Wed, Feb 20, 2019 15:51होमपेज › Kolhapur › चकमकीत गोळी लागून गुंड काळबा गायकवाड जखमी

गोळी लागून गुंड काळबा गायकवाड जखमी

Published On: Dec 06 2018 8:00PM | Last Updated: Dec 06 2018 11:23PM
कोल्हापूर : प्रतिनिधी 

पोलिसांशी झालेल्या चकमकीत स्वत:जवळील पिस्तुलमधील गोळी लागून गुंड काळू उर्फ काळबा उर्फ विजय गायकवाड (वय 45, रा. टेंबलाई उड्डाणपूल) गंभीर जखमी झाला आहे. गुरुवारी दुपारी महाडीक माळ येथे पोलिसांनी केलेल्या कोम्बिंग ऑपरेशनवेळी हा थरारक प्रकार घडला.

या घटनेत प्रत्युत्तरादाखल फौजदार राजेंद्र सानप यांनी आपल्या सर्व्हीस रिव्हॉल्वरमधून स्वसंरक्षणार्थ एक  राऊंड फायर केला. झटापटीत पोलिस कर्मचारी श्रीकांत मोहिते हेदेखील जखमी झाले. पोलिस आणि नामचीन गुंडाच्या चकमकीची खबर सोशल मीडियातून वाऱ्यासारखी पसरल्याने शहरवासियांच्यात उलटसुलट चर्चा सुरु झाली. सुरवातीला पोलिसांनी एनकाऊंटर केल्याची अफवा पसरली होती. मात्र नंतर पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी माहिती दिल्यानंतर कोम्बिंग ऑपरेशन असल्याचे स्पष्ट झाले. 

दरम्यान, आपल्या पतीवर पोलिसांनी गोळी झाडल्याचा आरोप गायकवाडची पत्नी अश्‍विनी यांनी प्रसारमाध्यमांसमोर केला.