Mon, Sep 16, 2019 06:01होमपेज › Kolhapur › ‘शिव-शाहूं’चा लोककल्याणकारी वारसा

‘शिव-शाहूं’चा लोककल्याणकारी वारसा

Published On: May 06 2019 1:49AM | Last Updated: May 06 2019 1:23AM
कोल्हापूर : सागर यादव 

रयतेचे स्वतंत्र सार्वभौम स्वराज्य निर्माण करण्याचे कार्य शिवछत्रपतींनी केले. त्यांच्या कार्याचा वारसा जपत सामाजिक एकोप्याची व्यापक भावना विकसित करण्याचे कार्य शिवछत्रपतींचे वंशज राजर्षी शाहू महाराज यांनी केले. दोन्ही राजांनी रयतेला केंद्रस्थानी ठेवून आपली लोककल्याणकारी राजवट राबविली. आज (दि. 6) पारंपरिक तिथीप्रमाणे शिवछत्रपतींची जयंती आणि लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांची पुण्यतिथी, असा योग आला आहे. यानिमित्त ‘शिव-शाहू’ विचारांच्या वारशावर टाकलेला हा प्रकाशझोत...

शिवछत्रपतींचा भक्‍कम पाया...

देवगिरीच्या यादव राजांच्या पाडावानंतर महाराष्ट्रासह अवघा भारत मुघल सत्तेच्या गुलामगिरीखाली गेला. तब्बल 400 वर्षे येथील जनता अन्याय-अत्याचारात भरडली. अंधारात चाचपडणार्‍या येथील जनतेला स्वातंत्र्याचा सूर्य दाखविण्याचेे आणि इतिहासाला कलाटणी देणारे अद्वितीय कार्य 17 व्या शतकात शिवछत्रपतींनी केले. केवळ स्वराज्य निर्माण करून ते थांबले नाहीत, तर त्याच्या सर्वांगीण विकासासाठीचे दूरदृष्टीचे कार्य केले. समाजातील पारंपरिक अनिष्ठ रूढी-प्रथांना बगल दिली. जाती-धर्मातील मक्‍तेदारी मोडून काढली. सती जाणे यासारख्या प्रथा बंद केल्या. जाती-धर्म भेदभावाच्या दृष्ट चक्रातून लोकांना मुक्‍त केले.

महाराष्ट्रातील लोकांचा मुख्य व्यवसाय असणार्‍या शेतीच्या विकासासासाठी विविध कल्याणकारी योजना राबविल्या. शेतीसाठी आवश्यक पाणी साठ्यासाठी विशेष प्रयत्न केले. शेतकर्‍यांना शेतीसाठीच्या साधन-सामग्री उपलब्ध करून दिल्या. शेतसारा व तत्सम करात सूट दिली. जमीन मोजण्याच्या सोप्या पद्धती विकसित केल्या. सावकारी पाशातून लोकांची मुक्‍तता केली. शेती व पूरक व्यवसायांना बाजारपेठा उपलब्ध करून दिल्या. वस्तूंचे दर ठरविण्यात आले. चलन विकसित केले. व्यापाराकरिता डोंगर-दर्‍यात घाट रस्ता बांधणी, आरमार निर्मिती केली. यामुळे शिवछत्रपतींचा काळ म्हणजे केवळ लढाया आणि राजकारणापुरता मर्यादित नव्हता, तर या काळात रयतेच्या कल्याणासाठी आवश्यक विविध योजनांचा पाया घालण्यात आला. 

राजर्षी शाहूंकडून विकासाचा कळस...

शिव छत्रपतींच्या रयतेच्या स्वराज्याचे रक्षण पुढे छत्रपती शंभूराजे, राजाराम महाराज, रणरागिणी ताराराणी यांनी केले. पुढे इंग्रजांच्या काळातही छत्रपतींच्या वंशजांनी पूर्वजांचा वारसा अखंड सुरू राखला. शिवभक्‍त असणार्‍या लोकराजा राजर्षी शाहूंनी शिवकार्याचा विशेष वारसा जपला किंबहूना तो कित्येक पटीने विकसित केला. दूरद‍ृष्टीने विचार करून काळाची गरज असणार्‍या योजनांना प्राथमिकता दिली. दुष्काळावर मात करण्यासाठी धरणे, तलावांसह विविध पाणस्थळांची निर्मिती केली. 

शेतीसह व्यापार उदीम वाढविण्यासाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिला. पारंपरिक शेतीला बगल देत आधुनिक साधनसामग्रींचा विकास केला. शेती उत्पादनांना योग्य दर देण्यासाठी कृषी उत्पन्‍न बाजार समितीसारख्या योजना राबविल्या. याकरिता स्वतंत्र मार्केटयार्ड उभारले. व्यापाराचा विस्तार करण्यासाठी बाहेरील बाजारपेठांपर्यंत माल पोहोचविण्याची व्यवस्था म्हणून रेल्वे सुरू केली. वैशिष्ट्यपूर्ण गूळ निर्मितीला प्रोत्साहन दिले. उद्योग वाढीसाठी विशेष प्रयत्न केले. 

शेती बरोबरच काळाची गरज असणार्‍या शिक्षणाने जनतेला परिपूर्ण केले. यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद केली. विविध जाती-धर्मियांसाठी विद्यार्थी वसतिगृहे बांधली. भावी पिढी सद‍ृढ-सक्षम आणि निर्व्यसनी राहावी यासाठी पेठापेठांत तालीम, संस्था उभ्या केल्या. यात शिवकालीन युद्धकला, मल्लखांब, कुस्ती यासारखे खेळ विकसित केले. राजर्षी शाहूंनी आपल्या सर्वांगीण कार्यातून शिव छत्रपतींनी निर्माण केलेल्या भक्‍कम पायावर विकासाचे कळस चढविले, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

कोल्हापूरकरांनी जपलाय ‘शिव-शाहू’ विचार

लोककल्याणकारी राजवटीचा ‘शिव-शाहू’ विचारांचा वारसा जपण्याचे कार्य कोल्हापूरकर कर्तव्य भावनेतून करीत आहेत. शिव छत्रपतींच्या स्फूर्तिदायी इतिहासाचे जतन व्हावे, या उद्देशाने शिवभक्‍त राजर्षी शाहूंनी आपल्या कारकिर्दीत शिवरायांविषयी विविध योजना राबविल्या. पुढे शाहूनगरीतील सूज्ञ जनतेने शिव छत्रपतींसोबतच लोकराजा राजर्षी शाहूंचा विचार जपला आहे. यामुळे कोल्हापुरात ‘शिव-शाहू’ नावाने अनेक संस्था-संघटना सक्रिय आहेत. अनेक पुरस्कारही या नावानेच दिले जातात.