Sun, Oct 20, 2019 06:10होमपेज › Kolhapur › हिंसाचार सहन करणार नाही : चंद्रकांत पाटील

हिंसाचार सहन करणार नाही : चंद्रकांत पाटील

Published On: Nov 10 2018 1:31AM | Last Updated: Nov 10 2018 1:31AMकोल्हापूर : प्रतिनिधी

साखरेचा दर कितीही घसरला तरी ऊस उत्पादक शेतकर्‍यांना एफआरपीप्रमाणे दर द्यावाच लागणार आहे. त्यामुळे खा. राजू शेट्टी यांनी साखर कारखानदारांसोबत चर्चा करून समन्वयाने यातून मार्ग काढावा. आंदोलनाच्या नावाखाली होणारी जाळपोळ किंवा फोडाफोडीबाबत सरकार आता मात्र बघ्याची भूमिका कदापि घेणार नाही. कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा पालकमंत्री ना. चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिला. 

शेतकर्‍यांचे नुकसान टाळण्यासाठी उद्यापासून साखर कारखानदारांनी आपले कारखाने सुरू करावेत, असे आवाहनही त्यांनी केली.शेतकर्‍याला एफआरपी अधिक अमूक रुपये मिळालेच पाहिजेत, मग त्यासाठी काय करावे लागेल, ते सरकारनेच बघावे, अशी भूमिका घेणे योग्य नाही. वस्तुस्थिती समजावून घेऊन मागणी करणे आवश्यक आहे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. एफआरपीच्या वरील रकमेसाठी चर्चा करावी, ते कसे पदरात पाडून घेता येतील, यासाठी जरूर त्यांनी भांडावे. सनदशीर मार्गाने आंदोलन करावे. मात्र, जाळपोळ करणे, फोडाफोडी करणे हे कितपत योग्य आहे. फोडाफोडी, जाळपोळ यात शेतकर्‍यांचेच नुकसान होत असल्याचे ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांवर खा. शेट्टी यांच्याकडून होत असलेल्या आरोपाबाबत पाटील म्हणाले, कोडोली येथील कष्टकरी परिषदेत एफआरपीबाबत मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट मांडली होती. एफआरपी तर बंधनकारक आहेच, त्याशिवाय कारखान्यांचा हंगाम संपल्यानंतर त्यांच्या नफ्यातील रक्कमही उत्पादकांना दिली पाहिजे, असे स्पष्ट मत त्यांनी मांडले होते. साखरेची किमान किंमत 2900 रुपये करण्यात आली, त्यामध्ये आणखी 200 रुपये वाढ करण्यासाठी आपण निश्‍चितपणे प्रयत्न करण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. असे असताना शेट्टी मुख्यमंत्र्यांवर आरोप करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत, ते त्यांनी थांबवावे, असे आवाहनही त्यांनी केले.

तोडगा काढण्यासाठी मी स्वत:हून गेलो नव्हतो

चार वर्षांत आताच शेट्टींचे आंदोलन आक्रमक का झाले, याचा विचार आता शेतकर्‍यांनी करावा. गेल्यावर्षी साखर कारखानदार आणि स्वत: शेट्टी यांनी ऊस दरप्रश्‍नी तोडगा काढण्यासंदर्भात लक्ष घालण्याची मागणी केली होती. त्यामुळे दोन्ही घटकांची बैठक घेऊन, त्यातून आपण मार्ग काढला होता. मी स्वत:हून गेलो नव्हतो. त्यामुळे आतादेखील स्वत:हून जाणार नाही. साखर कारखानदार, शेट्टी यांनी एकत्र बसावे आणि चर्चेतून मार्ग काढावा. जर त्यांनी आपल्याला बोलावले, तर आपण निश्‍चित जाऊ. शेवटी आंदोलन जेवढे जास्त काळ चालेल, त्यात शेतकर्‍यांचे नुकसान होणार आहे. हे आंदोलनाचे नेतृत्व करणार्‍यांनी लक्षात घ्यावे, असेही पाटील म्हणाले.

कडक कारवाई करणार

आंदोलनातील कार्यकर्त्यांवरील  गुन्हे मोठ्या मुश्किलीने काढून घेतले आहेत. त्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले. आंदोलनाच्या नावाखाली आता जर कोणी जाळपोळ आणि फोडाफोडी केली, तर सरकार कोणाची गय करणार नाही. संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

शेट्टींनी आवाहन करावे, पाहू या किती प्रतिसाद मिळतो

उसावर पडलेल्या हुमणीमुळे शेतकरी अगोदरच हैराण झाला आहे. तोडणी लांबली तर रिकव्हरी कमी होते. त्यामुळे सध्या जेवढ्या लवकर जाईल तेवढ्या लवकर ऊस आपला जावा, म्हणून शेतकरी प्रतीक्षा करत आहे. त्यामुळे शेट्टी यांनी ऊस दराचा प्रश्‍न सुटेपर्यंत शेतकर्‍यांनी आपला ऊस घालू नये, असे आवाहन करावे. म्हणजे समजेल त्यांना की किती शेतकरी आपल्या पाठीशी आहेत, असेही पाटील यांनी सांंगितले. गेल्या वर्षीदेखील साखर कारखान्यांना एफआरपी देताना अडचणी आाल्यामुळे शासनाने त्यांना आर्थिक मदत केली. त्यामुळे कारखाने रूळावर आले. आता देखील तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. 70:30 असे प्रमाण ठरले आहे. हंगाम संपला की सर्व कारखान्यांनी ताळेबंद तयार करायचा असतो. त्यामध्ये नफ्यातील 70 टक्के रक्कम शेतकर्‍यांना व 30 टक्के रक्कम व्यवस्थापनाला, असे धोरण आहे. यामध्ये एफआरपीची रक्कम वजा करून जी रक्कम होईल, ती शेतकर्‍याला दिली जाते. यात कारखाना ताळेबंद किती प्रामाणिकपणे सादर करतो, त्यावर ही रक्कम ठरत असते. यामध्ये विक्रमसिंह घाटगे यांचे नाव घ्यावे लागेल. ते तशी रक्कम शेतकर्‍यांना देत होते, असे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.