Tue, Sep 17, 2019 04:15होमपेज › Kolhapur › गद्दारांवर कारवाई करा

गद्दारांवर कारवाई करा

Published On: Mar 13 2019 1:41AM | Last Updated: Mar 13 2019 1:07AM
कोल्हापूर : प्रतिनिधी 

स्वत:च्या सोयीचे राजकारण करून आपली खुर्ची टिकवण्यासाठी अन्य पक्षांच्या उमेदवारांशी साटेलोटे करणार्‍या  शिवसेनेमधील  झारीतील शुक्राचार्य कोण आहेत, हे ओळखून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी शिवसेना गटप्रमुखांच्या मेळाव्यात पदाधिकारी व लोकप्रतिनिधींनी केली. या मागणीने शिवसेनेतील अंतर्गत गटबाजीला नव्याने तोंड फुटले आहे; तर प्रा. संजय मंडलिक यांना लोकसभेत निवडून आणण्यासाठी  शिवसैनिकांनी आपापसातील मतभेद विसरून कामाला लागावे, असे आवाहन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी केले. 

भाजप-शिवसेना युती झाल्याचा फायदा होणार असल्याचे सांगून रावते म्हणाले, लोकसभेत कोल्हापूर म्हणजे सदाशिवराव मंडलिक, अशी ओळख होती. ही ओळख नव्याने प्रा. संजय मंडलिक यांच्या रूपाने तयार होणार आहे. गेल्या निवडणुकीत अवघ्या काही मतांनी त्यांचा पराभव झाला; पण नंतर ते भगव्याशी एकनिष्ठ राहिले. मध्यंतरी या मतदारसंघातून दुसरा उमेदवार देणार, अशी चर्चा होती; पण उद्धव ठाकरे हे कायम प्रामाणिक शिवसैनिकांच्या मागे असतात. म्हणून, त्यांनी प्रा. मंडलिक यांना कामाला लागण्याचे आदेश दिले. या मतदारसंघातील प्रत्येक घरापर्यंत मंडलिक यांचे कार्य पोहोचवण्याची जबाबदारी गटप्रमुखांची आहे. त्याप्रमाणे त्यांनी काम करावे, असे आवाहन केले. संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनीही सोशल मीडियावर अनेक अफवांचे पीक येत आहे; पण त्याकडे कार्यकर्त्यांनी लक्ष देऊ नये. युती झाल्याने भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांना प्रचारात सहभागी करून घ्यावे, असे आवाहन केले.  

कोण कोणासोबत ते ठरवा : प्रा.  मंडलिक 

प्रा. संजय मंडलिक म्हणाले, गेल्या वेळी झालेल्या निवडणुकीतील पराभवाने मी खचलो नाही. भाजप-शिवसेना युती झाली आहे; पण भाजपचे काही लोक विरोधी उमेदवारांचा प्रचार करत आहेत, अशांची यादी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे दिली आहे. मुंबईहून परत आल्यानंतर याबाबत निर्णय घेऊ 
व भाजप शिवसेना संयुक्त मेळावा घेवू असे  आश्‍वासन ना पाटील यांनी  दिल्याचे मंडलिक यांनी सांगितले.

गदृारांवर कारवाई करा: नरके

गेल्यावेळी शेतकरी कजमाफीचा परिणाम म्हणून करवीर मतदार संघातून प्रा. मंडलिक यांना कमी मते मिळाल्याचे सांगून आमदार चंद्रदिप नरके म्हणाले, मते कमी मिळाली म्हणून आमच्याकडे  कोणी बोट दाखवण्याची गरज नाही.जे पटत नाही त्याला मी उघड पणे विरोध करतो. गोकुळच्या मल्टीस्टेट ठरावाला मी सर्वांसमोर विरेाध केला होता. मतभेदामुळे स्वत:च्या चुलत भावाला पराभूत केले. पराभव काय असतो ही आम्ही जाणतो. पण केवळ स्वत:च्या स्वार्थासाठी गदृारी करणार्‍या झारीतील शुक्राचार्यांवर कारवाई करावी अशी मागणी केली. 

गदृारांची यादी तयार:संजय पवार

जिल्हाप्रमुख संजय पवार म्हणाले, शिवसेनेत पक्षाशी एकनिष्ठता महत्त्वाची आहे. गेल्या लोकसभा निवडणूकीत कोणी गदृारी केली हे माहीत आहे. स्वत:च्या सोयीसाठी विरोधकांची साटेलोटे करणार्‍यांची  यादी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे दिली आहे. गदृारांवर कारवाई करावीच लागेल.पण आता ही वेळ नाही. आजही पक्षात  गटतट असले तरी पक्षासाठी सर्व एकदिलाने काम करणार असून मंडलिक यांना लोकसभेत पाठवण्यासाठी कार्यकर्ते एकदिलाने काम करणार असल्याचे सांगितले.  

यावेळी आम. प्रकाश अबिटकर, माजी आमदार संजय घाटगे, संज्योती माळवकर यांची भाषणे झाली. या मेळाव्याला मुंबईच्या माजी महापौर श्रध्दा जाधव, अंबरिश घाटगे,जिल्हा प्रमुख विजय देवणे, व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.आमदार राजेश क्षीरसागर मुंबईला कामानिमीत्त गेले असल्याने या मेळाव्याला उपस्थीत राहू शकले नसल्याचे रावते यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

WhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/DmOJLDvGACrHCXh0bqURex