Mon, Sep 16, 2019 05:35होमपेज › Kolhapur › दाजीपुरात वन्यजीवांची संख्या वाढली

दाजीपुरात वन्यजीवांची संख्या वाढली

Published On: May 08 2018 1:56AM | Last Updated: May 07 2018 11:47PMकौलव : राजेंद्र दा. पाटील

विविध ठिकाणी वन्यजीव संकटात येत असताना, पर्यावरणप्रेमींसाठी चांगली बातमी आहे. दाजीपूर वन्यजीव अभयारण्यातील गवारेडे, सांबर, अस्वलांसह वन्यजीवांची संख्या वाढली आहे. बुद्ध पौर्णिमेला झालेल्या प्राणी गणनेतून हे स्पष्ट झाले आहे. प्राणी गणनेची अंतिम आकडेवारी संगणकीय संस्करणानंतर जाहीर केली जाणार आहे.

बुद्ध पौर्णिमेला संपूर्ण देशातील अभयारण्यांतून प्राणी गणना केली जाते. दरवर्षी ट्रान्सेट लाईन पद्धतीने तृणभक्षी व कॉर्नव्हेरा साईन पद्धतीने मांसभक्षी प्राण्यांची चार दिवस प्राणी गणना केली जाते. मात्र, यावर्षी प्रथमच पारंपरिक पद्धतीने पाणवठ्यावर मचाण बांधून प्राणी गणना करण्यात आली आहे. दाजीपूर अभयारण्यात राधानगरी रेंजमध्ये 14 व दाजीपूर रेंजमध्ये 7 बीटमध्ये ही गणना करण्यात आली. एकूण 27 मचाणांवर प्रत्येकी वन खात्याचा एक कर्मचारी व दोन स्वयंसेवक अशा 81 जणांनी प्रत्यक्ष प्राणी गणनेत भाग घेतला होता.

या प्राणी गणनेत अभयारण्याच्या सर्वच भागांत गवारेड्यांची संख्या वाढल्याचे निदर्शनास आले. बहुतांशी पाणवठ्यांवर गव्यांचे थेट दर्शन झाले. शाहू महाराजांनी शिकारीसाठी राखीव ठेवलेल्या नाणीवळे, बांबर्डे परिसरात बिबट्यांच्या पाऊलखुणा व विष्ठा आढळून आली. त्यामुळे अभयारण्यात बिबट्यांची संख्याही लक्षणीय असल्याचे स्पष्ट झाले. 

या परिसरासह निदानखाणच्या घनदाट परिसरात अस्वलांची संख्या वाढली आहे. अस्वल सहसा मानवी हालचालींच्या परिसरात जात नाहीत. मात्र, अनेक पाणवठ्यांवर अस्वलांनी थेट दर्शन दिले. राज्याचे मानचिन्ह असलेल्या शेखरू खारीसह सांबर, भेकर, रानडुक्‍कर, उदमांजर व साळिंदर या प्राण्यांची, तसेच मोर, रानकोंबड्यांची संख्याही लक्षणीय वाढली आहे. अभयारण्यात जैवविविधता वाढवण्यासाठी वन विभागाने नियोजनबद्ध प्रयत्न चालवले आहेत. बांबूची बेटे, गवती कुरणे व कारवीची कोवळी पाने हे गव्यांचे खाद्य आहे. त्यात वाढ झाल्यामुळे गव्यांची संख्या वाढली आहे. एरव्ही रात्रीच्या वेळी पर्यटकांना अभयारण्यात प्रवेश दिला जात नाही. मात्र, या प्राणी गणनेच्या निमित्ताने हौशी पर्यटकांना बुद्ध पौर्णिमेच्या शुभ्र चांदण्यात प्राण्यांच्या हालचाली न्याहाळण्याची पर्वणी लाभली. या प्राणी गणनेची अंतिम आकडेवारी संगणकीय अ‍ॅनालिसिस करून अधिकृत जाहीर केली जाणार आहे.

वाघ आणि रानकुत्रे गायब?

या अभयारण्यात पूर्वी पट्टेरी वाघाच्या अधिवासाचे पुरावे मिळाले होते. तसेच रानकुत्र्यांचे प्रमाणही जास्त होते. मात्र, या प्राणी गणनेत पट्टेरी वाघाच्या अधिवासाचा कोणताही पुरावा आढळला नाही. तसेच कोणत्याही पाणवठ्यावर रानकुत्र्याचे दर्शन झाले नाही.