Sun, Oct 20, 2019 06:42



होमपेज › Kolhapur › चंदगड तालुक्यातील काजू कारखानदारांना 4 कोटींचा गंडा

चंदगड तालुक्यातील काजू कारखानदारांना 4 कोटींचा गंडा

Published On: Jul 13 2019 1:53AM | Last Updated: Jul 13 2019 1:53AM




चंदगड : प्रतिनिधी

मुंबई, जयसिंगपूर येथील दोघा व्यापार्‍यांनी काजूगरांना चांगला दर मिळवून देतो, असे सांगत विश्‍वास संपादन करून, 4 कोटी 19 लाख 76 हजार 741 रुपयांची काजू उचल करून, तालुक्यातील वीस काजू कारखानदारांना गंडा घातला आहे. शुक्रवारी याप्रकरणी चंदगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

चंदगड तालुक्यात 200 पेक्षा जास्त काजू कारखानदार असून, सुमारे वीस हजार महिला आणि तरुणांना या काजू प्रक्रियेतून रोजगार मिळाला आहे. चंदगडच्या काजूला उत्तम प्रतीचा आणि चवदार म्हणून परदेशात मोठी मागणी आहे. काजूला जादा दर मिळवून देतो म्हणून मुंबई येथील उमेश वारसे व जयसिंगपूर येथील प्रदीप पाटील या दोन भामट्यांनी चंदगड तालुक्यातील 20 काजू कारखानदारांना 4 कोटी 19 लाख 76 हजार 741 रुपयांचा गंडा घातला. याबाबत तुडये येथील कारखानदार विनोद खाचू पाटील यांनी शुक्रवारी पोलिसात तक्रार नोंदवली. तालुक्यातील कारखानदारांनी राष्ट्रीयीकृत बँका, पतसंस्थांचे कर्ज काढून काजू खरेदी केले. त्यावर प्रक्रिया करून उत्पादित केलेल्या मालाला मुंबई-गुजरात बाजारपेठेतून चांगली मागणी असल्याने गेल्या पाच-सहा वर्षांत या धंद्याने चांगली उभारी घेतली होती. परंतु, सतत मुंबई, पुणे, गुजरात बाजारपेठेतून माल विक्री करण्यास वेळ मिळत नसल्याने चंदगड तालुक्यात सतत वावर असणार्‍या उमेश वारसे आणि प्रदीप पाटील या दोघांनी संगनमताने तालुक्यातील वीस काजू कारखानदारांना चांगला भाव देतो, असे सांगितले. संबंधित कारखानदारांकडून त्यांनी 4 कोटी 19 लाख 76 हजार 761 काजूगर 19 ऑगस्ट 2018 ते 24 ऑक्टोबर 2018 या कालावधीत उचल केले. त्यानंतर पैशांची मागणी केल्यावर दोघांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे कारखानदारांच्या लक्षात आले.