ऊसळ गायब झाले आहे. त्यांची जागा आता जिलेबी, खाजा, म्हैसूरपाक, लाडू यांनी घेतली आहे. ही शिदोरी आता गावोगावी रेडीमेड मिळते. त्यामुळे तयार करण्याचा त्रास नसतो. प्रमुख बाजारपेठांच्या गावात तयार शिदोरीच्या स्टॉल्सची रेलचेल झाली आहे. अगदी शंभर रुपये किलो दराने हे पदार्थ मिळतात. त्यामुळे सर्वाचाच कल या शिदोरीकडे असून शिदोरीचा बाज बदलल्यामुळे तांदळाची भाकरी व अळूच्या वडीची चव फक्त घरगुती गौरीपुजनादिवशीच चाखायला मिळते. यामुळे विक्रेत्यांना गणेशोत्सवात नवा व्यवसायही उपलब्ध झाला आहे. या व्यवसायाची हजारो रुपयांची उलाढाल होत आहे.

गेल्या तीन चार वर्षात तयार शिदोरीकडेच सर्वांचा कल आहे असे रामचंद्र सुतार (हळदी) व सर्जेराव पाटील (भोगावती) यांनी सांगितले. तयार शिदोरी मुळे तांदळाच्या भाकरीची पारंपारिक शिदोरी इतिहासजमा झाली आहे. वस्तीला (मुक्कामी) येणारा मुराळीही घाईगडबडीत शिदोरी ठेऊन परतत आहेत. त्यामुळे खेडयापाडयातील गौरी गणपती सणाचे एक पारंपारीक वैशिष्ट्य लुप्त होत चालले आहे.