Mon, Sep 16, 2019 11:33होमपेज › Kolhapur › साखरेचे दर का घसरले?

साखरेचे दर का घसरले?

Published On: Dec 24 2017 1:44AM | Last Updated: Dec 24 2017 12:15AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : राजेंद्र जोशी

साखरेचा हंगाम सुरू झाल्यापासून अवघ्या दोन महिन्यांत बाजारातील साखरेचा दर क्‍विंटलला सरासरी 500 रुपयांनी खाली घसरल्याने साखर कारखानदारीचे अर्थकारणच बिघडून गेले आहे. साखरेच दर स्थिर राहण्यासाठी सर्व निकष घट्ट असताना आणि मागणी व पुरवठ्याचे समीकरणही सकारात्मक असताना अचानक घसरलेल्या या दराने साखर उद्योगाची झोप उडविली आहे. हे दर घसरण्यास उद्योगातील कमजोरीचा फायदा घेणारी बाजारातील व्यापार्‍यांची एक साखळीच कारणीभूत असल्याचा निष्कर्ष या क्षेत्रातील अभ्यासकांतून वर्तविला जात आहे.

अर्थव्यवहारामध्ये मार्केट सेंटिमेंटस् (बाजारातील लोकभावना) याला मोठे महत्त्व आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निकालावेळी प्रारंभीच्या काही तासांत काँग्रेस उमदेवारांनी आघाडी घेतल्यामुळे शेअरबाजार याच सेंटिमेंटस्ला बळी पडून सुमारे 700 अंशांनी खाली कोसळला होता. साखरेच्या बाजारातही याच सेंटिमेंटस्चा लाभ उठवित साखर उद्योगातील दलाल आपले उखळ पांढरे करून घेत असतात. गेल्या काही दिवसांमध्ये बाजारातील साखरेचे कोसळलेले दरही याच सेंटिमेंटस्चे बळी पडले आहेत, अशी चर्चा आता अभ्यासकांमध्ये सुरू झाली आहे. यासाठी काही आर्थिकदृष्ट्या कमकुवत खासगी साखर कारखानदारांच्या कमजोरीचा लाभ उठवित सटोडियांनी साखर कमी दराने खरेदी केली.

हा खरेदी व्यवहारही काही फार मोठा नव्हता. त्याचा गवगवा मात्र सार्‍या देशात झाला आणि बघता बघता पत्त्याचा बंगला कोसळावा, या पद्धतीने बाजारातील साखरेचे दर प्रतिक्‍विंटल 3 हजार 600 रुपयांवरून 3 हजार 50 रुपयांपर्यंत खाली घसरले. या व्यवहारात उद्योगाचे कोट्यवधींचे नुकसान तर झालेच. शिवाय, दरांचा आलेख वरही जात नाही, अशी स्थिती निर्माण झाल्याने साखर उद्योगापुढे आर्थिक संकट उभे आहे. या स्थितीत साखरेच्या बाजारातील कमाल किमतीवर अप्रत्यक्ष नियंत्रण आणणार्‍या केंद्र शासनाने जर साखरेची घसरण रोखण्यासाठी किमान विक्री किमतीचे बंधन (स्टॉप लॉस) घातले नाही, तर देशातील साखर उद्योगात शेतकर्‍यांच्या देण्यावरून आणि पुढील हंगामातील विक्रमी उत्पादनाच्या पार्श्‍वभूमीवर दराच्या पातळीवर मोठा गोंधळ उडू शकतो.

देशात साखरेचा हंगाम सुरू होण्यापूर्वी यंदा 23 लाख मेट्रिक टन साखर शिल्लक होती आणि यंदाच्या हंगामात 251 लाख मे. टन साखर उत्पादित होईल, असा अंदाज आहे. यामध्ये देशातील साखरेचा सरासरी 250 लाख मे.टन साखरेचा वापर लक्षात घेतला, तर हंगामोत्तर साखरेची शिल्लक 23 ते 24 लाख मे. टनावर जाते. म्हणजे या हंगामाचा साखरेचा ओपनिंग आणि क्‍लोजिंग स्टॉक जवळजवळ एकच आहे आणि हा साठा देशाची केवळ एक महिन्याची गरज भागवू शकतो. अर्थशास्त्रामध्ये साखर उद्योगाला ही अत्यंत पोषक अशी स्थिती समजली जाते. या स्थितीत बाजारातील साखरेचे भाव कोसळण्याचे कोणतेच कारण नव्हते.

या कारखान्यांना प्रारंभापासूनच आर्थिक अडचणी होत्या आणि एकूण व्यवहार पाहता बँकांमध्येही त्यांची पत यथातथाच असल्याने साखर विकल्याशिवाय शेतकर्‍यांना पैसा देता येत नाही, अशी त्यांची स्थिती होती. नेमक्या या स्थितीचाच दर घसरवण्यासाठी उपयोग करून घेतला गेला आणि एकदा दर घसरल्यानंतर झालेल्या घसरगुंडीत उर्वरित कारखान्यांनाही सहभागी होण्यावाचून पर्याय राहिला नाही. यामुळेच या षड्यंत्राची चौकशी जशी होणे आवश्यक, तसे एफआरपीच्या प्रमाणात बाजारातील साखरेचा किमान दर ठरविण्याची जबाबदारीही केंद्र शासनाला घ्यावी लागेल; अन्यथा आगामी हंगामात देशात साखर कारखान्यांचे बॉयलर पेटणेही अशक्य आहे.