Wed, Jun 03, 2020 18:06होमपेज › Kolhapur › दूध संघ, आमदारकी, खासदारकी अडविणार्‍या महाडिकांना घरी बसवा

दूध संघ, आमदारकी, खासदारकी अडविणार्‍या महाडिकांना घरी बसवा

Published On: Apr 21 2019 1:40AM | Last Updated: Apr 21 2019 1:19AM
गडहिंग्लज : प्रतिनिधी

स्वत:च्या घरात दूध संघ, खासदारकी, आमदारकी ठेवून विकासाचा चक्‍काजाम करणार्‍या महाडिक यांना घरी बसवून देशात मजबूत सरकार देण्यासाठी प्रा. संजय मंडलिक यांना विजयी करा, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. गडहिंग्लज येथील शिवराज महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. केवळ ‘आमचं ठरलंय’ असे म्हणून गप्प न बसता ते करून दाखवा, असेही ठाकरे यांनी सांगितले.

ठाकरे म्हणाले, लोकसभा निवडणूक ही देशाची निवडणूक आहे. या ठिकाणी ठाम निर्णय घेणार्‍या सरकारची गरज आहे. कोल्हापूर, गडहिंग्लज ही राजर्षी शाहू महाराजांची नगरी आहे.  अन्यायाविरोधात येथील जनता पेटून उठणारी आहे. अनेक शूरवीरांचा इतिहास या नगरीला आहे. माजी दिवंगत खासदार यांनी स्वाभिमानाची लढाई याच भूमीत लढून ती जिंकलीसुद्धा. आता याच स्वाभिमानाची संसदेवर भगवा फडकावण्यासाठी पुन्हा गरज आहे. यासाठी संजय मंडलिक हा एकमेव पर्याय आहे. 

ठाकरे म्हणाले, अयोध्येत राम मंदिर उभारण्यासाठी, नाणार प्रकल्प हटवण्यासाठी, शेती पिकाला हमीभाव मिळण्यासाठी आमचा सरकारविरोधात लढा होता. त्यात आम्ही यशस्वी झालो. म्हणून मी पुन्हा युती केली. यात गैर काय? पण राष्ट्रवादी नेत्यांच्या पोटात युती केल्यामुळे पोटशूळ उठत आहे. भाजप-शिवसेनेला तेव्हा ते जातीयवादी म्हणत होते; पण विधानसभा निवडणुकीत  राष्ट्रवादीचा पोपट प्रफुल्‍ल पटेल यांनी सत्ता मिळवण्यासाठी भाजपला पाठिंबा देण्याचे जाहीर केले होते तेव्हा तुम्हाला जातीयवाद दिसला नाही का, असा सवाल ठाकरे यांनी केला. 

कोल्हापुरात गेल्या काही दिवसांपासून ‘आमचं ठरलंय’ हा शब्द चांगलाच गाजत असल्याचा संदर्भ देऊन ठाकरे म्हणाले, जसं तुमचं ठरलंय तसं आमचं पण ठरलंय. देशात राष्ट्रहित जपणारे सरकार आणायचे, एक देश, एक कायदा व एक पंतप्रधान असणारे सरकार आणायचे, 370 कलम रद्द करायचेे आणि ज्यांनी 70 वर्षे हा देश लुटला त्यांना हद्दपार करण्याचे आमचे ठरले आहे. यासाठी देशात मजबूत व स्थिर सरकार आणायचे आमचे ठरले आहे. तुम्हीही केवळ धनुष्यबाण ध्यानात ठेवून कोल्हापुरात भगवा फडकावण्याचे स्वप्न पूर्ण करा.

देशद्रोही कलमाबाबत पवार गप्प का?

काँग्रेस व राष्ट्रवादीवाल्यांना देशाचे काही भले व्हावे असे वाटत नाही. त्यांना स्वत:ची पोळी भाजून घ्यायची आहे. देश प्रेमाचा पुळका आणणारे शरद पवार काँग्रेसच्या जाहीरनाम्याबाबत राहुल गांधी यांना का विचारत नाहीत, असा सवाल ठाकरे यांनी केला.

‘गोकुळ’साठी कुटुंब दावणीला ः पालकमंत्री

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महाडिकांवर सडकून टीका करताना, गेल्या महिनाभरापासून आपण दहा लोकसभा मतदारसंघांचे काम करत असून, यात बारामती मतदारसंघ आहे. या ठिकाणी राष्ट्रवादीला धूळ चारण्यासाठी महिनाभर तेथे मी तळ ठोकून आहे. असे असताना कोल्हापूरपासून काही दिवस बाहेर राहिलो. तर महाडिकांनी माझ्याबद्दलच गैरसमज पसरविण्यास सुरू केले. मी शेवटच्या तीन दिवसांत कार्यकर्त्यांच्या कानात काहीतरी सांगणार, असे सांगून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. कानात तर मी माझ्या बायकोशीही बोलत नाही, काय असेल ते उघड बोलणारा माणूस असून, ‘आयबी’च्या रिपोर्टनुसार मंडिलक हे 90 हजारांच्या मताधिक्याने निवडून येणार आहेत. मात्र, आता शेवटच्या तीन दिवसांत मीच कोल्हापुरात तळ ठोकून राहणार असून, 1 लाख 90 हजारांचे मताधिक्य घेऊन मंडलिकांना विजयी करून दाखवितो.

प्रा. संजय मंडलिक म्हणाले, जसे काही भाग भूकंपग्रस्त, पूरग्रस्त असतात, तसा कोल्हापूर जिल्हा हा महाडिकग्रस्त झाला असून, तो मुक्‍त करण्यासाठी आपण लोकसभेच्या रिंगणात आहे. अंबाबाईचा रथोत्सव हा राक्षसाचा वध केल्यामुळे साजरा केला जातो. तसा महाडिकरूपी राक्षसाचा वध करण्यासाठी तुम्हा सर्वांच्या साथीने मी तयार झालो आहे. मतदारसंघात सर्व ठिकाणी शिवसेनेचे वादळ धडकले आहे. 

‘म्हाडा’चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे म्हणाले, जातीयवादी पक्ष म्हणून युतीवर टीका केली जाते; मात्र या पक्षानेच मराठ्यांना आरक्षण मिळवून दिले. आघाडीचे लोक मात्र जातीयवादावर बोलून स्वतः कसे जातीयवादी आहोत, हे दाखवून देत आहेत. 

रिपाइंचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कारभारावर सडकून टीका केली.  आ. प्रकाश आबीटकर यांनी संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेचे वादळ घोंगावत असून, उपस्थित गर्दी संजय मंडलिक खासदार होणार असल्याचा दाखला देत असल्याचे सांगितले. 

भाजपच्या गोपाळराव पाटील यांनी दौलत कारखाना सुरू केला आहे. त्यामुळे आता चंदगडची जनता ही मंडलिकांच्या सोबत नक्‍की राहील, असा विश्‍वास व्यक्‍त केला. 

भाजप तालुकाध्यक्ष अ‍ॅड. हेमंत कोलेकर यांनी, भाजप-शिवसेना सरकारने केलेल्या विकासकामांचा आढावा लोकांसमोर मांडला. यावेळी शिवसेनेच्या उपनेत्या आ. नीलम गोर्‍हे, परिवहनमंत्री दिवाकर रावते, कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हाप्रमुख विजय देवणे, संजय पवार, अंबरिश घाटगे, डॉ. प्रकाश शहापूरकर, बाबा देसाई, माजी आमदार सुरेश साळोखे, वीरेंद्र मंडलिक आदींसह भाजप-सेनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.