होमपेज › Kolhapur › ‘झेडपी’चे 40 लाख ‘पाण्यात’

‘झेडपी’चे 40 लाख ‘पाण्यात’

Published On: May 28 2018 1:42AM | Last Updated: May 27 2018 11:27PMकोल्हापूर : विठ्ठल पाटील

पंचगंगा प्रदूषणासाठी कारणीभूत ठरणारे घटक आणि त्यावरील उपायांबाबत सर्वेक्षण करून प्रस्ताव तयार करण्यासाठी जिल्हा परिषदेने खर्च केलेले चाळीस लाख रुपये पाण्यात गेल्याची स्थिती आहे. करवीर तालुक्यातील बालिंगापासून पुढे कोल्हापूर शहरासह नदीकाठच्या गावांचा सर्वेक्षणात अंतर्भाव होता. या प्रस्तावानुसार पंचगंगेचे प्रदूषण थांबविण्यासाठी 2014 मध्ये जिल्हा परिषदेने शासनाकडे 118 कोटी रुपयांची मागणी केली होती.

स्वयंसेवी संघटना आणि संस्थांच्या माध्यमातून पंचगंगेचे प्रदूषण थांबविण्यापासून ते शुद्धीकरणासाठी श्रमदान केले जात आहे. प्रदूषणाची गंभीरता पाहता श्रमदानातून पंचगंगा स्वच्छ होण्यावर मर्यादा येऊ शकतात. नदीघाट आणि परिसरातील कचरा उचलला जातोय. परंतु, दुधाळी आणि जयंती नाल्यासह अनेक छोट्या गटारींचे पाणी कसे थांबविणार, हा मोठा प्रश्‍न आहे.दुधाळीचे सांडपाणी जयंती नाल्यापर्यंत आणून दोन्ही नाल्यांतील प्रदूषित सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेने प्रकल्प उभारला आहे. या प्रकल्पातून पाण्यावर प्रक्रिया करून ते शेतीला पुरविले जाते; पण अनेकदा हेच पाणी प्रक्रियेविना थेट नदीतही मिसळते. याबाबत सामाजिक कार्यकर्त्यांपासून ते संस्था, संघटना आणि राजकीय पक्षांनी अनेकदा आंदोलने केली आहेत. जयंती नाल्याचे एक दिवस जरी नदीत प्रदूषित पाणी मिसळले, तरी त्याचा फटका कोल्हापूरपासून पुढील गावांना मोठ्या प्रमाणात बसतो. याबाबत अनेकदा तक्रारी झाल्या. कार्यवाही करण्याबाबत बैठका झाल्या; पण परिणाम शून्य, अशी परिस्थिती आहे.

गेल्या 40 वर्षांपासून पंचगंगेच्या प्रदूषणाचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. कोल्हापूर शहराला पिण्याचे पाणी उपसा आणि शुद्धीकरण केंद्र कसबा बावडा येथील राजाराम बंधार्‍याजवळ होते. आजही ते आहे. शिंगणापूर योजना झाल्यापासून या केंद्रातून पाणी उपसा थांबविला असला, तरी काही वेळा आणीबाणीच्या काळात त्याचा उपयोग करावा लागत असल्याची स्थिती आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या सांडपाण्याच्या प्रदूषणाचा त्रास कोल्हापूर शहरासह पुढील गावांनाही आहे. म्हणूनच जिल्हा परिषदेने 2014 मध्ये पंचगंगा प्रदूषणाची कारणे आणि उपाय यासाठी सर्वेक्षणाचा निर्णय घेतला. त्यासाठी एका अभियांत्रिकी महाविद्यालयाला काम देण्यात आले. त्या कामाची फी म्हणून 40 लाख रुपये खर्च केले. अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या तज्ज्ञ प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी बालिंगापासून कोल्हापूर शहर, तसेच हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यांतील पंचगंगेकाठच्या गावांचे सर्वेक्षण केले. त्यात कोल्हापूर शहरासह 38 गावांतील विविध घटकांमुळे पंचगंगा प्रदूषित होत असल्याचा अहवाल तयार झाला.

याबरोबरच हे प्रदूषण थांबविण्यासाठीच्या उपाययोजनांचा प्रस्तावही तयार झाला. 2014 मध्ये तयार झालेल्या या प्रस्तावानुसार त्यावेळी 118 कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. आज त्यात आणखी वाढ झाली असेल. हा प्रस्ताव राज्य आणि केंद्र सरकारकडे पाठविला आहे. त्यासाठी पाठपुरावा होण्याची गरज आहे. जर हा निधी प्राप्‍त झाला, तर नदी प्रदूषणाची बरीचशी समस्या सुटेल, अशी संबंधित गावांतील नागरिकांना अपेक्षा आहे.

प्रदूषणाचे दुखणे कायम...

देशातील प्रमुख प्रदूषित नद्यांमध्ये पंचगंगेचा समावेश आहे. कोल्हापूर शहराचे सांडपाणी हा प्रमुख घटक प्रदूषणासाठी कारणीभूत मानला जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासूनचे हे दुखणे आजही कायम आहे. म्हणूनच अलीकडे पंचगंगा प्रदूषण रोखण्यासाठी विविध उपाय योजण्याच्या  कल्पना पुढे येत आहेत.