Fri, Jan 24, 2020 04:53
    ब्रेकिंग    होमपेज › Kolhapur › साथीच्या आजारांचा धोका

साथीच्या आजारांचा धोका

Published On: Aug 17 2019 10:44PM | Last Updated: Aug 17 2019 10:44PM
कोल्हापूर : एकनाथ नाईक    

चिखलाने माखलेली घरे... दुर्गंधीने कोंडणारा श्‍वास... पिण्याच्या पाण्याची टंचाई.... गल्‍ली-बोळात झालेली दलदल... स्वच्छतेसाठी महापलिकेचे अपुरे कर्मचारी...पूरग्रस्त मदतीच्या प्रतीक्षेत .... अशीच काहीशी परिस्थिती भोसलेवाडी, कदमवाडी, भोसले पार्क परिसरातील  आहे. दुर्गंधीमुळे साथीचे आजार पसरतात की काय, अशा गडद छायेखालीच येथील कुटुंबीय जीवन जगत आहेत. सुटाबुटातील एखादी व्यक्‍ती जर पूरपरिस्थितीची माहिती  नागरिकांना विचारू लागली तर हुंदका आवरतच आठवड्याभरातील संकटाची मालिकाच सांगून म्हणतात, सांगा आम्ही कसं जगायचं...!

गेल्या दोन दिवसांपासून घरांची स्वच्छता सुरू आहे; पण दुर्गंधी जात नसल्याने नागरिकांचा श्‍वासच कोंडू लागला आहे. महापुराचा विळखा सैल झाला असून, पुराच्या विळख्यात सापडलेल्या घरांची स्वच्छता करण्यात सर्वजण मग्‍न आहेत. भोसलेवाडी, कदमवाडी, भोसले पार्क परिसरातील गल्‍ली-बोळात चिखलाने दलदल झाली असून घरांची स्वच्छता करण्यासाठी पाणी टंचाई आहे. तर पिण्याचे पाणी विकत घेऊन नागरिकांना प्यावे लागते. दुर्गंधीमुळे नागरिकांचा अक्षरशः हैराण झाले आहेत. अनेक नागरिकांच्या घरात दुर्गंधीयुक्‍त काळे पाणी आहे. स्वच्छतेसाठी महापालिकेचे अपुरे कर्मचारी असल्याने राजर्षी शाहू महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी शुक्रवारी परिसरात श्रमदान करून पूरग्रस्त नागरिकांना मदतीचा हात दिला. कचरा उठावात दिरंगाई झाल्याने ओंकार तरुण मंडळ येथे भला मोठा दुर्गंधीयुक्‍त कचर्‍याचा ढीग साचून आहे. छोट्या किराणा व्यापारांचे प्रचंड नुकसान झाल्याने दुकान मालक हताश होऊन बसलेले दिसत होते. स्वच्छता केलेल्या जागेवर औषध फवारणी आणि पावडर टाकली आहे. 

तरुण मंडळांचे कार्यकर्ते एकमेकांना मदतीचा हात देऊन घरे स्वच्छ करून पुरात भिजलेला संसार सावरत आहेत. महापुरामुळे स्थलांतरित झालेली अनेक कुटुंबीये दुर्गंधीमुळे घराकडे आलेलीच नाहीत. अनेक दुचाकी आणि चार चाकी वाहने पाण्यात बुडून नुकसान झाले आहे.

महापुरामुळे घरे चिखलाने माखली आहेत. नागरिकांनी स्वच्छता सुरू केली आहे. मात्र, पाणीटंचाई असल्याने स्वच्छतेला अडथळा निर्माण होत आहे. पिण्याचे पाणी देखील विकत घेऊनच प्यावे लागते.  - सनी भापळे

 कधी नव्हे तो इतका मोठा महापूर आला. यामध्ये संसार उपयोगी साहित्य वाहून गेले, शिल्‍लक साहित्य कुजले आहे. पिण्याच्या पाण्याचा थेंब नाही. मदतीपासून येथील पूरग्रस्त वंचित आहेत. 
- विमल गालफाडे

महापूर ओसरला असून पाण्यात संसार भिजला आहे. अद्याप कोणतीच मदत मिळालेली नाही. दुर्गंधीयुक्‍त वासामुळे जगणे हैराण झाले आहे. यावर महापलिकेने उपाय शोधणे महत्त्वाचे आहे. 
-सुनेदा भालेराव

 महापूर ही नैसर्गिक आपत्ती आहे, ज्या प्रमाणात  लोकप्रतिनिधींचे सहकार्य आणि मदतीचा हात येथील नागरिकांना मिळाला हवा होता. तो मिळालाच नाही. दुर्गंधीयुक्‍त कचर्‍यामुळे मानवी आरोग्य धोक्यात येऊ शकते. त्यामुळे स्वच्छता आणि औषध फवारणी यावर मनपाने लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे. 
-शिरिष जाधव

 महाराष्ट्रासह अन्य राज्यांतून कोल्हापूरसाठी मदतीचा ओघ सुरू आहे. अनेक कुटुंबीयांचा संसार महापुरामुळे उद्ध्वस्त झाला आहे. येणारी मदत गरजूंपर्यंत पोहोचणे महत्त्वाचे आहे. अनेकजण मदतीची गरज नसतानाही ती घेतात. तरुण मंडळे, सामाजिक संघटना, ट्रस्ट, फौंडेशनच्या कार्यकर्त्यांनी मदत वितरीत करताना अधिक दक्ष राहावे. 
-सुनील पाटील