Sun, Aug 18, 2019 07:13होमपेज › Kolhapur › खा. महाडिक-प्रा. मंडलिक यांच्या समर्थकांत बाचाबाची

महाडिक- मंडलिक यांच्या समर्थकांत बाचाबाची

Published On: Feb 12 2019 1:25AM | Last Updated: Feb 12 2019 1:29AM
कोल्हापूर : प्रतिनिधी

खासगी दूरचित्रवाहिनीवरील राजकीय चर्चेदरम्यान सोमवारी रात्री दसरा चौकात खासदार धनंजय महाडिक व लोकसभेचे शिवसेनेचे संभाव्य उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्या समर्थकांत बाचाबाची झाली. दोन्ही गटांकडून एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार झाला. पोलिसांनी हस्तक्षेप करत समर्थकांना शांत केले. या प्रकाराची सर्वत्र चर्चा सुरू होती.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर एका खासगी दूरचित्रवाहिनीने इच्छुक उमेदवार, राजकीय पक्षांचे नेते आणि नागरिक यांच्या चर्चेचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला खासदार धनंजय महाडिक, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार व भाजपाचे जिल्हाध्यक्ष संदीप देसाई उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान एका कार्यकर्त्यांने खा. महाडिक हेच नॉट रिचेबल खासदार आहेत, त्यांनी जिल्हाचे काय प्रश्‍न सोडवले असा सवाल केला. तर खा. महाडिक समर्थकानी कोण नॉट रिचेबल आहे हे सर्वांनाच माहित आहे. खा. महाडिक यांच्यासारखा खासदार होणार नाही, ते परमनंट खासदार आहेत असे सांगितले. 

त्यावर मंडलिक समर्थक एका कार्यकर्त्याने आपण ज्या पक्षातून निवडून आला त्या पक्षाच्या लोकांना काय मदत केली, असा सवाल केला. त्यावरून खा. महाडिक व प्रा. मंडलिक समर्थकांत जोरदार घोषणाबाजी सुरू झाली. यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले.

यानंतरही कार्यक्रम पुढे सुरू राहिला. ऊसाच्या प्रश्‍नावर बोलताना खा. महाडिक यांनी आपण याबाबत सातत्याने आवाज उठवत आलो पण यापूर्वीचे खासदार शेतकर्‍यांबाबत काहीही बोलले नाहीत, तसे असेल तर दाखवावे असे आवाहन केले. त्यावरून पुन्हा घोषणाबाजी झाली. यानंतर कार्यकर्ते पुन्हा शांत झाले.

नरेंद्र मोदी हवे की राहूल गांधी अशी विचारणा नागरिकांना केली जात असताना एका कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे पवार उपस्थित आहेत, उमेदवार कुठे आहेत? ते नॉट रिचेबल आहेत का, असा सवाल केला. यावरून खा. महाडिक यांनी पंतप्रधान पदासाठी शरद पवार हवे असे सांगत, शिवाजी पूलाबाबत विचारलेल्या प्रश्‍नावरून बोलताना जे समर्थक मला विचारतात, त्यांचे ते समर्थक कुठेे आहेत, आता सात वाजले, मी व्यासपीठावर आहे, ते कुठे आहेत. ते बाराला उठतात, ते आता नॉटरिचेबल आहेत, असे सांगताच प्रा. मंडलिक यांचे पुत्र वीरेंद्रउभे राहून आम्हाला निरोप नाही तर येणार कसे, असे सांगत आयोजकांना विचारा असे सांगत ते पुढे जाऊ लागले.

याच दरम्यान खा. महाडिक यांना तुमच्या पक्षातील हसन मुश्रीफ, काँग्रेसच्या सतेज पाटील यांच्याशी पटत नाही अशी विचारणा अँकरने केली. त्यावरून महाडिक समर्थक उठले. दोन्ही समर्थक आमनेसामने आल्याने वादाला प्रारंभ झाला. दोन्ही बाजूचे समर्थक एकमेकांच्या अंगावर धावून गेले. प्रचंड घोषणाबाजीमुळे  तणाव वाढला. गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. कोणी ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने अखेर पोलिसांना बोलावून हस्तक्षेप करावा लागला. यानंतर वातावरण शांत झाले. मात्र, या घडलेल्या प्रकाराने जिल्ह्याच्या राजकारणात चर्चेला उधाण आले.