Tue, Sep 17, 2019 04:39होमपेज › Kolhapur › जंगलच्या राजाला रानकुत्र्यांची धास्ती

जंगलच्या राजाला रानकुत्र्यांची धास्ती

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोल्हापूर : विजय पाटील 

ढाण्या वाघ कुणालाच भीत नाही, असं मानलं जातं. वाघालाच सारे प्राणी टरकतात. भिऊन जगतात, हे खरं असलं तरी राधानगरी अभयारण्यात मात्र मागील तीन वर्षे वाघोबा फिरकलेलाच नाही. वाघासाठी मुबलक खाणे, पाणी, तसेच पर्यावरण असतानाही वाघ येथे येण्यास धजावत नाही. याचे कारण या जंगलात असणारे रानटी कुत्र्यांचे कळप. या रानकुत्र्यांची वाघोबाने धास्ती घेतली असल्याने या जंगल परिसरात वाघ फिरकेनासा झाला आहे.

ज्या जंगलात वाघाचा अधिवास असतो, ते वनक्षेत्र श्रीमंत पर्यावरणाचे प्रतीक मानलं जातं. कारण, जिथे भरपूर तृणभक्ष्यक प्राणी असतात, मुबलक पाणी असते, अशा ठिकाणीच वाघ रमतो. याचा अर्थ चांगली जैवविविधता असली की, वाघाचा अधिवास तयार होतो. राधानगरी जंगलात वाघाचा अधिवास तयार होईल, असे समृद्ध पर्यावरण आहे. त्यामुळे मागील काही वर्षांमध्ये या जंगलपट्ट्यात तिलारी, कोकण वनक्षेत्रातून वाघ मोठ्या प्रमाणात येतात व जातात. चार ते पाच वाघ या जंगलात असल्याचे यापूर्वी प्राणी गणनेत दिसून येत होते. त्यामुळे या परिसराला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा द्यावा, अशी मागणी करण्यात आली; पण मागील तीन वर्षांपासून मात्र राधानगरीत वाघोबाचा ठावठिकाणा दिसून आलेला नाही.

राधानगरीशी संलग्‍न असलेल्या तिलारी वनक्षेत्रात सात-आठ वाघ आहेत. कोकणातही वाघांचे अस्तित्व वाढत चालले आहे. असे असतानाही राधानगरीसारख्या जंगलात वाघोबा का येत नाही, याचा वन अभ्यासकांनी व वन अधिकार्‍यांनी अभ्यास केला. त्यांनी केलेल्या निरीक्षणांवरून असे लक्षात आले की, राधानगरीत रानटी कुत्र्यांचे कळप वाढले आहेत. तसेच राधानगरी आणि दाजीपूर या दोन्ही वनक्षेत्रात ही रानकुत्री जागोजागी दिसून येतात. ती अत्यंत हिंस्र असल्याने त्यांच्या नादाला वाघही लागत नाही. कारण, ती वाघ दिसला तर त्याच्यावर नियोजनबद्ध हल्ला करतात. यापूर्वी एक-दोन वाघांवर असे हल्ले झाले असण्याची शक्यता वन अभ्यासकांकडून व्यक्‍त करण्यात आली. याचा परिणाम या जंगल परिसरात यायला वाघोबा दबकतो आहे. रानकुत्र्यांची इतकी दहशत तयार झाली आहे.

...याला म्हणतात रानटी कुत्रा

दिसण्यात पाळीव कुत्र्यांशी बरेचसे साम्य आढळते. कळपाने राहत असल्याने जंगलातील सर्वात भयावह प्राणी आहे. मांसभक्षक असून, दाट जंगलात राहणे पसंद करतो. लालसर रंग व काळ्या झुपकेदार शेपटीचा गोंडा, असे त्याचे वर्णन करता येईल. हरीण, रानडुक्‍कर हे प्राणी खाद्य म्हणून आवडतात. शक्यतो भुंकत नाही. शीळ घालून आपल्या सहकार्‍यांशी संपर्क साधण्याची पद्धत असते. 

राधानगरी अभयारण्यात नुकतीच प्राणी गणना झाली. यावेळी एकूण नऊ ठिकाणी रानकुत्र्यांचा वावर दिसून आला. तर जंगलभर रानकुत्र्यांच्या विष्ठा आढळून आल्या आहेत. 

राधानगरी जंगल परिसरात वाघांचा अधिवास नुकत्याच झालेल्या प्राणी गणनेत दिसून आलेला नाही. रानटी कुत्र्यांची वाढलेली संख्या, हे वाघ जंगलात न येण्याचे कारण आहे. कारण, ही कुत्री अत्यंत आक्रमक असतात.  यासह इतर अनेक कारणे आहेत. याबाबत आम्ही माहिती घेत आहोत. - विजय खेडकर 

रानटी कुत्री असतील तिथे वाघ शक्यतो येत नाही, हे खरे आहे. त्यामुळे वाघ जंगलात दिसत नसल्याचे हे कारण असू शकते. याचबरोबर वाघांसाठी असलेल्या कॉरिडोरमध्ये अडथळे आले आहेत. - रमन कुलकर्णी, (जंगल अभ्यासक)
 

Tags : kolhapur, kolhapur news, Radhanagari, Radhanagari Wildlife Sanctuary, Wild dog flock,


  • 
    WhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.
    https://chat.whatsapp.com/DmOJLDvGACrHCXh0bqURex