Wed, Jun 03, 2020 23:59होमपेज › Kolhapur › आदमापूर येथे हजारो भाविकांच्या उपस्थितीत बाळूमामा जन्मकाळ सोहळा संपन्न 

आदमापूर येथे हजारो भाविकांच्या उपस्थितीत बाळूमामा जन्मकाळ सोहळा संपन्न 

Last Updated: Oct 10 2019 8:58PM

श्री क्षेत्र आदमापुर येथील संत बाळूमामा यांचा १२८ वा जन्मकाळ सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत विविध धार्मिक कार्यक्रमानी संपन्न झाला.मुदाळतिट्टा : प्रतिनिधी

महाराष्ट्र ,कर्नाटक, गोव्यासह अन्य राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखले जाते. श्री क्षेत्र आदमापूर येथील संत बाळूमामा यांचा १२८ वा जन्मकाळ सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत विविध धार्मिक कार्यक्रमानी संपन्न झाला.

बाळूमामाच्या नावानं चांगभलंच्या जयघोषात ढोल कैताळाच्या गगनभेदी आवाजाने सारा परिसर दणाणून गेला. जन्मकाळ उत्सवाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पहाटे समाधीपुजन व अभिषेक देवस्थानचे अध्यक्ष धैर्यशील भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. जन्मकाळ पूर्वसंध्येला ह.भ.प भिकाजी मगदूम बामणी यांचा प्रवचनाचा कार्यक्रम झाला समाधी पूजन अभिषेक काकड आरती नंतर भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली रात्री पुंडलिक देवधर देवाची आळंदी यांचा कीर्तनाचा कार्यक्रम झाला .

मंदिरांमधून बाळूमामांच्या निर्वाण स्थळावरून सहवाद्य मिरवणुकीने श्वानासह भंडारा आणण्यात आला. जन्मस्थळाचे औचित्य साधून सुहासिनींच्या हस्ते पाळणा पूजन करण्यात आला.  दुपारी 4 वाजून 23 मिनिटांनी बाळूमामा यांचा जन्म सोहळा संपन्न झाला. यावेळी श्रींच्या पाळण्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. सुहासिनीने पाळणा गायला सुरूवात केली. भंडाऱ्याची उधळण करत सारा परिसर नाहून गेला. जन्मकाळ उत्सवानंतर पालखीची मंदिराभोवती मिरवणूक काढण्यात आली. 

जन्मकाळ उत्सव प्रसंगी देवस्थानचे अध्यक्ष धैर्यशील राजेभोसले, कार्याध्यक्ष रामभाऊ मगदूम, सचिव रावसाहेब कोणकेरी , माजी सरपंच दत्तात्रय पाटील, दिनकर कांबळे, शामराव होडगे, सरपंच नेहा पाटील, विनायक पाटील, राजाभाऊ माळी,क्रष्णात डोणे पुजारी, बाळूमामा देवस्थान समितीचे सर्व सदस्य ग्रामस्थ भाविक हजारोच्या संख्येने उपस्थित होते महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली