Sat, Jul 11, 2020 13:38होमपेज › Kolhapur › ‘गोकुळ’ला मल्टिस्टेट करणार्‍या महाडिक कंपनीला हाकलून लावा 

‘गोकुळ’ला मल्टिस्टेट करणार्‍या महाडिक कंपनीला हाकलून लावा 

Published On: Apr 20 2019 1:52AM | Last Updated: Apr 20 2019 1:27AM
कोल्हापूर : ज्या माता-भगिनींनी अहोरात्र काबाडकष्ट करून ‘गोकुळ’ला दूधपुरवठा केला, तो संघ दूध उत्पादकांच्याच मालकीचा राहिला पाहिजे, अशी जिल्ह्यातील तमाम दूध उत्पादकांची भावना आहे. पण काहीही करून गोकुळ’ दूध संघ आपल्या ताब्यात राहिला पाहिजे, यासाठी महाडिक कंपनीने ‘गोकुळ’ला मल्टिस्टेट करण्याचा घाट घातला आहे. त्यामुळे या महाडिक कंपनीला हाकलून लावा, असे आवाहन माजी आमदार सुरेश साळोखे यांनी केले.  भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ कसबा बावडा येथे आयोजित सभेत ते बोलत होते. 

यावेळी माजी आमदार साळोखे म्हणाले, गोकुळ दूध संघही जिल्ह्यातील हजारो दूध उत्पादकांची मालकी असणारा संघ आहे. दूध उत्पादकांच्या कष्टातून संघ उभारला आहे; पण महाडिक कंपनीने आपल्या व्यवसायासाठी दूध संघाचा वापर केला आहे. सभासदांनी दूधपुरवठा करायचा आणि महाडिकांनी या दुधावरील लोणी खायचे, असा प्रकार गेले कित्येक वर्षे सुरू आहे. महाडिकांच्या या एकाधिकारशाही विरुद्ध आ. सतेज पाटील यांनी जोरदार आवाज उठवला आणि जिल्ह्यातील अनेक महाडिक विरोधी नेत्यांना एकत्र करून ‘गोकुळ’ची निवडणूक लढविली. या निवडणुकीत महाडिक कंपनीबरोबरच सत्ताधारी कारभार्‍यांना घाम फुटायची वेळ आली. त्यांचा या निवडणुकीत थोड्या मतांनी झालेला विजय हा त्यांचा नैतीक पराभवच होता, असेही साळोखे यांनी सांगितले.  

‘गोकुळ’च्या निवडणुकीत दूध उत्पादक सभासदांनी दिलेला झटका पाहून महाडिक कंपनी पूर्ण हादरून गेली होती. त्यामुळे काहीही करून गोकुळ मल्टिस्टेट करण्याचा घाट त्यांनी घातला. या प्रकारामुळे कोल्हापुरातील दूध उत्पादकांच्या हक्‍कावर गदा येऊन कर्नाटकातील वाढीव दूध उत्पादकांच्या जोरावर ‘गोकुळ’ची सत्ता मिळविण्याचा डाव महाडिकांनी रचला होता. महाडिकांचा आजवरचा इतिहास पाहता त्यांना आपला व्यवसाय हा अबाधित राहावा, असे वाटते व त्यासाठी ते काहीही करायला मागे पुढे पाहत नाहीत, असा आरोपही साळोखे यांनी केला.  

वास्तविक महाडिक ‘गोकुळ’मध्ये घुसले आणि आता त्यांनी संघाचे खरेखुरे मालक असणार्‍या सभासदांनाच संघातून बाहेर घालवण्याचा कुटील डाव खेळला आहे. या महाडिकांना झटका देण्याची संधी दूध उत्पादकांना लोकसभेच्या निवडणुकीत मिळाली आहे. त्यामुळे शिवसेनेचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांना खासदार करून गोकुळ मल्टिस्टेट करू पाहणार्‍या महाडिकांना त्यांची जागा दाखवा, असे आवाहनही त्यांनी केले.  यावेळी शिवसेना-भाजप, रिपाइं, रासप, महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.