Sun, Jul 05, 2020 11:41होमपेज › Kolhapur › रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळा मोजक्या लोकांच्या उपस्थितीत : संभाजीराजे (video)

रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळा मोजक्या लोकांच्या उपस्थितीत : संभाजीराजे (video)

Last Updated: May 31 2020 9:45PM
कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा 

अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीने रायगडवर प्रतिवर्षी 6 जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदा कोरोनामुळे हा सोहळा प्रतीकात्मक, अत्यंत साध्या पद्धतीने आणि प्रशासनाच्या सर्व नियमांचे पालन करून मोजक्या लोकांसोबत साजरा करण्यात येणार आहे. यामुळे शिवभक्‍त-इतिहासप्रेमींनी रायगडावर न जाता आपापल्या घरातच राहून शिवछत्रपतींना अभिवादन करावे, असे आवाहन समितीचे मार्गदर्शक खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकार परिषदेत केले.   

समितीच्या वतीने दरवर्षी 6 जून रोजी रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होतो. यावेळी देशभरातून हजारो शिवभक्‍त-इतिहासप्रेमी उत्स्फूर्तपणे उपस्थित असतात. आज शिवराज्याभिषेक सोहळा राष्ट्रीय सण आणि लोकोत्सव म्हणून साजरा होऊ लागला आहे. प्रतिवर्षीप्रमाणे यंदाच्या सोहळ्याचीही जय्यत तयारी सुरू होती; पण जगभर पसरलेल्या कोरोना महामारीच्या संकटामुळे प्रतिवर्षीप्राणे सोहळ्याला गर्दी करणे सामाजिक हिताच्या द‍ृष्टीने चुकीचे आहे. किंबहुना, ‘प्रजाहित दक्ष’ राजाच्या सोहळ्याला हे शोभणारे नाही.   

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर इतिहास संशोधक, शिवप्रेमी-गडकोट-दुर्ग संघटना, पोलिस व प्रशासन आणि  मुख्यमंत्री अशा प्रत्येक घटकांशी चर्चा करून यंदाचा सोहळा अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे खा. संभाजीराजे यांनी सांगितले. आपण स्वत: हजारो  शिवभक्‍तांचे प्रतिनिधित्व करणार असून, प्रतिवर्षीप्रमाणे सोहळ्यातील सर्व उपक्रम साजरे होतील. शिवछत्रपतींच्या विचारांचे आपण  मावळे आहोत. यामुळे कोरोनाच्या लढाईत दिवस-रात्र सक्रिय असणार्‍या आणि थकलेल्या प्रशासनावर अतिरिक्‍त ताण कोणीही शिवभक्‍ताने आणू नये. रायगडावर गर्दी करून प्रशासनाबरोबरच स्थानिकांना नाहक त्रास होऊ नये याची दक्षता घेण्याचे आवाहन खा. संभाजीराजे यांनी केले.  

आपल्या गडावर (घरात) अभिवादन करा

यंदा शिवराज्याभिषेकासाठी कोणीही रायगडवर येऊ नये. तुमच्या स्वत:च्या गडावर म्हणजेच ‘घरात’ राहून शिवछत्रपतींना अभिवादन करा. स्वराज्याचे प्रतीक भगवा ध्वज  घरासमोर लावा. शिवछत्रपतींच्या प्रतिमेचे पूजन करा. स्वदेशी जातीच्या (स्थानिक) वृक्षाचे रोप लावून त्याचे संगोपन करा. रक्‍तदान शिबिरासारखे उपक्रम आयोजित करा. इतिहासाचा जागर करणार्‍या पुस्तकांचे वाचन करा, असे आवाहन खा. संभाजीराजे यांनी केले.