Sat, Jul 04, 2020 11:24होमपेज › Kolhapur › आषाढी एकादशी : कडक निर्बंधात होणार नंदवाळ येथील विठ्ठलपूजा

आषाढी एकादशी : कडक निर्बंधात होणार नंदवाळ येथील विठ्ठलपूजा

Last Updated: Jul 01 2020 12:04AM
कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

देवशयनी’ (देवांच्या निद्रेची) एकादशी म्हणजेच आषाढी एकादशी यंदा बुधवारी (दि. 1 जुलै) सर्वत्र साजरी होत आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर हा सोहळा प्रतिवर्षीप्रमाणे उत्साहात साजरा न करता प्रतीकात्मक आणि अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. दरम्यान, प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणार्‍या नंदवाळ (ता. करवीर) येथे होणार्‍या यात्रेसाठीचा पालखी दिंडी सोहळाही वाहनातून 10 वारकर्‍यांसोबत होणार आहे. 

आषाढी एकादशी दिवशी आळंदी ते पंढरपूर आणि कोल्हापूर ते नंदवाळ अशा पायी दिंड्या काढल्या जातात. यात आबालवृद्ध भाविक विठ्ठलनामाचा गजर करत उत्स्फूर्तपणे सहभागी होतात. यंदा कोरोना विषाणूमुळे इतिहासात पहिल्यांदाच पायी दिंड्या निघणार नाहीत. मात्र परंपरा म्हणून इतर धार्मिक विधी व सोहळ्यांनी आषाढी एकादशी साजरी करण्यात येणार आहे. 

प्रतिपंढरपूर नंदवाळ दिंडी सोहळा...

श्री ज्ञानेश्‍वर माऊली भक्‍त मंडळ व जय शिवराय फुटबॉल क्लब यांच्या वतीने आषाढी एकादशीनिमित्त प्रतिवर्षी श्री क्षेत्र कोल्हापूर ते प्रतिपंढरपूर नंदवाळ अशा पालखी दिंडी सोहळ्याचे आयोजन केले जाते. यंदा कोरोनामुळे पालखी दिंडी ट्रकमधून केवळ 10 वारकर्‍यांसह रवाना होणार आहे. यात मार्गदर्शक ह.भ.प. आनंदराव लाड महाराज, पुजारी मोहन जोशी, भालदार-चोपदार, टाळकरी- विणेकरी व वारकरी यांचा समावेश असणार आहे. बुधवारी सकाळी 9 वाजता मिरजकर तिकटी, विठ्ठल मंदिर येथून या सोहळ्याची सुरुवात होणार असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष  दीपक गौड यांनी कळविली आहे. 

कैलासगडची स्वारी मंदिरात विशेष पूजा...

आषाढी एकादशीनिमित्त मंगळवार पेठ, खासबाग परिसरातील कैलासगडची स्वारी मंदिरात भगवान शंकराची श्री विठ्ठलाच्या रूपात पूजा बांधण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आषाढी एकादशीचा सोहळा शासनाच्या आदेशानुसार साध्या पद्धतीने साजरा करण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष बबेराव जाधव, उपाध्यक्ष आ. चंद्रकांत जाधव यांनी कळविली आहे. भक्‍तांनीही शासनाच्या नियमांचे पालन करत दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन सचिव अशोक मेस्त्री व विलास गौड यांनी केले आहे.   

कडक निर्बंधात होणार नंदवाळ येथील विठ्ठलपूजा

देवाळे : पुढारी वृत्तसेवा 

कोल्हापूर जिल्ह्याचे प्रतिपंढरपूर अशी ओळख असणार्‍या नंदवाळ (ता. करवीर) येथे बुधवारी संपन्‍न होणारा आषाढी सोहळा कडक  निर्बंधात होणार असून मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत पहाटेे चार वाजता विठ्ठल पूजा होईल. नंदवाळकडे येणारे प्रमुख मार्ग सोमवारपासूनच बंद  करण्यात आले आहेत तसेच कोल्हापूर - नंदवाळ पालखी सोहळाही रद्द करण्यात आला असून कोल्हापूर येथील मोजकेच भाविक ट्रकमधून पालखी आणणार आहेत.

एकादशीला निवडक लोकांच्या उपस्थितीत  पहाटेची पूजा होऊन दिवसभर मंदिर बंद असेल. मिरजकर तिकटी येथील विठ्ठल मंदिरातून ज्ञानेश्‍वर माऊली पालखी सोहळा फक्‍त मंडळाकडून येणारी एकच पालखी गावाकडे येईल. पण ती पालखीही मिरजकर तिकटी येथून ट्रकमधून थेट मंदिराच्या ठिकाणी येईल. वाशी फाटा, गिरगाव फाटा व जैताळ मार्गावर मार्गावर पोलिस प्रशासन व ग्रामसमिती यांच्यामार्फत प्रवेश बंदी केली आहे.