Sat, Jul 11, 2020 13:05होमपेज › Kolhapur › पर्यावरणाच्या रक्षणासाठी ओव्हरटाईम...

पर्यावरणाच्या रक्षणासाठी ओव्हरटाईम...

Published On: May 11 2018 1:37AM | Last Updated: May 10 2018 11:49PMकोल्हापूर : सागर यादव 

सजीवांच्या रक्षणासाठी अत्यावश्यक असणार्‍या पर्यावरणाचे जतन-संवर्धन आणि संरक्षण व्हावे, या उद्देशाने एस.एस.सी. बोर्डच्या पदाधिकारी-कर्मचार्‍यांनी कर्तव्य भावनेतून प्रयत्न सुरू केले आहेत. दैनंदिन कार्यालयीन कामकाजात चार पैसे मिळविण्यासाठी ओव्हर टाईम केला जातो. मात्र, एस.एस.सी. बोर्डच्या पदाधिकार्‍यांनी या संकल्पनेला बगल देऊन लाख मोलाच्या पर्यावरण रक्षणासाठी ओव्हरटाईम सुरू केला आहे. 

पर्यावरण रक्षणाचे काम केवळ निसर्गप्रेमी-पर्यावरण अभ्यासक अशा एका-दोघांचे नसून प्रत्येकाचेच आहे. प्रत्येक पशू-प्राणी आपापल्या परीने पर्यावरणाच्या रक्षणासाठी योगदान देतोच. मात्र, बुद्धिजीवी माणसाकडून पर्यावरणाच्या संपत्तीच्या अतिरेकी वापरापलीकडे काहीही होत नसल्याचे वास्तव आहे. 

सातत्याने वाढत जाणार्‍या लोकसंख्येमुळे पर्यावरणाचा प्रचंड प्रमाणात र्‍हास होत आहे. जागतिक तापमान वाढ, प्रदूषण, आरोग्यास हानिकारक रोगराई, नैसर्गिक आपत्ती यामुळे एकूणच सजीव सृष्टीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. 

यावर उपाययोजना म्हणून स्वत:पासून पर्यावरणाचे जतन-संरक्षण करण्याच्या उद्देशाने एस.एस.सी. बोर्डातील अधिकार्‍यांनी आपल्या कार्यालयासभोवती झाडे लावून त्यांची जपवणूक करण्यासाठी कंबर कसली आहे. एस.एस.सी. बोर्डाच्या प्र. विभागीय अध्यक्ष तथा विभागीय सचिव श्रीमती पी.एस. पवार यांच्या संकल्पनेतून आणि  निसर्गमित्र अनिल चौगुले, ऊर्जा व विज्ञान अभ्यासक पराग केमकर, अस्मिता चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरणपूरक मोहीम हाती घेण्यात आली आहे. 

या अंतर्गत एस.एस.सी. बोर्डाच्या प्रांगणात असणार्‍या 200 ते 250 वृक्षांचे जतन, नव्या झाडांचे रोपण, पाला पाचोळ्यापासून खतनिर्मिती, झाडांची माहिती देणारे फलक लावणे (लेबलिंग) असे उपक्रम राबविण्यात आले. यात सहसचिव टी.एल. मोळे, सहायक सचिव पी.एस. धराडे, लेखाधिकारी रेणके, एस.एस.सी. बोर्ड नेचर क्‍लबचे सदस्य एन. बी. पावार, डी. पी. पोवार आदींचा सहभाग आहे.