Sat, Jul 04, 2020 20:42होमपेज › Kolhapur › साखर कारखाने विक्री-मालकीशी वैयक्तिक संबंध नाही : अजित पवार

साखर कारखाने विक्री-मालकीशी वैयक्तिक संबंध नाही : अजित पवार

Last Updated: Nov 09 2019 1:48AM

संग्रहित फोटोकोल्हापूर : प्रतिनिधी

राज्यातील ज्या सहकारी साखर कारखान्यांची विक्री झालेली आहे, ती केवळ राज्य बँकेने केेली नसून वेगवेगळ्या पातळीवर ही प्रक्रिया झालेली आहे. त्याचप्रमाणे या विक्री व्यवहाराशी किंवा विक्री झालेल्या कारखान्यांच्या मालकीबाबत माझा कोणत्याही प्रकारचा वैयक्तिक संबंध नाही, असा दावा माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना केला आहे.

याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, राज्यातील ज्या सहकारी साखर कारखान्यांची विक्री झाली, ते सगळे कारखाने काही एकट्या राज्य सहकारी बँकेच्या संचालकांच्या निर्णयानुसार विकले गेलेले नाहीत. कर्जाच्या वसुलीसाठी राज्य बँकेने काही कारखान्यांची विक्री करण्याचा निर्णय घेतला होता. त्याचप्रमाणे काही साखर कारखाने विकण्याचा निर्णय तत्कालीन राज्य सरकारने घेतला; तर काही कारखान्यांची विक्री ही न्यायालयाच्या आदेशानुसार झालेली आहे. काही कारखान्यांची विक्री अन्य जिल्हा बँकांच्या निर्णयानुसार झालेली आहे. साखर कारखाने विक्रीची ही सगळी प्रक्रिया नियमानुसार झालेली आहे. रीतसर जाहीर निविदा मागवून, ज्यांच्या निविदा जादा दराच्या होत्या, त्यांना हे कारखाने देण्यात आले. हा सगळा व्यवहार अतिशय पारदर्शकपणे झालेला आहे. त्याचप्रमाणे निविदेतील अटी-शर्तीनुसार योग्य किमतीलाच या साखर कारखान्यांची विक्री झालेली आहे. कोणताही कारखाना कमी किमतीला किंवा राज्य बँकेचे नुकसान होईल, अशा पद्धतीने विकण्यात आलेला नाही.

विक्री करण्यात आलेल्या कारखान्यांच्या मालकीबाबत बोलताना ते म्हणाले, विक्री झालेले हे साखर कारखाने विकत घेणार्‍या अ‍ॅस्टोरिया ज्वेलरी मुंबई, गुरू कमोडिटी मुंबई, इंडिकॉन-अंबालिका शुगर्स औरंगाबाद, दौंड शुगर्स पुणे, बारामती अ‍ॅग्रो बारामती, श्रद्धा एजन्सी पुणे, व्यंकटेश्वरा अ‍ॅग्रो शुगर मुंबई, सुधीर कन्सल्टन्सी जयसिंगपूर,  दत्त शुगर गुजरात या संस्थांशी माझा वैयक्तिक संबंध असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. मात्र, त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही. आजघडीला यापैकी एकही कंपनी किंवा संस्थेचा मी भागीदार, लाभार्थी किंवा अन्य मार्गांनी संबंधित नाही. त्यामुळे या संस्थांशी माझा व्यक्तिगत संबंध जोडणे चुकीचे आहे.

राज्यातील सहकारी साखर कारखान्यांची विक्री आणि राज्य बँकेच्या संचालकांवर होत असलेल्या आरोपांबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, सहकार क्षेत्रात अनेक वर्षांपासून काम करीत असताना आम्ही नेहमीच निकोप पद्धतीने आणि पारदर्शक कारभार केला आहे. मात्र विरोधकांनी काहीही कारण नसताना राज्य सहकारी बँकेत 25 हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा अपप्रचार केला. त्यानंतर नाबार्डने या प्रकरणी केलेल्या चौकशीतून केवळ 1086 कोटी रुपयांच्या व्यवहारांमध्ये गैरव्यवहार नव्हे तर अनियमितता दिसून येते, असे स्पष्ट झाले. त्यानंतर एटीएसने या प्रकरणी केलेल्या चौकशीत ही रक्कम आणखी कमी झाली. सध्या राज्य सहकारी बँकेतील व्यवहारांची वेगवेगळ्या पातळीवर चौकशी सुरू आहे. यातून जे काही असेल ते सत्य बाहेर येऊन ‘दूध का दूध आणि पानी का पानी’ होऊन जाईल, असेही अजित पवार यांनी शेवटी स्पष्ट केले आहे.