Fri, Jun 05, 2020 01:06होमपेज › Kolhapur › चायना मोबाईलचा वापर देशासाठी घातक!

चायना मोबाईलचा वापर देशासाठी घातक!

Published On: May 10 2019 12:18PM | Last Updated: May 10 2019 12:18PM
कोल्हापूर : सुनील कदम

अनेक देशांनी सुरक्षेच्या कारणास्तव चायनामेड मोबाईल, सीसीटीव्ही कॅमेरे व अन्य काही इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या वापरावर निर्बंध लादले आहेत. आपल्या देशाच्या सुरक्षेच्या  दृष्टिकोनातूनही चायनामेड मोबाईलसह अन्य इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वापर धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे शासनाने याबाबत धोरणात्मक निर्णय घेऊन चिनी मोबाईलसह अन्य संवेदनशील चिनी वस्तूंच्या वापराबाबत कठोर निर्णय घेण्याची आवश्यकता आहे.

चायना मोबाईल, झेडटीई आणि ह्युवेई या तीन चिनी कंपन्यांनी दूरसंचार क्षेत्रात चांगलेच हातपाय पसरले आहेत. ‘स्वस्तात मस्त’ या ग्राहकांना आकर्षित करणार्‍या मंत्राचा वापर करत या कंपन्या चीनसाठी हेरगिरी करीत असल्याचा संशय आहे. चीनने या कंपन्यांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेची परवानगी देतानाच ‘देशाच्या गुप्तचर यंत्रणांना सहकार्य करावे लागेल’, अशी कायदेशीर अट घातलेली आहे. ह्युवेई कंपनी तर चीन सरकारच्या मालकीचीच आहे. या कंपन्यांच्या माध्यमातून चीन वेगवेगळ्या देशांची गोपनीय आणि संवेदनशील माहिती मिळवत असल्याचे समोर आल्यामुळे अमेरिकेने गेल्या वर्षीच या कंपन्यांवर निर्बंध लादले आहेत.

आपल्या देशात मात्र याच कंपन्यांची मक्‍तेदारी दिसते. देशातील चाळीस ते पन्नास टक्के मोबाईल हे चायनामेड आहेत. युवा पिढी, विद्यार्थी, महत्त्वाच्या पदावर काम करणार्‍यांकडेही हे मोबाईल आहेत. या माध्यमातून चीन संवेदनशील आणि गोपनीय माहिती मिळवत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. ‘5-जी’च्या दिशेने वाटचाल करणार्‍या देशातील मोबाईल विश्‍वावर चीनचाच वरचष्मा आहे.  भविष्यातील धोका ओळखून चायनामेड मोबाईल कंपन्यांचे समूळ उच्चाटन करण्याची आवश्यकता आहे.

हालचालींवर ‘डोळा’!

देशातील सुमारे 80 टक्क्यांहून अधिक कॅमेरे चिनी बनावटीचे आहेत. यापैकी बहुतांश कॅमेरे चीन सरकारची मालकी असलेल्या ‘हॅगझाऊ हाईकव्हिजन डिजिटल टेक्नॉलॉजी’ या कंपनीचे आहेत. त्याचा वापर करून चिनी ड्रॅगन आपल्या प्रत्येक हालचालीवर डोळा ठेवून असण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासकीय यंत्रणेसह खासगी समूहांनीसुद्धा भविष्यात काळजी घेण्याची गरज आहे.