Sat, Sep 21, 2019 07:18होमपेज › Kolhapur › सार्‍यांचेच हात बरबटलेत प्रदूषणाच्या ‘चिखला’ने!

सार्‍यांचेच हात बरबटलेत प्रदूषणाच्या ‘चिखला’ने!

Published On: Jun 07 2018 2:05AM | Last Updated: Jun 06 2018 11:34PMकोल्हापूर : सुनील कदम

पंचगंगेच्या प्रदूषणासाठी कुणा एकाला जबाबदार धरता येणार नाही, तर पंचगंगा खोर्‍यातील आणि प्रामुख्याने नदीकाठावर राहणारे सगळेच घटक त्याला जबाबदार आहेत. फरक इतकाच की, पंचगंगेच्या प्रदूषणात कोणी ‘प्रचंड मोलाची’ भर टाकतोय, तर कोण आपापला ‘खारीचा वाटा’ उचलतोय. या प्रदूषणाला मोठ्या प्रमाणात जबाबदार ठरणार्‍या कारखानदारांना कायद्याचा बडगा दाखवून वठणीवर आणता येईल; पण या प्रदूषणात आपापला हातभार लावणार्‍या नागरिकांसाठी सध्यातरी प्रबोधनाशिवाय अन्य कोणता डोस उपलब्ध असल्याचे दिसत नाही.

पंचगंगा खोर्‍यात एकूण आठ औद्योगिक वसाहती असून, त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे 2,953 उद्योग-धंदे आहेत. या कारखान्यांमधून प्रतिदिन 18 दशलक्ष लिटर सांडपाणी पंचगंगा नदीपात्रात मिसळताना दिसते. यापैकी काही कारखान्यांमधून बाहेर पडणार्‍या सांडपाण्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या घातक रसायनांचा समावेश असतो. नदीच्या पाण्यात मिसळणार्‍या या घातक रसायनांनी नदीतील जलचरांचे जीवन संपुष्टात आणायचा नुसता सपाटा लावलाय. त्याचप्रमाणे मानवी आरोग्यासाठीसुद्धा हे रसायनमिश्रित सांडपाणी अत्यंत घातक ठरत आहे. याशिवाय या कारखान्यांच्या माध्यमातून दररोज जवळपास 90 टन घनकचरा नदीपात्रात मिसळला जात आहे. त्यामुळे नदीचे पात्र दिवसेंदिवस गाळाने भरत चाललेले आहे. पंचगंगा खोर्‍यातील या वेगवेगळ्या कारखान्यांचा नदीच्या प्रदूषणात फार मोठा सहभाग आहे. त्यामुळे शासकीय आणि प्रशासकीय पातळीवरून कारवाई करून हे कारखाने करीत असलेल्या प्रदूषणाला तातडीने आळा घालण्याची आवश्यकता आहे. अन्यथा एक दिवस हे कारखाने पंचगंगेचा गळा घोटल्याशिवाय राहणार नाहीत.

पंचगंगा खोर्‍यात आणि प्रामुख्याने नदीकाठावर राहणारे लाखो सर्वसामान्य नागरिकसुध्दा दुर्दैवाने कळत-नकळत या प्रदुषण संहारातील आपला ‘खारीचा वाटा’ उचलताना दिसतात. पंचगंगा खोर्‍यात दरवर्षी घरगुती आणि सार्वजनिक मिळून साधारणत: सव्वा लाख गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात येते. अलिकडे होत असलेल्या प्रबोधनामुळे काही गणेश मंडळांच्या मूर्तींचा अपवाद सोडला तर उर्वरीत झाडून सगळ्या गणेश मूर्तींचे विसर्जन नदीमध्येच केले जाते. नदीकाठी विसर्जनाची अशी 237 ठिकाणे आहेत. या माध्यमातून पंचगंगा नदीत दरवर्षी सुमारे 527 टन घनकचरा मिसळला जात आहे. यापैकी मातीपासून बनविण्यात आलेल्या मूर्तींचे विसर्जनानंतर काही कालावधीत विघटन होवून जाते, मात्र प्लॅस्टर ऑफ पॅरीस आणि अन्य घटकांपासून बनविण्यात आलेल्या मूर्तींचे विघटन न होता या मूर्ती नदीच्या प्रदुषणास मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरताना दिसत आहेत. शहरी भागात याबाबत बर्‍यापैकी प्रबोधन होताना दिसत असले तरी ग्रामीण भागात मात्र सगळा ‘आनंदी आनंद’ आहे.

नदीकाठच्या जवळपास सगळ्याच गावांमध्ये स्मशानभूमी ही नदीकाठीच असलेली दिसून येते. त्याठिकाणी अंत्यसंस्कारासह रक्षाविसर्जनादी विधी करण्यात येतात. मात्र पंचगंगा  खोर्‍याचा विचार करता या भागात रक्षा विसर्जनासाठी परंपरागत पध्दतीने प्रचलीत असलेली अशी 177 ठिकाणे आहेत. पंचगंगा खोर्‍यासह अन्य भागातील नागरिकही आपापल्या मयत नातेवाईकांचा रक्षा विसर्जन विधी करण्यासाठी या ठिकाणी येताना दिसतात. रक्षा विसर्जनाच्या माध्यमातून दरवर्षी पंचगंगेच्या पात्रात तब्बल 491 टन राख मिसळली जात आहे. हा प्रश्‍न जरी लोकांच्या भावनेशी निगडीत असला तरी प्रबोधनाच्या माध्यमातून हे प्रदुषण टाळता येणे शक्य आहे. त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था, सामाजिक संस्था आणि प्रशासनानेही पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. प्रसंगी त्यासाठी प्रशासकीय पातळीवरून काही निर्बंध घालणेसुध्दा शक्य आहे.

पंचगंगा नदीकाठी कपडे धुण्याची 223 सार्वजनिक ठिकाणे आहेत. यामध्ये प्रामुख्याने जुन्या-नव्या घाटांचा समावेश होतो. अर्थात हे घाट बांधण्याचा मुख्य हेतू जरी कपडे धुण्याचा नव्हता तरीसुध्दा आज प्रामुख्याने त्याच कारणासाठी त्यांचा वापर होताना दिसतो. या ठिकाणी दररोज साधारणत: 8 हजार लोक (प्रामुख्याने महिला) कपडे धुतात. या माध्यमातून नदीत दररोज तब्बल 418 टन घनकचरा मिसळला जात आहे. याशिवाय साबण आणि डिटर्जंट पावडरमुळे होण्याचे प्रदुषण ते वेगळेच. पंचगंगा नदीपात्रात दररोज थोडीथोडकी नव्हे तर जवळपास 40 हजार जनावरे धुतली जातात. यावेळी जनावरांच्या मलमुत्रामुळे होणार्‍या प्रदुषणाची गणती करायला आजतरी कोणते मोजमाप उपलब्ध नाही. अशाप्रकारे नदीकाठी राहणार्‍या जवळपास सगळ्याच घटकांचे हात पंचगंगेच्या प्रदुषणाने बरबटलेले दिसतात.

भावना, व्यवहार आणि कायदा!

नागरिकांकडून होणारे पंचगंगेचे प्रदूषण हे कधी त्यांच्या भावनेशी, तर कधी त्यांच्या दैनंदिन व्यवहाराशी निगडित असलेले दिसून येते. त्यामुळे केवळ कायद्याचा बडगा उगारून हे प्रदूषण रोखता येणे अवघड आहे. त्यासाठी मानसिक आणि भावनिक पातळीवरूनच प्रबोधन होण्याची आवश्यकता आहे.