Fri, Sep 20, 2019 21:28होमपेज › Kolhapur › खासदार शेट्टी विसरले रक्‍तरंजित इतिहास 

खासदार शेट्टी विसरले रक्‍तरंजित इतिहास 

Published On: Sep 10 2018 1:16AM | Last Updated: Sep 10 2018 12:30AMपेठ वडगाव : वार्ताहर

शेतमालाला हमीभाव मिळावा, यासाठी ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांच्या रक्‍ताचे पाट वाहिले. हा रक्‍तरंजित इतिहास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी विसरले आहेत, असा घणाघात नाराज गटातील बंडखोर नेते शिवाजी माने यांनी केला. लोकसभा निवडणुकीत शेट्टी यांचा पराभव करण्याचे आवाहन त्यांनी केले. पेठ वडगाव येथे झालेल्या हातकणंगले लोकसभा मतदार संघातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. शेट्टी यांनी दिलेल्या जिल्हा नियोजन समिती सदस्य व तालुका अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचे माने यांनी जाहीर केले.

माने म्हणाले, संघटना उदयास आणताना दोघांनी बलिदान दिले.  जातीच्या बगलबच्च्यांना घेऊन सत्तेचा मलिदा खाण्याचे शेट्टी यांचे काम सुरू आहे. बहुजनांना पोस्टर चिकटवण्याचे व टायरी फोडण्याचे काम देण्याची कुटिल नीती जोपासली जात आहे. ही चळवळ आता समांतर अंतरावर चालविणार आहे. 

गोंडा पॅटर्न बंद करा

शेट्टी यांनी बहुजन समाजातील लोकांना किचन कॅबिनेटमधून हद्दपार केले आहे. गोंडा पॅटर्न वापरून कार्यभाग साधला जात आहे. हा त्वरित बंद करावा. खा. शेट्टी यांनी पक्‍की मडकी बाहेर टाकली आहेत आणि कच्ची मडकी जवळ ठेवली आहेत. पक्के मडके घटस्थापनेवर बसणार आहे. 

शिगावचे निवास पाटील यांनी, खा. शेट्टी यांच्या जवळच्या गोंडा संस्कृतीला आमचा विरोध आहे, असे  सांगितले. राजाराम कारखान्याचे माजी संचालक बाबासाहेब पाटील (भुयेकर) यांनी चळवळीच्या नावाखाली पोळी भाजण्याचे काम काही मंडळी करीत आहेत. हे खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा दिला. शिरोळचे दिलीप माणगावे यांनी खा. शेट्टी यांनी बहुजनाचे नेतृत्व पुढे येऊ नये, यासाठी आवाडे यांना साथ दिल्याचा गौप्यस्फोट केला.

भाजपचे तालुकाध्यक्ष व पूर्वाश्रमीचे स्वाभिमानी संघटनेचे कार्यकर्ते पी. डी. पाटील म्हणाले, कारखानदारांच्या मांडीला मांडी लावून बसणारे शेट्टी यांना कायमची सुट्टी देण्यासाठी सज्ज रहा.

पाठीत खंजीर खुपसला

शेट्टी यांना राजकारणाचे बाळकडू पाजल्याचे मेजर प्रकाश पाटील यांनी सांगून, कार्यकर्त्यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम त्यांनी केल्याचा आरोप केला. संग्रामसिंह गायकवाड यांनी शिवाजी माने यांना बंडाचा फेटा भेट दिला, तर सरूडच्या शामराव व भीमराव पाटील यांनी शेट्टी यांच्या पराभवाची शपथ घेतली. यावेळी स्थापन केलेल्या समितीची घोषणा करण्यात आली. धनाजी पाटील यांनी स्वागत केले.