Thu, May 23, 2019 23:16होमपेज › Kolhapur › जिल्हा बँकेच्या बावडा शाखेचे शाखाधिकारी, कॅशियर निलंबित

जिल्हा बँकेच्या बावडा शाखेचे शाखाधिकारी, कॅशियर निलंबित

Published On: Jun 14 2018 1:33AM | Last Updated: Jun 14 2018 1:33AMकोल्हापूर : प्रतिनिधी

जिल्हा बँकेच्या कसबा बावडा शाखेतील बनावट सोनेप्रकरणी गुन्हा दाखल झालेले शाखाधिकारी संभाजी शंकर पाटील (रा. शिये, ता. करवीर) व कॅशियर परशुराम नाईक (रा. कसबा बावडा) यांना आज निलंबित करण्यात आले. बँकेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने यांनी ही कारवाई केली. शाखेत तारण ठेवलेल्या सोन्यावर या दोघांसह बँकेच्या पॅनेलवरील सराफ सन्मुख ढेरे यांनी डल्ला मारल्याचा संशय आहे. 

27 प्रकरणांतील सुमारे 100 ग्रॅम तारण ठेवलेले खरे सोने काढून त्याजागी बनावट सोने ठेवल्याचा प्रकार चौकशीत उघडकीस आला. वंदना मोरे (रा. शिये) यांनी तारण ठेवलेले सोने कर्ज भरून सोडवल्यानंतर त्यांना बनावट सोने दिल्याने त्यांनी ते नाकारले. या शाखेकडे सोने तारणाची सुमारे 200 प्रकरणे आहेत. यापैकी 32 प्रकरणांतील कर्जदार मुदत संपूनही बँकेकडे फिरकले नव्हते. त्यांना नोटिसा काढून शनिवारी चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. या चौकशीत 27 कर्जदारांनी आपले सोने नाकारले, त्यानंतर या सोन्याची बँकेच्या पॅनेलवरील दुसर्‍या सोनारांकडून पडताळणी केली असता, ते बनावट असल्याचे स्पष्ट झाले.

बँकेच्या वतीने तपासणी अधिकारी आर. बी. पाटील यांनी शाहूपुरी पोलिसांत या तिघांविरोधात बँकेची फसवणूक केल्याची फिर्याद दिली. त्यानंतर बुधवारी शाखाधिकारी पाटील व कॅशियर यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली. दोघांची खातेनिहाय चौकशीही करण्यात येणार आहे.

नाईक दहा वर्षे एकाच ठिकाणी

बावडा शाखेत नाईक गेल्या दहा वर्षांपासून याच पदावर आहे. मध्यंतरी सहा महिन्यांसाठी त्याची बदली झाली; पण पुन्हा तो या पदावर रूजू झाला.