होमपेज › Kolhapur › हवी आहे सरोगेट मदर?

हवी आहे सरोगेट मदर?

Published On: Apr 10 2018 1:15AM | Last Updated: Apr 09 2018 10:39PMकोल्हापूर : विजय पाटील 

जगभर चर्चेचा आणि टीकाटिपणीचा विषय असलेल्या सरोगसी मदर संकल्पनेची गरज वाढत चालली आहे. मुंबई, बंगळूर, चेन्नई आदी मेट्रो शहरे ही सरोगसीची व्यापारी केंद्रे बनली आहेत. परंतु, कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूरसारख्या निमशहरी परिसरात गरजूंची मागणी मोठी असतानाही सरोगसी मदर (भाडोत्री गर्भाशय देणार्‍या महिला) नाहीत, अशी स्थिती आहे. त्यामुळे हवी आहे सरोगेट मदर? असं इथलं वातावरण आहे.  

नव्या कायद्यानुसार, सरोगसी मदर हा विषय व्यावसायिकतेसाठी नसेल, तसेच भाडोत्री गर्भाशय देणारी महिला ही संबंधित कुटुंबाशी निगडित असावी, अशा तरतुदी असल्याने एकूणच सरोगसी हा विषय अधिकच किचकट प्रक्रियेचा होणार आहे. शाहरूख खान, आमीर खान, तुषार कपूर, करण जोहर आदी नामवंत बॉलीवूड स्टारडस्ट सरोगसीच्या माध्यमातून बाप बनले आहेत. सध्या देशात अधिकृत नोंदणीनुसार, दहा हजार सरोगसी मदरच्या माध्यमातून संतती प्राप्ती केली जाते. काही शहरांत अनधिकृत सरोगसीची फॅक्टरी जोरात चालते, हेही वास्तव आहे. महिलांच्या गर्भाशयास क्षयरोग झाला असल्यास त्यामध्ये गर्भधारणा करण्यास मर्यादा असते. तसेच काही महिलांना जन्मत:च गर्भाशय नसते.

याशिवाय  काही कारणाने गर्भाशय काढून टाकलेले असल्यास अशा महिलांसाठी सरोगसी हा पर्याय नव्या संशोधनानुसार उपलब्ध झाला. हा पर्याय चांगला असला, तरी यामध्ये गर्भाशय भाड्याने देणार्‍या महिलेचे शोषण होता कामा नये, ही मागणी सुरुवातीपासूनच  मांडली जात होती. कारण, पैशांच्या जीवावर गोरगरीब महिलांचे सरोगसीच्या माध्यमातून शोषण होईल, या शंकेला यामध्ये वाव आहे.  रशियासह बहुतेक देशांत सरोगसी म्हणजेच थर्ड पार्टी रिप्रोडक्शन या संकल्पनेला कायद्याने मोकळीक दिली आहे. परंतु, कुटुंबातीलच महिलेचे गर्भाशय वापरण्याची येऊ घातलेली तरतूद ही मोठी अडचणीची असल्याचे दिसते. यामुळे इच्छुक जोडप्यांना सरोगसीद्वारे होऊ शकणार्‍या संततीपासून वंचित राहावे लागणार आहे.

Tags : Kolhapur, Want,  surrogate, mother