Tue, Jul 14, 2020 00:38होमपेज › Kolhapur › शिरोळमध्ये कडकडीत बंद

शिरोळमध्ये कडकडीत बंद

Published On: Nov 13 2018 1:24AM | Last Updated: Nov 12 2018 11:22PMशिरोळ : प्रतिनिधी

थकीत एफआरपीवरील पंधरा टक्के व्याज द्यावे, मागील अंतिम दर जाहीर करून प्रतिटन दोनशे रुपये द्यावेत, एफआरपी न देणार्‍या कारखान्यांवर कारवाई करावी, या मागण्यांसाठी विविध सात संघटनांनी सुरू केलेल्या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर सोमवारी कोणताच तोडगा निघाला नाही. शिरोळमध्ये बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

दरम्यान, दत्त साखर कारखान्यात झालेल्या बैठकीत शिष्टमंडळ आणि पोलिस यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. परंतु, चेअरमन गणपतराव पाटील यांनी संयमाची भूमिका घेत हा प्रश्‍न न्यायालयीन प्रक्रियेत असून, न्यायालयाच्या निर्णयानुसार अंमलबजावणी केली जाईल, असे सांगितले. परंतु, आंदोलकांचे समाधान न झाल्याने आक्रमक पवित्रा घेऊन उसाची वाहने अडविण्यास सुरुवात केली. शिरोळ-नृसिंहवाडी-नांदणी-अर्जुनवाड-घालवाड रोडवर आणि छत्रपती शिवाजी चौक तसेच घालवाड फाटा टेम्पोअड्ड्याजवळ उसाने भरलेले ट्रॅक्टर, बैलगाडी, ट्रक अशी वाहने अडविण्यास सुरुवात केली. आंदोलकांची भूमिका विचारात घेऊन पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली. 

यात पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. दरम्यान, आंदोलनाची आक्रमकता शिथिल करण्यासाठी आणि कायदा-सुव्यवस्थेकरिता पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. दरम्यान, मागील गळीत हंगामातील अंतिम बिल आणि थकीत एफआरपीवरील व्याजाच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांनी सुरू केलेल्या आंदोलनास पाठिंबा म्हणून सोमवारी शिरोळ शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. व्यापार्‍यांनी आपली दुकाने दिवसभर बंद ठेवून आंदोलनात सहभाग घेतला.

पोलिसांनी साखर कारखानदारांची बाजू घेत आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, असा आरोप धनाजी चुडमुंगे, बी. जी. पाटील, रावसाहेब माने, बंटी ऊर्फ यशवंत देसाई यांनी आंदोलनादरम्यान केला. शिरोळमध्ये ऊस आंदोलनाची वाढत चालली तीव्रता तरुणांचा वाढता सहभाग, चौका-चौकांत आणि रोडवर सुरू झालेले आंदोलन, यामुळे संपूर्ण शिरोळ शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सकाळी आंदोलन अंकुश, जय शिवराय किसान, बळीराजा, रयत क्रांती, संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेच्या तरुण शेतकर्‍यांनी शिवाजी चौकातून श्री दत्त साखर कारखान्यापर्यंत रॅली काढली. चेअरमन पाटील आणि कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील यांच्याबरोबर कारखाना मुख्य प्रवेशद्वारावर चर्चा केली. यावेळी आंदोलक, चेअरमन, कारखाना समर्थक यांच्यात शाब्दिक वादावादी झाली. त्यानंतर अप्पर पोलिस अधीक्षक श्रीनिवास घाडगे यांनी मध्यस्थी करून बैठक घडवून चर्चा केली. परंतु, चर्चेतील निर्णय आंदोलकांना न पटल्याने आम्ही आंदोलन असेच सुरू ठेवणार, असे सांगून आंदोलक उठून गेले.

आंदोलकांनी आपला पवित्रा जाहीर करून आंदोलनाची तीव्रता वाढविली. उसाने भरलेली वाहने अडवून चाकांतील हवा सोडून वाहने जागीच ठप्प करून ठेवली. तर एका ट्रॅक्टरचा टायर पेटविण्यात आला. ताबडतोब आग विझविल्याने पुढील अनर्थ टळला. त्यानंतर शिरोळ औरवाड फाट्यावर एका ट्रकवर कार्यकर्त्यांनी दगडफेक करून काच फोडली. ऊस दराच्या घोषणा देत कार्यकर्त्यांनी कारखाना आणि पोलिस प्रशासनाचा निषेध नोंदविला. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घ्यायला सुरुवात केली. कार्यकर्त्यांचा विरोध होताच पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला, त्यामुळे आंदोलकांची पळापळ सुरू झाली. सर्वत्र एकच गोंधळ उडला आणि शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी ऊस दराचे आंदोलन करणार्‍या दहा तरुण शेतकर्‍यांना ताब्यात घेतले आहे. तर एकूण एकतीस शेतकर्‍यांवर गुन्हा दाखल करून कारवाई केली आहे..

जागोजागी वाहने अडविली

शिरोळमध्ये ऊस दरासाठी सात संघटनांनी आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनातील कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेऊन उसाने भरलेल्या वाहनांवर आक्रमण सुरू ठेवल्याने सर्व वाहनधारकांनी शिरोळला जोडणार्‍या विविध मार्गांवर आपली वाहने थांबविली होती. अर्जुनवाड, घालवाड, धरणगुत्ती, नृसिंहवाडी या मार्गावर जवळपास सत्तरहून अधिक ट्रक, ट्रॅक्टर, बैलगाड्या सायंकाळपर्यंत थांबून होत्या.