Wed, Jun 26, 2019 16:13होमपेज › Kolhapur › सोशल मीडियाचा... हा मार सोसंना!

सोशल मीडियाचा... हा मार सोसंना!

Published On: Apr 19 2019 1:49AM | Last Updated: Apr 18 2019 8:39PM
सुनील कदम

लोकसभा निवडणुकीचा शेवटच्या पर्वात सोशल मीडियावरही ‘सोशल वॉर’ चांगलेच जोमात येताना दिसत आहे. गल्लीपासून ते पार दिल्लीपर्यंतचा एकही नेता आणि कार्यकर्ता या ‘नेटकर्‍यांच्या’ भडिमारापासून सुटताना दिसत नाही. कोण आपापल्या पक्षाची आणि नेत्यांची भलावण करताना दिसत आहे, तर कुणी कोणत्या नेत्याची टपली उडविताना दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा, काँग्रेस पक्षाध्यक्ष राहुल गांधी, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, मनसेचे राज ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह बहुतेक सगळ्या नेत्यांना आणि काही बहुचर्चित लोकांना नेटकर्‍यांनी आपापल्या द‍ृष्टिकोनातून पणाला लावल्याचे दिसत आहे.

गेल्या काही दिवसांत राज ठाकरे यांच्या सभांचा चांगलाच बोलबाला आहे. प्रामुख्याने मोदी-शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर राज ठाकरे निशाणा साधताना दिसत आहेत. राज हे सभेदरम्यान दाखवीत असलेल्या व्हिडीओ क्‍लिपही चर्चेत आहेत. त्यामुळे कुणी भाजपभक्‍ताने फेसबूकवर भाजप समर्थनार्थ एक पोस्ट टाकली की अवघ्या काही क्षणात ‘ए लाव रे तो व्हिडीओ’ अशा स्वरूपाच्या शेकडो पोस्ट त्याच्या प्रत्युत्तरादाखल पडताना दिसत आहेत. भाजप नेत्यांची खिल्ली उडविण्यासाठी कुणी नेटकरी ‘अभ्यास केला राहुल गांधी विषयाचा आणि प्रश्‍नपत्रिका आली राज ठाकरे विषयावरची’ अशाही टिप्पणी करताना दिसतो आहे. ‘माझे दुकान चालत नाही, म्हणून मी दुसर्‍याचे दुकान चालवायला घेतले आहे’ अशा शब्दांत राज ठाकरेंच्या भूमिकेची खिल्ली उडविणार्‍या पोस्ट चांगल्याच तडतडताना दिसताहेत. ‘पूर्वी राष्ट्रवादीचे घड्याळ टिक टिक करायचे, आजकाल ते झुक झुक करतंय’ असे म्हणून कुणी नेटकरी मनसे-राष्ट्रवादीच्या मिलीभगतकडे अंगुलीनिर्देश करतो आहे. भाजपच्या ‘मैं भी चौकीदार’ या मोहिमेचीही सोशल मीडियावरून चेष्टा करण्याचे प्रकारही पाहायला मिळत आहेत. ‘लाखो रुपये खर्चून आई-बापांनी याला चांगला इंजिनिअर केला आणि पोरगं म्हणतंय मैं भी चौकीदार’ अशा स्वरूपाची गुगली मधूनच कोणी टाकताना दिसत आहे.

काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील हे आपला मुलगा सुजय पाटील याला काँग्रेसने उमेदवारी न दिल्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीवर नाराज आहेत. आज त्यांचा मुलगा भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवीत असून विखे-पाटील त्याच्यासाठी प्रचार करीत असल्याचा बोलबाला आहे. त्यामुळे ‘राधाकृष्ण हे काँग्रेसचे विरोधी पक्षनेते आहेत की पक्षविरोधी नेते आहेत’? असा बोचरा सवाल कुणी उपस्थित करताना दिसत आहे. शरद पवारांनी माढा लोकसभा मतदारसंघातून आपली उमेदवारी मागे घेतल्यामुळे ‘ओपनिंग बॅटस्मनच स्टेडियम सोडून पळाला’ असा टोमणा कुणी भाजप समर्थकाकडून मारला जाताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी भाजप-शिवसेनाविरोधी प्रचाराचे चांगलेच रान उठविल्याचे दिसत आहे. त्यावरून चिडलेला कुणी युतीभक्‍त ‘प्रचारसभा असली की यांच्या तोंडात बळ येते आणि भ्रष्टाचाराच्या खटल्याची तारीख आली की यांच्या छातीत कळ येते’ असे म्हणून आपला राग व्यक्‍त करताना दिसत आहे.

स्मृती इराणींच्या शैक्षणिक पात्रतेचा मुद्दाही गेल्या काही दिवसांत खालपासून वरपर्यंत चांगलाच चर्चेत आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी आपली शैक्षणिक पात्रता पदवीधर दर्शविली होती म्हणे! यंदा त्यांनी आपण बारावीपर्यंत शिक्षण घेतल्याचे स्पष्ट केले आहे. यावर ‘असल मे स्मृतीमॅडम ग्रॅज्युएटही हैं, लेकीन बारा प्रतिशत जीएसटी लगनेकी वजहसे वो अभी बारहवी तक पहुंची हैं’ असा अस्सल टोमणा कुणाच्या तरी सुपिक डोक्यातून बाहेर पडताना दिसत आहे. अधूनमधून योगगुरू रामदेवबाबा आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेही या नेटकर्‍यांच्या ‘जाळ्यात’ अटकताना दिसत आहेत. अशा पद्धतीने नेमक्या, शेलक्या, नर्मविनोदी आणि बोचर्‍या शब्दांत नेटकर्‍यांच्या प्रतिभेला भर येताना दिसत आहे. काही मंडळी उत्साहाच्या भरात एकमेकांच्या राजकीय पक्षाची, नेत्यांची आणि त्यांची वैयक्‍तिक व खासगी उणीदुणीसुद्धा या निमित्ताने काढताना दिसत आहेत. त्यामुळे या शाब्दिक भडिमारात अनेकांवर ‘जायबंदी’ होण्याची वेळ आली आहे.

राजू शेट्टी स्पेशल!

राजू शेट्टी यांनी या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीशी म्हणजेच साखर कारखानदारांशी केलेली गट्टी अनेकांना मान्य नाही. गेल्या दोन निवडणुकांमध्ये साखर कारखानदारांच्या चिथावणीमुळे पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्यात राजू शेट्टींचे डोके फुटून ते रक्‍तबंबाळ झालेले फोटो प्रचारात काही ठिकाणी बघायला मिळत होते. नेमका हाच फोटो सध्या सोशल मीडियावरून फिरत आहे. फरक फक्‍त एवढाच, की त्या खाली डोकेबाज नेटकर्‍यांनी केलेली मार्मिक कॉमेंट आहे की, ‘डोकं फोडलेला फोटो प्रचारात वापरू नका. कारण, डोकं कुणी फोडलं असं मतदारांनी विचारलं तर काय सांगणार?’