होमपेज › Kolhapur › विक्रमसिंह, मंडलिक यांचे पुतळे उभारणार

विक्रमसिंह, मंडलिक यांचे पुतळे उभारणार

Published On: Dec 26 2018 1:50AM | Last Updated: Dec 26 2018 1:37AM
कागल : प्रतिनिधी

सहकारातील दीपस्तंभ विक्रमसिंह घाटगे व लोकनेते सदाशिवराव मंडलिक हे दोन्ही नेते कागल तालुक्याच्या विकासाचे भागीदार आहेत. त्यांचे पुतळे कागल शहरात उभे करून त्यांच्या विचाराचे चिरंतन स्मारक उभे करण्यात यावे. याबाबत पालिकेच्या सभेत तसे ठराव करण्यात यावेत, असे आदेश आमचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी दिले आहेत. त्याप्रमाणे पालिकेच्या सभेत पुतळे उभारण्याचा निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती नगराध्यक्षा सौ. माणिक माळी, जिल्हा बँकेचे संचालक भैया माने यांनी पत्रकार परिषदेत दिली.

भैया माने म्हणाले, राजे विक्रमसिंह घाटगे यांच्याबद्दल सर्वांच्या मनात आदर आणि मान आहे. त्यांचा पुतळा उभा करण्यासाठी कोणाचेही दुमत आणि मतभेद असायला नकोत. त्यांनी कधीही कामगारांना तोशिश दिली नाही. मात्र, त्यांच्याच पुतळ्यासाठी कामगारांकडून निधी गोळा करणे म्हणजे त्यांची चेष्टा केल्याचा प्रकार आहे. आम्ही त्यांना अभिप्रेत असलेले काम करीत असताना त्यांची चेष्टा कशी काय? कामगारांच्या पगारातून कपात करून निधी गोळा करणे म्हणजे उलट त्यांची चेष्टा केली जात आहे, असे सांगून ते म्हणाले, राजे बँकेचे अध्यक्ष एम. पी. पाटील यांचा कागलशी काहीही संबंध नाही. कागलच्या जनतेच्या कष्टातून बँक उभी आहे. बँकेचे अध्यक्ष एम. पी. पाटील यांनी आमदार हसन मुश्रीफ यांच्याबद्दल बेताल वक्‍तव्य करीत असताना आपली पात्रता तपासावी. आमदार हसन मुश्रीफ यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला. भविष्यात असा प्रकार घडल्यास महागात पडेल, असा इशाराही दिला व समरजितसिंह घाटगे सक्षम पर्याय असतील तर त्यांनी निवडणुकीतून पळ काढू नये, असे ते म्हणाले.

माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर म्हणाले, राजे विक्रमसिंह घाटगे यांची हजारो कोटी रुपयांची संपत्ती समरजितसिंह घाटगे यांना मिळाली आहे. याचा विचार न करता कामगारांच्या पगारातून वीस टक्के कपात करण्याचा निर्णय दुर्दैवी आहे. कामगारांच्या वाढदिवसानिमित्त 2500 रुपये घेऊन राम मंदिरात अभिषेक घालण्याची प्रथादेखील सुरू करण्यात आली. समरजितसिंह घाटगे यांच्याकडे पैसे नसतील तर आम्ही गोळा करू, यासाठी गावातून फेरी काढण्यात आली. त्याचवेळी नोकरीच्या भीतीने कामगारांनी निषेध केला आणि फेरी काढली. त्यांच्यावर वरिष्ठ पातळीवरून दबाव आणला असावा, असे त्यांनी स्पष्ट केले.

उपनगराध्यक्ष प्रवीण काळबर म्हणाले, स्व. विक्रमसिंह घाटगे व स्व. सदाशिवराव मंडलिक यांच्या पुतळ्यांच्या चबुतर्‍याचे काम पालिका स्वनिधीतून करेल व त्यावरील पुतळ्यासाठी येणारा खर्च आम्ही स्वत: उभा करू. त्यासाठी कोणत्याही कामगारांच्या पगारातून एक रुपयादेखील कपात केली जाणार नाही. 

पत्रकार परिषदेला रमेश माळी, माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर, उपनगराध्यक्ष प्रवीण काळबर,नगरसेवक विवेक लोटे, सतीश गाडीवड्ड, आनंदा पसारे, बाबासो नाईक, नितीन दिंडे, सौरभ पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.