Mon, Sep 16, 2019 04:32होमपेज › Kolhapur › पूरग्रस्त अनाथ मुलांची बारावीपर्यंत शिक्षणाची जबाबदारी ‘पुढारी’ घेणार

पूरग्रस्त अनाथ मुलांची बारावीपर्यंत शिक्षणाची जबाबदारी ‘पुढारी’ घेणार

Published On: Aug 19 2019 1:32AM | Last Updated: Aug 19 2019 1:32AM
कोल्हापूर : प्रतिनिधी

महाराष्ट्रावर कोसळलेल्या अभूतपूर्व अशा पुराच्या संकटाने अनेकांचे संसार उद्ध्वस्त केले. त्याचबरोबर काही मुले अनाथ झाली. राज्यातील अशा सर्व अनाथ मुला-मुलींच्या बारावीपर्यंतच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी दै. ‘पुढारी’ने स्वीकारली आहे. ही जबाबदारी आपण स्वीकारत असल्याचे  पत्र दै. ‘पुढारी’चे व्यवस्थापकीय संपादक डॉ. योगेश जाधव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविले आहे.

कोल्हापूर, सांगली, सातारा, नाशिक, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर यांसह राज्यातील अन्य जिल्ह्यांना पुराचा मोठा फटका बसला. महापुराने अनेकांची घरे होत्याची नव्हती केली. त्याचबरोबर या पुराने अनेक मुलांचे पालकत्वही हिरावून घेत त्यांना पोरके केले.

राज्यातील अशा सर्व अनाथ मुला-मुलींची बारावीपर्यंतच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी दै. ‘पुढारी’ने घेतली आहे. त्यांचा सर्व शैक्षणिक खर्च ‘पुढारी’ करणार आहे. याबाबत डॉ. योगेश जाधव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपण ही जबाबदारी घेत असल्याचे पत्र पाठविले आहे. त्याचबरोबर अशा मुला-मुलींची नावे आणि पत्तेही मुख्यमंत्री कार्यालयाकडून मागविले आहेत.