Fri, Jan 24, 2020 04:53
    ब्रेकिंग    होमपेज › Kolhapur › पूरग्रस्त कुटुंबास 5 लिटर मोफत रॉकेल

पूरग्रस्त कुटुंबास 5 लिटर मोफत रॉकेल

Published On: Aug 20 2019 1:45AM | Last Updated: Aug 20 2019 1:48AM
कोल्हापूर : प्रतिनिधी

जिल्ह्यातील पूरग्रस्तांना प्रति कुटुंब 5 लिटर रॉकेल मोफत वाटप करण्यात येणार आहे. यासाठी एकूण 34 टँकर वितरणास जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी मंजुरी दिली आहे. घाऊक रॉकेल वितरकांनी दिलेल्या रॉकेल कोट्याची तत्काळ उचल करून किरकोळ रॉकेल वितरकांस रॉकेल तत्काळ उपलब्ध करून द्यावे. दिरंगाई झाल्यास नैसर्गिक आपत्ती अधिनियमअंतर्गत कारवाई करण्यात येईल, असा इशाराही जिल्हाधिकार्‍यांनी दिला आहे. दरम्यान, पूरग्रस्तांना सोमवार अखेर 46 हजार 885 कुटुंबांना 23 कोटी 44 लाख 25 हजार इतक्या रकमेचे सानुग्रह अनुदान वाटप झाले आहे. शहरातील पडझड झालेल्या घरांचे महापालिकेच्या वतीने सर्वेक्षण सुरू करण्यात आले.

जिल्ह्यातील पूरग्रस्तांना दिलासा देण्याचे काम प्रशासन आपल्यापरीने करत आहे. पुराचे पाणी ओसरू लागल्यानंतर तातडीने पंचनामे सुरू करून सानुग्रह अनुदानाचे वाटप सुरू केले. आता शासनाने पूरग्रस्तांना प्रति कुटुंब पाच लिटर रॉकेल देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी प्रत्येक तालुक्याला टँकर उपलब्ध करून देऊन त्याच्या वितरणाचे आदेशही दिले आहेत.

पूरग्रस्तांना तातडीने देण्यात येत असलेल्या सानुग्रह अनुदानाचे वाटप तसेच पंचनामे सुरू आहे. शिरोळ तालुक्यात आतापर्यंत सर्वात अधिक 26 हजार 392 कुटुंबांना 13 कोटी 19 लाख 60 हजारांचे सानुग्रह अनुदान वितरित करण्यात आले आहे. करवीर तालुक्यात 7 हजार 561 कुटुंबांना 3 कोटी  78 लाख रुपये वितरित करण्यात आले आहेत. याशिवाय कागल तालुक्यात 91.85 लाख, पन्हाळा 43.75 लाख, शाहूवाडी 22.10 लाख, हातकणंगले 372.80 लाख, राधानगरी 37.35 लाख, भुदरगड 7.35 लाख, गगनबावडा 5.05 लाख, गडहिंग्लज 54.25 लाख,  आजरा 2.30 तर  चंदगड तालुक्यातील पूरग्रस्तांना 9.80 लाखांचे सानुग्रह अनुदान वितरित करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून रिलीफ फंडाला पाच कोटी

जिल्हाधिकारी कार्यालयाने पूरग्रस्तांसाठी सुरू केलेल्या कोल्हापूर डिझास्टर रिलीफ फंडाच्या खात्यामध्ये मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पाच कोटी रुपये प्राप्‍त झाले आहेत. या निधीतून स्वयंसेवी संघटनांमार्फत पूरग्रस्तांना जे साहित्य वितरित करण्यात येणार आहे, त्याच्या वाहतुकीच्या इंधनावरील खर्च भागविण्यात येणार आहे. त्याचबरोबर मृत जनावरांची विल्हेवाट लावण्यासाठी यातून खर्च करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.

पूरग्रस्तांच्या गॅस दुरुस्तीसाठी दीडशे तंत्रज्ञ

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगली आणि कोल्हापूरमधील पूरग्रस्तांच्या गॅस दुरुस्तीसाठी दीडशे जणांचे पथक कार्यरत केले आहे. गेल्या पाच दिवसांपासून हे पथक कोल्हापुरात पूरग्रस्तांसाठी मोफत काम करत आहे. पुरामध्ये पूरग्रस्तांच्या प्रापंचिक साहित्यांचे मोठ्या प्रमाणत नुकसान झाले आहे. यामध्ये गॅस शेगडीचे नादुरुस्त झाल्याने नागरिकांची झालेली अडचण लक्षात घेऊन पालकमंत्री पाटील यांनी गॅस शेगडी दुरुस्तीसाठी पुण्यातून 100 आणि जिल्ह्यातील 50 अशा दीडशे तंत्रज्ञ कार्यरत केले. यामध्ये कोल्हापूर शहरासाठी 50, शिरोळ तालुक्यासाठी 50, इचलकरंजीसाठी 25 आणि इस्लामपूर, वाळवा व सांगलीसाठी 25 जणांचा समावेश आहे. टप्प्याटप्प्याने आवश्यकतेनुसार हे तंत्रज्ञ सर्व पूरग्रस्त गावांमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

शहरातील सिद्धार्थनगर परिसरात अनुदान वाटप पूर्ण 

शहरातील पूरबाधित क्षेत्रात पंचनाम्यांचे कामकाज सुरू असून सोबतच अनुदान वाटपाचे कामही सुरू आहे. सिद्धार्थनगर परिसरातील अनुदान वाटप पूर्ण झाले आहे. पूरग्रस्तांनी आपल्या सोबत रहिवासी पुरावा ठेवावा, असे आवाहन करवीरचे उपविभागीय अधिकारी सचिन इथापे यांनी केले आहे. 

शहरातील यादवनगर, शास्त्रीनगर ओढ्यालगतचा भाग, केएमसी वर्कशॉप, वाय. पी. पोवारनगर ओढ्याचा परिसर, पोवार कॉलनी, वसंतराव जाधव पार्क, रामानंद नगर, लक्षतीर्थ वसाहत, सुतारमळा, शिंगणापूर नाका परिसर, लक्षतीर्थ वसाहत परिसर, मीराबाग, डी मार्ट मागील बाजू या भागातील पूरग्रस्तांना उद्या अनुदान वाटप होणार आहे. बाधित रहिवाशांनी रहिवास पुरावा म्हणून रेशन कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक, मतदान ओळखपत्र इत्यादी पंचनामा, अनुदान वाटपावेळी संबंधित अधिकारी, कर्मचारी यांच्याकडे सादर करावा. उर्वरित बाधित भागामध्येही लवकरच अनुदान वाटप करण्यात येणार आहे. 

कागदपत्र उपलब्ध करून देण्यासाठी कॅम्प 

पुरामध्ये अनेक जणांचे महत्त्वाची कागदपत्रेही गेली आहेत. त्यामध्ये रेशन कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक, मतदान ओळखपत्र आदींचा समावेश आहे. ही कागदपत्रे पुन्हा मिळवून देण्यासाठी प्रशासनाच्या वतीने ई सेवा केंद्र चालकांशी चर्चा करून कॅम्प लावले जातील, असे निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी सांगितले.

मदत स्वीकारण्यास पूरग्रस्तांचानकार

शिरोली जकात नाक्याजवळ असलेल्या घरांचे स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला असल्याची महिती येथील लोकांना समजल्यानंतर त्यांनी शासकीय मदत घेण्यास नकार दिल्याचे समजते. त्यामुळे निधी वितरित करण्यासाठी गेलेल्या पथकाला तेथून परतावे लागल्याचे समजते.

धरणातील पाणी साठा

जिल्ह्यातील राधानगरी धरणात आजअखेर 6.11 टीएमसी पाणीसाठा आहे. कोदे लघुप्रकल्प व जांबरे मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेला आहे. पंचगंगा नदीवरील राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ हे सहा, भोगावती नदीवरील खडक कोगे हा एक, कासारी नदीवरील यवलूज असे एकूण 8 बंधारे पाण्याखाली आहेत. कोयना धरणात 49.53 टीएमसी तर अलमट्टी धरणात 107.878 इतका पाणीसाठा आहे. जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा पुढीलप्रमाणे  : तुळशी 2.10 टीएमसी, वारणा 20.65 टीएमसी, दूधगंगा 11.20 टीएमसी, कासारी 1.85 टीएमसी, कडवी 1.91 टीएमसी, कुंभी 1.80 टीएमसी, पाटगाव 2.35 टीएमसी, चिकोत्रा 0.77 टीएमसी, चित्री 1.15 टीएमसी, जंगमहट्टी 0.91 टीएमसी, घटप्रभा  1.56 टीएमसी, जांबरे 0.82 टीएमसी, कोदे (ल.पा.) 0.21 टीएमसी.

प्रत्येक विभागाने कृती आराखडा तयार करावा, मोठ्या गावांच्या ठिकाणी मनुष्यबळ वाढवावे, प्रत्येक विभागाने कामकाजाबाबत कृती आराखडा तयार करावा तसेच पूरग्रस्त गावात सर्वेक्षण करण्यासाठी मोठ्या गावांच्या ठिकाणी मनुष्यबळ वाढवून लवकरात लवकर कामकाज पूर्ण करावे, अशी सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केली. 

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शाहू सभागृहामध्ये आज सायंकाळी विभागप्रमुखांची बैठक झाली. या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, डब्ल्यूएचओचे सल्‍लागार डॉ. हेमंत खरनारे उपस्थित होते.  

जिल्हाधिकारी देसाई यांनी पूरग्रस्त गावांमध्ये होत असलेल्या सर्वेक्षणाबाबत सविस्तर आढावा घेतला. ते म्हणाले, मालमत्ता नुकसानीबाबत वस्तुनिष्ठ अहवाल उद्यापर्यंत द्यावा. पडलेल्या घरांची, नुकसान झालेल्या घरांची गावनिहाय यादी तयार करावी. आवश्यक त्या ठिकाणी जवळच्या महाविद्यालयांचे विद्यार्थी मदतीसाठी घ्यावेत. तहसीलदारांनी केलेले पंचनामे घेऊन घर पडझडीची माहिती त्वरित भरावी. मृत जनावरांच्या संख्येबाबत खात्री करून घ्यावी. जनावरांचे आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी 5 ते 10 लाखांपर्यंत कृती आराखडा तयार करावा. आरोग्याच्या सुविधेबाबत मनुष्यबळ वाढवून सर्वेक्षण करावे. लवकरात लवकर कामकाज पूर्ण होईल यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. 

आलासमध्ये केवळ 200 घरांचेच सर्वेक्षण

डॉ. खरनारे यांनी आज नृसिंहवाडी आणि आलास या गावांमध्ये भेट दिली. तेथील वस्तुस्थिती त्यांनी आज बैठकीत मांडली. ते म्हणाले, आशा वर्कर्सची घरे बाधित झाल्यामुळे त्या सध्या फिल्डवर नाहीत. अशा ठिकाणी बाहेरून आशा वर्कर्स बोलवावे लागतील. युनिसेफचे 12 ते 14 जणांचे पथक सर्वेक्षणासाठी येणार आहे. मोठ्या प्रमाणात स्वच्छता आणि पावडरची फवारणी झाल्याचे दिसून येत आहे. ताप, गॅस्ट्रो, उलट्या अशा वर्गीकरणानुसार रुग्णांच्या नोंदी होत आहेत. यामध्ये लहान मुलांचा समावेश दिसून येत नाही. आलासमध्ये केवळ दोनशे घरांचे सर्वेक्षण झाले आहे. अद्यापही हजार घरे बाकी आहेत. याबाबत मुदत ठरवावी लागेल. गावांमध्ये बसविण्यात आलेल्या आरओ पाण्याचा चांगला परिणाम दिसून आला, असेही ते म्हणाले.