Sat, May 30, 2020 07:08होमपेज › Kolhapur › व्यापारी अपहरण : आठ जणांची टोळी जेरबंद 

व्यापारी अपहरण : आठ जणांची टोळी जेरबंद 

Published On: Jun 14 2018 1:33AM | Last Updated: Jun 14 2018 1:33AMइचलकरंजी : प्रतिनिधी 

एक कोटीसाठी येथील गारमेंट व्यावसायिक रामकृष्ण रामप्रताप बाहेती (वय 45) यांच्या अपहरणप्रकरणी पोलिसांनी 24 तासांत 8 जणांच्या मुसक्या आवळल्या. 

अक्षय श्रीकांत शिंदे (वय 27, रा. गुरुकन्‍नननगर), गौरव प्रकाश पोईपकर (वय 25), विकास आनंदा गोईलकर (25, दोघे रा. घोडकेनगर), अतुल शिवाजी कामते (वय 25, रा. नदीवेस), शहारूख महामूद सनदे (वय 25, रा. आमणापूर, ता. पलूस, जि. सांगली), शक्‍ती धनाजी जाधव (वय 24), महेश संजय यादव (वय 27, दोघे रा. नागठाणे, ता. पलूस, जि. सांगली), सुबोध राजकुमार शेडबाळे (वय 28, रा. आष्टा, ता. वाळवा, जि. सांगली) अशी  नावे आहेत. त्यांच्याकडून अपहरणासाठी वापरलेली  कार (एमएच10 बीए 6988) व दुचाकी  (एमएच 09 डीक्यू 45) असा सुमारे दीड लाखाचा मुद्देमाल जप्‍त केला.

मंगळवारी रात्री 12.15 च्या सुमारास बाहेती ते नाकोडानगर येथून घरी जाताना कारमधून पाच जणांनी  मारहाण करून  त्यांना  शहापूर, कोरोची, हातकणंगले मार्गे पेठवडगावला नेले.  त्यांच्याकडील सोन्याची चेन, घड्याळ, मोबाईल, अंगठी असा सुमारे दीड लाखाचा मुद्देमाल काढून घेतला. यावेळी जिवे मारण्याची धमकी देऊन मुलाकडून 1 कोटी रुपयांची खंडणी मागितली; मात्र त्याच दरम्यान हातकणंगले पोलिसांची रात्रगस्तीची गाडी पाहून अपहरणकर्त्यांनी बाहेती यांना वाटेतच सोडून पलायन केले होते. 

त्यानंतर बाहेती यांनी गावभाग पोलिसांना प्रकार सांगितला. पोलिसांनी संशयितांचे रेखाचित्र बनवले. त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण कोल्हापूर, स्थानिक गुन्हे अन्वेषण इचलकरंजी, गावभाग पोलिस यांची पथके शोधासाठी रवाना झाली होती. तसेच ठिकठिकाणी सीसीटीव्ही फुटेज व मोबाईलचे लोकेशनही तपासण्यात येत होते. अपहरणकर्ते  शिरदवाड हद्दीत येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार   सापळा रचून संशयितांच्या मुसक्या आवळल्या. त्यांनी खंडणीसाठी अपहरण केल्याची कबुली दिली. 

ही कामगिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरचे तानाजी सावंत, गावभागचे निरीक्षक मनोहर रानमाळे, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे अमोल माळी, सचिन पंडित, युवराज सूर्यवंशी, राम गोमारे, महेश कोरे आदींसह पथकाने केली.