Tue, Oct 22, 2019 13:46होमपेज › Kolhapur › कोल्हापूर : सहाशे रुपयाची लाच घेताना तलाठी जाळ्यात

कोल्हापूर : सहाशे रुपयाची लाच घेताना तलाठी जाळ्यात

Published On: Sep 11 2019 7:29PM | Last Updated: Sep 11 2019 7:01PM
कोल्हापूर : प्रतिनिधी

विहिरीची नोंद ऑनलाईन सातबाऱ्यावर करण्यासाठी ६०० रुपयाची लाच घेताना तलाठी गणेश शिंदे याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने आज (ता.११) रंगेहात पकडले. गणेश शिंदे हा करवीर तालुक्यात दऱ्याचे वडगाव आणि कोगील बुद्रुकचा तलाठी आहे. 

दऱ्याचे वडगाव या गावात तक्रारदाराची वडिलोपार्जीत शेती आहे. या शेत जमिनीमध्ये जवाहर अनुदान योजने अंतर्गत तक्रारदाराने विहीर खोदली आहे. या विहिरीची नोंद हस्तलिखीत सातबाऱ्यावर घेतली आहे. परंतु, ऑनलाईन सातबाऱ्यावर घेतलेली नाही. या नोंदीसाठी तक्रारदाराने तलाठी गणेश शिंदे याची वेळोवेळी भेट घेवून ऑनलाईन नोंदीसाठी अर्ज देण्याबाबत विचारणा केली होती. परंतु, अर्जाची काही आवश्यकता नाही असे उत्तर तलाठी शिंदे याने देवून अर्ज स्वीकारला नाही. 

७ सप्टेंबर रोजी तक्रारदार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील एनआयसी विभागात जाऊन गणेश शिंदे याची भेट घेतली आणि ऑनलाईन नोंदीबाबत चर्चा केली. यावेळी गणेश शिंदे याने ६०० रुपयाची मागणी नोंदीसाठी केली. त्याबाबत तक्रारदाराने आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे गणेश शिंदेविरुध्द तक्रार दाखल केली. ६०० रुपयाची लाच मागितल्याचे आज पडताळणीमध्ये सिध्द झाले. एनआयसी विभागात ऑनलाईन सातबाऱ्याची प्रत तक्रारदाराला देवून ६०० रुपयाची लाच स्वीकारताना तलाठी गणेश शिंदे हा रंगेहात सापडला. त्याच्या विरुध्द शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.  

पोलिस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जितेंद्र पाटील, सहायक फोजदार शाम बुचडे, पोलिस नाईक शरद कोरे, नवनाथ कदम, हवलदार मयुर देसाई, रुपेश माने, विष्णू गुरव यांच्या पथकाने ही कारवाई केली.