Mon, Sep 16, 2019 06:05होमपेज › Kolhapur › सोशल मीडियावर अफवांचा पाऊस

सोशल मीडियावर अफवांचा पाऊस

Published On: Apr 23 2019 1:34AM | Last Updated: Apr 23 2019 12:27AM
कोल्हापूर : प्रतिनिधी

‘माझा या उमेदवाराला जाहीर पाठिंबा. कार्यकर्त्यांनो, अमुक उमेदवाराला मतदान करा. आता आपण निर्णय बदलला असून, विरोधी उमेदवाराच्या बाजूने मतदान करा’, असे एकापेक्षा एक बनावट मेसेज सोमवारी दिवसभर सोशल मीडियावरून व्हायरल केले जात होते. अफवा आणि अफवांचे खंडन अशा दोन्ही मेसेजचा पाऊस सोशल मीडियावर पडला.कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघ निवडणुकीत काटाजोड लढत आहे. 

या लढती हायहोल्टेज आहेत. त्यामुळे उमेदवारांची प्रचार यंत्रणा आणि समर्थकांमध्ये टोकाची ईर्षा दिसू लागली आहे. मंगळवारी (दि. 23) लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. उमेदवारांना तसेच त्यांच्या समर्थकांना जाहीर प्रचारावर निर्बंध आहेत. परंतु सोमवारी दिवसभर अफवाच अफवा सोशल मीडियावरून पसरवल्या जात होत्या. परस्परविरोधी गटांकडून हे अफवांचे शस्त्र मतदानासाठी अवघे काही तास उरले असताना मोठ्या प्रमाणावर वापरले जात होते. अनेक दिग्गज नेत्यांच्या फोटोची छेडछाड करून अफवांसाठी वापर केला जात असल्याचे दिसत होते. एका आमदाराच्या लेटरहेडवरून पाठिंब्याचा मजकूर प्रसिद्ध करण्यात आला होता. हे लेटरहेड आणि मजकूर बोगस असल्याचे संबंधित आमदारांच्या यंत्रणेने तत्काळ सोशल मीडियावरून व्हायरल केले. 

करवीर, कागल, कोल्हापूर दक्षिण व कोल्हापूर उत्तर, इचलकरंजी, शिरोळ या परिसरातील नेते आणि कार्यकर्त्यांच्या संदर्भात अफवांची संख्या जास्त दिसत होती. एकूणच अफवांमुळे दिवसभर वातावरण तणावपूर्ण दिसत होते. सोशल मीडियावरून या अफवांमुळे कार्यकर्तेे एकमेकांना भिडले असल्याचे दिसत होते. 

अफवांवर नियंत्रण नाही

सोशल मीडियावरील मजकूर या निवडणुकीत पहिल्यांदाच आचारसंहितेच्या कक्षेत आणण्यात आला आहे. असे असूनही आज दिवसभर सुरू असलेल्या अफवांवर मात्र कसलेही नियंत्रण नसल्याचे दिसून आले.