Fri, Sep 20, 2019 22:00होमपेज › Kolhapur › शिष्यवृत्तीची अट शिथिल; मात्र रोजगाराकडे दुर्लक्ष 

शिष्यवृत्तीची अट शिथिल; मात्र रोजगाराकडे दुर्लक्ष 

Published On: Aug 21 2018 1:36AM | Last Updated: Aug 21 2018 1:31AMगडहिंग्लज ः प्रवीण आजगेकर  

राज्य सरकारने विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक असणारी शिष्यवृत्ती देता यावी, यासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना राज्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये लागू केली आहे. यामध्ये व्यावसायिक, वैद्यकीय, बिगर व्यावसायिक महाविद्यालयांमध्ये ही योजना योग्य पद्धतीने व सहजतेने राबविता यावी, यासाठी पूर्वीच्या असलेल्या अटी शिथिल करीत नवे धोरण राबविले आहे. 

शिष्यवृत्ती योजनेच्या अटींमध्ये बदल केला गेल्याने शैक्षणिक संस्थांना ही योजना राबविणे सोपे होणार असले, तरी प्रत्यक्षात मात्र या नव्या बदलामुळे विद्यार्थ्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी संस्थांवर असणारी जबाबदारी शिथिल होणार असल्याने नव्या धोरणानुसार शिष्यवृत्ती मिळणार; मात्र विद्यार्थ्यांच्या रोजगारांकडे संस्थांचा कानाडोळा होणार आहे. साहजिकच, याचा थेट परिणामही आगामी काळात होण्याची शक्यता आहे.

शिष्यवृत्ती योजनेच्या नव्या धोरणानुसार दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना एकूण शैक्षणिक शुल्काच्या 50 टक्के शुल्क आकारण्यात येते. यामध्ये व्यावसायिक, बिगर व्यावसायिक कॉलेजच्या जवळपास 608 अभ्यासक्रमांचा समावेश आहे. सरकारच्या नव्या निर्णयानुसार तीन अटींमध्ये शिथिलता आली असून, यानुसार यापूर्वी व्यावसायिक व बिगर व्यावसायिक महाविद्यालयांना आवश्यकतेप्रमाणे सुरू असलेले शैक्षणिक वर्ष संपेपर्यंत नॅक व एनबीए मानांकन प्राप्‍त करणे गरजेचे होते. यामधील अटीनुसार मानांकन असणार्‍या महाविद्यालयांनाच या योजनेचा लाभ मिळणार होता.

व्यावसायिक पदवी, पदव्युत्तर पदवी व पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेशित विद्यार्थ्यांपैकी किमान 50 टक्के विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी यापूर्वी संबंधित महाविद्यालयांवर होती. आता मात्र नव्या अटीनुसार प्रवेशित विद्यार्थ्यांपैकी लाभ घेतलेल्या किमान 50 टक्के विद्यार्थ्यांना नोकरीची संधी मिळवून देण्यासाठी या संस्थांनी प्रयत्नशील राहावे. कॅम्पस प्लेसमेंटची व्यवस्था करणे आवश्यक राहील इतका उल्‍लेख केला गेला आहे. यामुळे नव्या धोरणानुसार शिष्यवृत्ती मिळवणे सोपे झाले असले, तरी विद्यार्थ्यांना मात्र रोजगारांपासून लांबच राहावे लागणार आहे.

यापूर्वी शिष्यवृत्तीच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना शैक्षणिक लाभ मिळाला असून, शिष्यवृत्तीबरोबरच संस्थांच्या नोकरीच्या धोरणामुळे प्लेसमेंटकरिता सर्वच महाविद्यालयांकडून योग्य प्रकारचे नियोजन केले जात होते. साहजिकच, याचा थेट परिणाम म्हणून अनेकदा विद्यार्थ्यांना शेवटच्या वर्षापूर्वीच नोकरीची संधी मिळत होती. पूर्वीची शिष्यवृत्तीची प्रक्रिया किचकट असल्याने अनेकदा विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहत होते. आता मात्र या प्रक्रियेत धोरणात्मक बदल केला गेला असून, शिष्यवृत्ती प्रक्रिया सोपी झाली असली, तरी अटी शिथिल केल्याने संस्थांवरील रोजगाराची जबाबदारी कमी झाली आहे. यामुळे या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना एकीकडे फायदा, तर एकीकडे तोटा होणार आहे.