Sun, May 31, 2020 13:30होमपेज › Kolhapur › पंचगंगेच्या पुराची इशारा पातळी धोक्याखाली (video)

पंचगंगेच्या पुराची इशारा पातळी धोक्याखाली (video)

Published On: Aug 14 2019 3:59PM | Last Updated: Aug 14 2019 8:56PM
कोल्हापूर : प्रतिनिधी

गेल्या 13 दिवसांपासून धोक्याच्या पातळीवरून वाहणार्‍या पंचगंगा नदीतील पाण्याची पातळी बुधवारी धोक्याच्या पातळीखाली आली आहे. पंचगंगा सध्या 40 फुटावरून म्हणजे इशारा पातळीवरून वाहत आहे. शहरातील जनजीवन बहुतांशी पूर्वपदावर आले आहे. शासनाच्या वतीने देण्यात येणार्‍या आर्थिक मदतीचे वितरण गतीने सुरू आहे. दिवसभरात 4,417 पूरग्रस्तांना दोन कोटी 20 लाख 85 हजार रु. मदतीचे वाटप करण्यात आले.

पाण्यामुळे बंद झालेले शहरातील सर्व रस्ते वाहतुकीसाठी खुले झाले आहेत. दरम्यान, शिरोळ परिसरातील पूरस्थितीत संथगतीने सुधारणा होत असून बचाव कार्यासाठी आणण्यात आलेल्या बोटींपैकी 4 बोटी आज परत पाठविण्यात आल्या. अजूनही 10 ते 12 गावांना पाण्याचा वेढा कायम आहे. जिल्ह्यातील बहुतांशी धरणे भरली आहेत. मुंबई मनपाचे आयुक्‍त प्रवीण परदेशी यांनी आज सर्व विभागप्रमुखांची बैठक घेऊन आढावा घेतला.

जिल्हा परिषदेतर्फे स्वच्छता मोहीम

ग्रामीण भागामध्ये पूर आलेल्या गावांमध्ये स्वच्छता मोहीम जिल्हा परिषदेच्या वतीने राबविण्यात आली आहे. पुराचे पाणी आलेल्या 316 गावांपैकी 273 गावांमध्ये ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. या स्वच्छता अभियानासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी खास नियोजन केले आहे. या स्वच्छता अभियानामध्ये जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील तरुण मंडळांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष शौमिका महाडिक यांनी केले आहे.

शिरोळ भागात 12 गावांना अद्याप पुराचा वेढा

शिरोळ परिसरातील गावांमधील पूरस्थितीत सुधारणा होत आहे. या परिसरातील बहुतांशी गावांतील बचाव कार्य पूर्ण झाले आहे. त्यामुळे बचाव कार्यासाठी बोलावण्यात आलेली पथके आता परत जाऊ लागली आहेत. आज 4 बोटीसह 24 जणांचे पथक परत पाठविण्यात आले. ज्या गावांना मदत पोहचविणे आवश्यक आहे, त्यासाठी एन.डी.आर.एफ.चे पथक अखेरपर्यंत ठेवण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. पूर्ण पाण्याने वेढा दिलेल्या गावांची संख्या 10 ते 12 आहे. मात्र या गावांतील सर्व लोक सुरक्षित आहेत. जिल्ह्यातील बहुतांशी धरणे आता भरली आहेत. धरण क्षेत्रातील पाऊस देखील कमी झाला आहे. त्यामुळे  राधानागरी धरणाचे सर्व दरवाजे बंद झाले आहेत.

90 हजार कुटुंबांचे स्थलांतर

पुराचे पाणी घरात गेल्याने जिल्ह्यातील 90 हजार 368 कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहे. त्यामध्ये 3 लाख 58 हजार 91 व्यक्‍तींचा समावेश आहे. त्यांच्यासाठी 224 निवारा केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.

आर्थिक मदतीचे वाटप

पूरग्रस्तांसाठी तत्काळ मदत म्हणून देण्यात येणार्‍या आर्थिक मदतीच्या वाटपास गती आली आहे. पाणी घरात गेल्याने शासनाकडून सानुग्रह अनुदान म्हणून देण्यात येणारे पाच हजार आज 4,417 इतक्या लोकांना वाटप करण्यात आले. ज्या घरामध्ये पाणी शिरले आहे, त्या सर्वांना ही रक्‍कम देण्यात येते. त्याचप्रमाणे निवारा केंद्रात राहणार्‍या पूरग्रस्तांना 60 व 45 रुपये दिले जाते. 60 रुपये मोठ्या व्यक्‍तींना व लहानांना 45 रुपये देण्यात येतात. पाण्यामुळे वरच्या मजल्यावर अडकलेल्या फ्लॅटधारकांना ही रक्‍कम मिळावी, अशी मागणी पुढे येत आहे. त्यामुळे फ्लॅटधारकांना मदत द्यायची की नाही, असा नवा मुद्दा उपस्थित झाला आहे. त्यासाठी शासनाकडे मार्गदर्शन मागविण्यात आले आहे.

गॅस टंचाई कायम

शहरात गेल्या दोन दिवसांपासून पेट्रोल व डिझेलचा मुबलक प्रमाणात पुरवठा करण्यात आला आहे. त्यामुळे पेट्रोल पंपावरील रांगा कमी झाल्या आहेत. गॅस सिलिंडरसाठी अजूनही ग्राहकांच्या रांगा लागलेल्या आहेत.  मागणीप्रमाणे गॅसचा पुरवठा होत नसल्याचे वितरकांचे सांगणे आहे. पूरग्रस्त भागातील ग्राहकांच्या गॅस कार्डबाबत अजूनही प्रशासनाने कोणताच निर्णय न घेतल्याने ग्राहकांमधून संताप व्यक्‍त होत आहे.

स्वच्छता मोहीम गतीने सुरू

शहरातील सर्व रस्ते वाहतुकीसाठी खुले करण्यात आले आहेत. ज्या रस्त्यावर पुराचे पाणी आले होते, ते रस्ते स्वच्छ करण्याची मोहीम सुरू आहे. पुरामुळे अन्यत्र स्थलांतरित झालेले लोक पुन्हा घरामध्ये आले आहेत. बुधवारी अनेकांनी घरातील स्वच्छता सुरू केली. पुरामुळे अनेकांच्या घरातील जीवनावश्यक साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. खराब झालेले साहित्य बाहेर काढण्याची लगबग सुरू होती.रस्त्यांवर या खराब साहित्याचा खच पडला होता. पाण्याची टंचाई आणि वीज नसल्याने घरातील कामे करताना अनेक अडचणी निर्माण होत हेात्या.दरम्यान, महापालिकेने अशा घरांच्या बाहेर औषध फवारणी करण्यास सुरुवात केली आहे. 

फोन सेवा बंद 

पुरामुळे कोल्हापूर शहरातील काही भागातील वीज पुरवठा बंद ठेवण्यात आला आहे. अजूनही खानविलकर पेट्रोल पंप तसेच शहरातील अन्य काही भागात वीज पुरवठा बंद आहे. त्यामुळे काही खासगी मोबाईल सेवा पुरवणार्‍या  कंपन्यांचे टॉवर बंद आहेत. याचा फटका ग्राहकांच्या मोबाईल सेवेवर झाला असून अनेकांचे फोन रेंज नसल्याने बंद आहेत. ग्रामीण भागातही स्थिती अशीच असून ग्राहकांना फोन करण्यात अडचणी निर्माण होत आहेत.  

व्यापार उद्योग पूर्ववत सुरू

पुरामुळे शहरात जीवनावश्यक मालाची वाहतूक करणारे ट्रक शिरोली पुलाजवळ अडकले होते. त्यामुळे शहरात मालाचा पुरवठा होऊ शकला नाही. सोमवारी हे ट्रक शहरात आले. बुधवारी दुकानांमध्ये माल आल्यानंतर ही दुकाने पूर्ववत सुरू झाली. त्यामुळे बाजारपेठेत वस्तूंंच्या खरेदीसाठी गर्दी झाली होती.  

अडीचशे मृत जनावरांची शास्त्रीयद‍ृष्ट्या विल्हेवाट

अर्थमुव्हिंग काँट्रॅक्टर्स अँड मशिनरी ओनर्स असोशिएशन, अर्थमुव्हर्स मशिनरी ओनर्स ग्रुपच्या माध्यमातून पशुसंवर्धन विभागाने अखेर अडीचशे मृत जनावरांची शास्त्रीयद‍ृष्ट्या विल्हेवाट लावली आहे.

मयतांच्या वारसांना 4 लाखांचे धनादेश

पुरामध्ये मरण पावलेल्या व्यक्‍तीच्या नातेवाईकांना मदत म्हणून शासनाच्या वतीने चार लाख रुपये देण्यात येतात. जिल्ह्यातील चार व्यक्‍ती पुरामध्ये मरण पावल्या होत्या. त्यामध्ये तानाजी पांडुरंग पोवार (रा. पिंपळे तर्फ सातवे, ता. शाहूवाडी), चिंतामणी मारुती कांबळे (कडलगे, ता. गडहिंग्लज), केशवर बाळू पाटील (इटे, ता. आजरा) व जिजाबाई सतुप्पा कडकट (हलकर्णी, ता. चंदगड) यांचा समावेश आहे. त्यांच्या नातेवाईकांना चार लाखाचे धनादेश आज देण्यात आले.

मदतीचा ओघ कायम

पूरग्रस्तांसाठी विविध सामाजिक संघटना व संस्थांकडून होत असलेला मदतीचा ओघ कायम आहे. आज 15 हजार 656 बिस्कीट पुडे, 1 लाख 61 हजार 615 पाण्याच्या बाटल्या, 6 हजार दूध पावडर पाकिटे, मेणबत्त्या 3 हजार 600, फूड पॅकेट 27 हजार 763, ब्लँकेट 2 हजार 320, सॅनिटरी नॅपकीन 14 हजार 450, साड्यांचे 201 बॉक्स व 5 हजार किलो तांदूळ साहित्य जमा झाले आहे.

पशुधनासाठी 30 हजाराची 

मदत : मंत्री देशमुख

ज्यांची जनावरे पुरामध्ये मृत्युमुखी पडली आहेत, अशा पूरग्रस्तांना 30 हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे. कृष्णा खोरे महामंडळाच्या माध्यमातून कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पूरभागातील पाणी दुष्काळी भागात वळवण्याचा विचार आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसनमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली. मंत्री देशमुख यांनी आज शिरोळ तालुक्यातील टाकळीवाडी येथील पूरग्रस्तांच्या शिबिराला भेट दिली. यावेळी गुरुदत्त शुगरचे अध्यक्ष माधवराव घाटगे, राहुल घाटगे, धीरज घाटगे आदी उपस्थित होते. या गावातील लोकांनी आमच्या गावाचे पुनर्वसन करावे अशी मागणी यावेळी केली. त्यावर घर नसलेल्या पूरग्रस्तांसाठी स्वतंत्र गावठाण करण्यात येईल, अशी ग्वाही मंत्री देशमुख यांनी दिली. आर्थिक मदतीचे वाटप सुरू करण्यात आले आहे. तसेच 10 किलो गहू, 10 किलो तांदूळही मोफत दिले जाणार आहे, असेही ते म्हणाले.

21 बंधारे अजूनही पाण्याखाली

जिल्ह्यातील अजूनही 21 बंधारे पाण्याखाली आहेत. राधानगरी धरणात आज अखेर 5.52 टीएमसी पाणीसाठा आहे. कोदे लघुप्रकल्प व जांभरे मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेला आहे. पंचगंगा नदीवरील : शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, भोगावती नदीवरील हळदी, राशिवडे, सरकारी कोगे व खडक कोगे तुळशी नदीवरील बीड, कासारी नदीवरील  वाळोली, ठाणे-आळवे, पुनाळ-तिरपण व  यवलूज, दूधगंगा नदीवरील  सुळकुड, सिद्धनेर्ली व दत्तवाड, वेदगंगा नदीवरील बस्तवडे व चिखली हे  बंधारे अजूनही पाण्याखाली आहेत. कोयना धरणात 43.92 टीएमसी तर अलमट्टी धरणात 88.24 इतका पाणीसाठा आहे. जिल्ह्यात आज गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 47 मि.मि. पावसाची नोंद झाली.

60 हजार ग्राहक अजूनही अंधारात

पुरामुळे जिल्ह्यातील अजूनही 60 हजार ग्राहक अंधारात आहेत.  आतापर्यंत 23 उपकेंद्र सुरू करण्यात आली असून त्यामुळे 1 लाख 92 हजार 564 ग्राहकांचा खंडीत झालेला वीजपुरवठा सुरू झालेला आहे.